esakal | Blog: हे सगळं प्रकरण म्हणजे मायाजाल आहे का?
sakal

बोलून बातमी शोधा

Student

हे सगळं प्रकरण म्हणजे मायाजाल आहे का?

sakal_logo
By
दत्ता लवांडे

सकाळी लवकर उठून त्याने सगळी तयारी केली होती.रात्रीच मित्रांकडून हजार रूपये आणुन ठेवले होते आणि निघताना आईने मजुरी करून पिठामिठाच्या डब्यात ठेवलेले हजार रूपये दिले होते. बापाच्या पाया पडला तेव्हा त्यानी फक्त डोक्यावर हात ठेवला होता. लेकाच्या डोक्यावरून हात फिरवताना आईचे डोळे पाणावले होते.

पदराने डोळे पुसत तिने चिरगुटात दोन भाकरी बांधल्या, निघताना पदराला बांधून ठेवलेले वीस रुपये पोराच्या हातात टेकवत आईने मारूतीला नारळ फोडायला लावलं होतं. ‘’सगळं काही नीट होईल पांडुरंग पाठीशी आहे त्यालाच सगळी काळजी आहे.’’ ती एवढंच बोलली. पोरगं गाडीवर बसताना बाप फक्त त्याच्याकडे बघत होता. लहान बहिण आणि आई त्याला दारातून टाटा करत होत्या. चौकातल्या मारूतीच्या देवळापुढून जाताना नकळत हात जोडुन नतमस्तक व्हायला होत होतं.

हेही वाचा: एक झुंज स्वतःशी!

काल हॉल तिकिट काढून आणल्यावर बापाला फक्त ‘’पुण्याला परीक्षेला जायचंय, दोन हजार रूपये लागतील.’’ एवढंच बोललो होतो. तेव्हा त्याने फक्त गप्प बसत उतरल्या चेहऱ्याने मानेनेच होकार दिला होता. मागच्या सहा वर्षा पासून पुण्यात शिकण्यासाठी पैसे देत होता तो. लॉकडाऊन नंतर गावाला आल्यावर ‘’गावाकडेचं काहीतरी कर, आता आमची ऐपत नाही तुला पोसायची.’’ असं बोलून इथचं काहीतरी केलं पाहिजे असे स्पष्ट संकेत बापाने दिले होते. यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे वावरातील सगळं सोयबीन सडलं होतं. परवाच्या दोन दिवसात त्यांनी चिखलातून ते सगळं उपटून बांधावर टाकलं होतं.

सोयाबीन गेल्यापासून बाप जास्त बोलतचं नव्हता. सारीचं लग्न जमावायचं विषय घरी चाललां होता. पण पैसा कुठे आहे ? त्याला आतून खुप सलायची ही गोष्ट. पण त्यालाही स्वत:ला दोष देण्याशिवाय पर्यायच नव्हता. सकाळी निघताना बाप त्याच्याकडे केवीलवाण्या नजरेने बघताना त्याच्या काळजात धस्स झालं होतं. एवढंच...

हे सगळे विचार डोक्यात गोंगावत असताना बस नांदेडला पोहचली होती. आता पुण्यासाठी ट्रेन पकाडायची होती. ट्रेनच्या चाकाचा खाड्खाड् आवाज त्याच्या काळजाचा ठाव घेत होता. अंतर जसंजसं जवळ येत होतं तसं त्याला मोठं जबाबदारीचं ओझं घेऊन आल्यासारखं भासत होतं. संध्याकाळी सहाच्या सुमारास पुण्यात दाखल होताच मित्र त्याला घ्यायला आला. मित्राच्या सिंगल रूममधील चौघांमध्ये हा पाचवा एका रात्रीसाठी दाखल झाला होता. आईने बांधून दिलेल्या गावाकडच्या बाजरीच्या भाकरी बघून मित्र खूश झाला होता मात्र. रात्री झोपताना त्याला फोन आला. फोन उचलताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. ज्या पेपरला आलो ते पेपर रद्द झाल्याचं त्याच्या मित्राकडून समजल्यावर त्याच्या अंगात आवसानचं राहिलं नव्हतं. घडलेल्या वास्तवावर विश्वासच बसत नव्हता. डोक्याभोवती अनेक प्रश्नांचं काहूर माजलं होतं. भूतकाळ, वर्तमान, अन् भविष्य भोवती घिरट्या घालत होते. परीक्षा रद्द झाल्याचा मेसेज परत परत वाचताना डोळ्यात कुणीतरी उकळतं तेल ओतल्यासारखं होत होतं.

हेही वाचा: विकासाची स्वप्ने गाजराची पुंगी ना ठरो..!

सकाळी सकाळी चार पाच मित्रांचे फोन आले होते. वास्तव सांगण्यासाठी जीभ रेटली नाही. परत निघताना एसटी स्टॅण्डवर बाकीच्या पोरांचे सुकलेले चेहरे दिलत होते. कोणतं तोंड घेऊन घरी जावं हे कळायला मार्ग नव्हता. सरत जाणारं वय, हनुमानाच्या शेपटी सारखी लांबत जाणारी परीक्षेची तारीख, घरी आईला काय सांगायचं? बाप काय म्हणेल आणि आपलं पुढे काय होईल? आपल्यासोबतचं असं का होतं सारखं? एवढ्या दिवस केलेल्या मेहनतीला काही अर्थच नाही का? प्रत्येकवेळी हे सरकार आपल्या मानसिकतेशी खेळतयं का?

हे स्पर्धा परीक्षेचं हे सगळं प्रकरण म्हणजे मायाजाल आहे का? पुढं आलेलं संकंट आहे की जबाबदारी? यासाठी काही प्रायश्चित आहे का? कदाचीत स्वप्निल लोणकर? नाही हे शक्य नाही. आत्महत्या करणाऱ्यातले आपण नाहीत. हा विचार डोक्यात घोळत असतानाच एसटीची घंटी वाजली आणि तो गाढ झोपेतून जागा झाला. माळावरील फाट्यावर तो खाली उतरला. उर्वरीत आयुष्याचं ओसाड पडलेलं जग पुढं आ वासून उभाच होतं.

- दत्ता लवांडे (8796967070)

dattalawande9696@gmail.com

loading image
go to top