ह्रदयद्रावक कहाणी : व्यक्तीच्या धक्कादायक खुलाशानं पाणावले डोळे

सागर दिलीपराव शेलार
Thursday, 15 October 2020

मी ते पाहत पुढे निघालो तोच मनात आले की हे नेमके कोण आहेत, कशाला आलेत असल्या पावसात, चिखलात हे कसे राहणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले. पडलेल्या प्रश्नांमुळे मी गाडीचे ब्रेक दाबले आणि गाडी थांबवली.

शनिवारची सुट्टी आणि घरी काम असल्यामुळे घरी जायचा बेत आखला. त्याप्रमाणे श्रीगोंद्याला घरी गेलो. दुसऱ्या दिवशी रविवारी परत ऑफिसमध्ये कामावर यायचे म्हणून पहाटे लवकरच पुण्याच्या दिशेने निघालो. नेहमीप्रमाणे हेडफोनवरती गाणे सुरू करून माझा पुणे प्रवास सुरु झाला. पहाटेचे 5.40 वाजले असतील, पुणे जिल्हा व नगर जिल्ह्याच्या सीमेवरती दौंडच्या अगदी जवळ एक गाव आहे. तेथून जात असताना पाहिले तर भल्या पहाटे तेथे काही लोकं आपले पाल (तात्पुरता राहण्याचा तंबू) ठोकत होते. काहींचा ठोकून झाला होता. रात्री परिसरात चांगलाच पाऊस झाला होता. त्यामुळे सगळीकडे चिखलाची रिपरिप होती. रस्त्याच्या कडेला बेडकांचे डरावडराव सुरू होते. मी घरून निघालो तेव्हा अंधारच होता, आता मात्र थोडे थोडे उजाडू लागले होते. त्या ठिकाणी काही महिला भाकरी थापत होत्या, काही जणी आपली जनावरे बांधत होत्या. पुरुष मंडळी निवारा करत होते, तर काही चिलीम मारत बसले होते. छोटीसी पोरं त्या पावसाच्या चिखलातही खेळत होती. त्यांना ना कोरोनाची भीती, ना कशाचाही धाक होता. 

मी ते पाहत पुढे निघालो तोच मनात आले की हे नेमके कोण आहेत, कशाला आलेत असल्या पावसात, चिखलात हे कसे राहणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले. पडलेल्या प्रश्नांमुळे मी गाडीचे ब्रेक दाबले आणि गाडी थांबवली. मी न राहवून गाडीवरून उतरलो, आणि एक व्यक्तीजवळ जात विचारले दादा कुठून आला आहात? त्या व्यक्तीने उत्तर दिले बीड. मी विचारले कशासाठी आला आहात? तर ती व्यक्ती म्हणाली साहेब पोटापाण्यासाठी आलो आहोत. मी त्या व्यक्तीला म्हणालो पण एवढ्या लांब, तर तो म्हणाला साहेब आम्ही ऊस तोडईवालं हावोत. बीडावरून आलो हावोत. आता 3, 4 महिने हिकडंच राहणार हावोत. मी विचारले किती जणांची टोळी आहे. तर ती व्यक्ती म्हणाली साहेब 16 कोयतं हायेत. ज्या व्यक्तीशी मी संवाद साधत होतो त्यांच्याजवळ थोड्याच वेळात एक लहान पोरं आलं आणि म्हणालं आबा तुला आई बोलावतीया. मग त्या पोराला ती व्यक्ती जा येतो म्हणाली आणि आमचा तुटलेला संवाद पुन्हा सुरू झाला. मी विचारले दादा मग या पोरांच्या शाळेचं कसं, तर ती व्यक्ती म्हणाली कसली शाळा साहेब इथे खायला काही मिळणा, आणि हे शाळा शिकून काय दिव लावणार हायेत. यातलं कोणी बी शाळंत जात नाही. आता परवा लग्न झालेलं जोडपं बी आमच्या टोळीत आहे. ते बी आमच्या सारखं ऊस तोडणार हायेत. हे ऐकून मला धक्काच बसला. कारण लग्न झाल्यानंतर हनिमून किंवा फिरायला जातात मला हे माहीत होतं. पण असं लग्न झालं की ऊसाच्या शेतात ऊस तोडायला हे माहीत नव्हतं. हे पहिल्यांदाच पाहत आणि ऐकतही होतो. 

मला त्या टोळीत एक गरोदर महिलाही दिसली. मी त्या व्यक्तीशी संवाद संपवला, करण मला लवकर पुण्यात पोहोचून ऑफिसलाही जायचे होते. मी गाडी सुरू करत विचार करत होतो की, वर्षानुवर्षें यांचे आयुष्य असेच का, यांचे प्रश्न केव्हा सुटणार. यांचे नेते म्हणवून घेणारे काय करतात असा सवाल माझ्या मनात उभा राहिला. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी काही प्रमाणात यांचे प्रश्न सोडवलेही पण आजही हा समाज खूप समस्यांनी वेढला आहे. त्यांच्या राहण्यासाठी पक्या घरांची सोय, मुलांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य, अशा मूलभूत सोईसुविधांपासूनच ते वंचित आहेत. आपला पांढरपेशी समाज फक्त आपल्या पुरताच विचार करतो (त्यात मी देखील आलोच) मी गाडीवर पुण्यात येईपर्यंत हाच विचार करत होतो की, या लोकांच्या तुलनेत आपण किती पटीने जास्त सुखी आहोत. पण ऊस तोडईवाल्याचें नेते म्हणवून घेणाऱ्यांनी यांच्या प्रश्नांकडे नक्की लक्ष दयावे. आपल्या जाणिव-नेणीवा जिवंत असतील तर या गोष्टी पाहून आपण नक्कीच अस्वस्थ होतो.

- सागर डी. शेलार (8462049634)

इतर ब्लॉग्स