esakal | Sakinaka rape case: विकृत वृत्तीला रावणाप्रमाणे जाळाच!
sakal

बोलून बातमी शोधा

Sakinaka rape case: विकृत वृत्तीला रावणाप्रमाणे जाळाच!

Sakinaka rape case: विकृत वृत्तीला रावणाप्रमाणे जाळाच!

sakal_logo
By
नामदेव कुंभार

एकीकडे कोरोना महामारीने थैमान घातलं असल्यामुळे नागरिक त्रस्त असतानाच मुंबईतील बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. 32 वर्षीय महिलेवर साकीनाका परिसरात टॅम्पोमध्ये अमानुष बलात्कार झाला. नराधमाने बलात्कार करून तिचे निष्ठूरपणे हाल केले. या पीडितेचा मृत्यू झाला असून, आता या घटनेचे पडसाद देशभर उमटू लागले आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळात या दुर्दैवी घटनेमुळे मन सुन्न झालं आहे. मनात वारंवार एकच विषय येतो ...अजून किती निर्भया?? हे थांबणार कधी? सरकार आपली बाजू मांडेल, विरोधक प्रदर्शन करतील... पण ...अजुन किती निर्भया?? हा प्रश्न कायम राहतोच.

डिसेंबर 2012 मधील राजधानी दिल्लीत घडलेलं निर्भया बलात्कार प्रकरण चांगलेच गाजलं होतं. पण, त्या प्रकरणात नराधमांना शिक्षा द्यायला अनेक वर्ष लागली. त्याशिवाय म्हैसूर, कठुआ आणि उन्नावमध्ये काय घडलं? पुरोगामी महाराष्ट्रात महात्मा गांधींच्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील ‘निर्भया’चा नाहक जीव गेला. त्यानंतर कोपर्डी, पुणे, अमरावती, यासारखी कितीतरी प्रकरणं आहेत. घटना घडल्यानंतर काही दिवस मीडियात चर्चा रंगते, विरोधक अन् सत्ताधारी यांच्यात शाब्दिक चकमकी होतात. तरुण-तरुणी मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरतात. अन् काही दिवसानंतर पुन्हा तेच... पुरुषी अमानुषतेच्या पाशवी अत्याचाराने नाहक जीव गमावणाऱ्या असंख्य महिलांना आपण बातम्यांसारखे वाचून विसरून जात आहोत? त्यांना न्याय कधी मिळणार...

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, 2014 ते 2019 या कालावधीत प्रत्येक वर्षाला 4418 बलात्काराच्या घटना राज्यात घडल्या आहेत. म्हणजेच या कालावधीत दिवसाला 12 घटना घडल्या. महिलावरील अत्याचाराच्या घटनांचा आकडा देखील फार मोठा आहे. सध्यस्थितीला राज्यात आणि देशात कितीतरी निर्भया न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत , त्यांना न्याय कधी मिळणार ? या देशातील प्रत्येक निर्भया म्हणजे प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री असुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.

हेही वाचा: Sakianaka rape case : बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू

राज्यात आणि देशात दिवसागणिक बलात्कार आणि आत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. त्याला दोन महत्वाची अन् मोठी कारणं असू शकतात. एकतर गुन्हेगारांना मिळणारे राजकीय वरदहस्त. आणि दूसरे कायदयातील पळवाटा. आता उदाहरण घ्यायचं झालं तर पाहा...निर्भयाप्रकरणात नराधमांना शिक्षा होईपर्यंत तब्बल ८ वर्ष लागली. म्हणजेच एखादा खटला उभा राहताना आणि निकाल लगायला काही वर्षे निघून गेलेली असतात, त्यातही एखाद्या आरोपीला शिक्षा झाली तरी तो वरच्या कोर्टात अपील करू शकतो. सर्वोच्च न्यायलयाने जरी शिक्षा केली तरी तो राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करू शकतो. ह्या एवढ्या प्रकारच्या तरतुदी जर एखाद्या आरोपीला मिळत असतील तर त्याला कशी काय कायद्याची भीती राहील?

लैंगिक अत्याचार अथवा बलात्कार झाल्यानंतर कित्येक निर्भया आपली तक्रार पोलिसांत देत नाहीत. किंवा उघड बोलत नाही. कुणी तशी हिंमत केल्यास उलट तिचीच बदनामी केली जाते. ऐवढ्या रात्री मुलींनी घराबाहेर का पडायचं? असा निर्लज्ज प्रश्न राजकीय नेतेच विचारत असतील तर समाजाकडून काय अपेक्षा ठेवणार. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोखालील कमेंट वाचल्या की विकृत मानसिकतेचा अंदाज येतो. दरवेळी महिलांनाच प्रश्न विचारायचे पण चुकूनही कुणी अत्याचार करणाऱ्या पुरुषाबद्दल बोलत नाही. त्याच्या असभ्य वर्तनाबद्दल कसलीही टिपण्णी केली जात नाही. हे कधी बदलणार? आपल्या मानसिकतेबरोबरच समाज आणि व्यवस्थाही आजच्या निर्भयासाठी धोक्याची आहे का? असा प्रश्न उभा राहतो..

भारतात स्त्रियांवर होणारे मानसिक, शारीरिक आत्याचार थांबणार कधी? त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणार कधी? मुलगा-मुलगी भेदभाव संपणार कधी? कितीही पुरोगामी आणि अधुनिकतेच्या दप्पा मारल्याने पांरपारिक विचार अजून बदलले नाहीत, असं दररोज घडणाऱ्या घटानांवरुन दिसतेय. महिलांवर होणारे अत्याचार आणि बलात्काराच्या घटना ऐकून समाजमन सुन्न झाले आहे. स्त्रियांवर आत्याचार करणाऱ्या अथवा अशा नराधमांना पाठीशी घालणाऱ्यांना एक प्रश्न विचारावा वाटतो, आणखी किती निर्भयाचा बळी घेणार आहात? त्यांची नेमकी चूक काय आहे? दृष्ट प्रवृत्तीसाठी ज्याने कधी सीतेला स्पर्शही केला नाही त्या रावणाला देशभरात जाळले जातं. अशा घटनेतील नराधमांनाही आता रावणाप्रमाणे जाळायला हवं म्हणजे पुन्हा दुसरी निर्भया होणार नाही. अन्यथा मनात एकच प्रश्न सतावेल, अजून किती निर्भया होणार???

loading image
go to top