रोग कोणताही असो, बळी कोंबडीच !

धनाजी सुर्वे
शुक्रवार, 20 मार्च 2020

२००६ पासून बर्ड फ्लू, २००९ पासून चिकनगुण्या, तर २०११ पासून स्वाईन फ्लू हे चर्चेत आले. यांचा प्रसार होताच नागरिकांनी प्रथम चिकन खाणं बंद केलं. हे सर्व झालं फक्त सोशल मीडियावरील अफवांमुळे.

जळगाव येथे २००६ मध्ये बर्ड फ्लूची साथ आली आणि पाहता-पाहता पाच ते सहा दिवसांत दीड ते दोन लाख कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. त्यानंतर पाच ते सहा महिने लोकांनी चिकन खाणं बंद केलं. त्या वेळपासून मांसाहारातून संसर्ग होतो हेच माणसांच्या मनावर ठळकपणे बिंबलं गेलं. तेव्हापासून कोणताही आजार आला की पहिल्यांदा चिकन खाणं बंद करायचं, हे स्वतःहूनच लोक ठरवायला लागले. तोच प्रकार गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या कोरोनाबाबत सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग जगभरात पसरत असताना पहिला बळी गेला तो कोंबडीचाच. परिणामी, प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने कोंबड्या आणि अंडी गाडली जाऊ लागली. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. त्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. याचाच फटका पोल्ट्री व्यावसायाला बसला. 

२००६ पासून बर्ड फ्लू, २००९ पासून चिकनगुण्या, तर २०११ पासून स्वाईन फ्लू हे चर्चेत आले. यांचा प्रसार होताच नागरिकांनी प्रथम चिकन खाणं बंद केलं. हे सर्व झालं फक्त सोशल मीडियावरील अफवांमुळे. चिकन खाल्ल्याने अमूक आजार पसरतो, असा एखादा संदेश कोणतरी चावटपणे टाकतो आणि अनेक जण हाच संदेश कोणतीही खातरजमा न करता पुढे पाठवतात. पाहता-पाहता काही क्षणात हजारो जणांपर्यंत तो पोचतो. मग लोक स्वतःहूनच ठरवितात की चिकन खाल्ल्याने तो रोग होतो. आज याच अफवांमुळे पोल्ट्रीधारकांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. लोकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी काही पोल्ट्रीधारकांनी कोंबड्या मोफत वाटल्या. आश्‍चर्याची बाब म्हणजे, मोफत वाटलेल्या कोंबड्या मिळविण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. त्या वेळी प्रश्‍न पडतो, मोफत मिळालेल्या कोंबड्यांचा फडशा पाडल्याने कोणती बाधा होत नाही का? आणि विकत घेऊन चिकन खाल्ल्यास कोरोनाची बाधा होते का? महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिकन खाल्ल्याने कोरोना होतो हे कोणत्याही डॉक्‍टरने सांगितलेले नाही. परंतु, लोकांनी स्वतःच ही गोष्ट ठरवून घेतली आणि त्याचा फटका मात्र पोल्ट्रीधारकांना बसत आहे.गेल्या दीड महिन्यात अंदाजे पाचशे कोटींवर उलाढालीला फटका बसला आहे. बॉयलरच्या मागणीत ४० ते ७० टक्‍क्‍यांनी घट झाली. बॉयलर पडून राहण्यापेक्षा त्या स्वस्तात व नुकसान सहन करून विकल्या जात आहेत.

आकडेवारी

सांगली - पोल्ट्री संख्या २७५ - ३० लाख अंडी दोणाऱ्या कोंबड्या (बॉयलर चिकन १५ लाख) 
कोल्हापूर - पोल्ट्री संख्या २२० - १२ लाख अंडी देणाऱ्या कोंबड्या (बॉयलर चिकन २५ लाख) 

शासनाने मदत द्यावी 

‘‘अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी २५ लाख ते ५० लाखांपर्यंतची कर्जे घेतली आहेत. अशा पोल्ट्रीधारकांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, यासाठी पोल्ट्री असोसिएशनने मदतीची मागणी करणारे निवेदन अर्थमंत्री अजित पवार यांना दिले आहे,’’ असे असोसिएशनचे शत्रुघ्न जाधव यांनी सांगितले.

इतर ब्लॉग्स