आता हवी युद्धस्तरावर उपाययोजना, अन्यथा अकोल्यातील स्थिती स्फोटक!

संदीप भारंबे
मंगळवार, 12 मे 2020

कोरोना विषाणूच्या हैदोसाने अकोला शहर हादरले आहे. गेल्या दहा दिवसांत शंभर नवे रुग्ण सापडले आहेत. कोरोनामुळे होणऱ्या मृत्यूचा दर अधिक असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. स्थिती स्फोटक बनत चालली आहे. अकोला शहरासह आता कोरोनाने ग्रामीण भागातही हातपाय पसरले आहेत. कोरोनाला आळा घालण्यात यंत्रणेची दमछाक होऊ लागली आहे. लॉकडाउन सुरू होऊन आज चाळीसहून अधिक दिवस उलटले आहेत. लोकांचा संयम संपत चालला आहे. अतिशय प्रामाणिकपणे ल़ॉकडाउन पाळणाऱ्या नागरिकांना काही बेशिस्तांमुळे नाहक शिक्षा भोगावी लागते आहे. सध्याची कोरोना बाधितांची संख्या बघता आता युद्धस्तरावर प्रयत्नांची गरज असून याक्षणी दिरंगाई झाल्यास स्थिती हाताबाहेर जाण्याचा मोठा धोका आहे.

 

निम्म्याहून अधिक अकोला शहर हे बाधितक्षेत्र (कन्टेन्मेंट झोन) झाले आहे. शहरातील प्रतिष्ठित वस्त्याही कोरोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. सफाई कर्मचारी आणि पोलिसांपर्यंत कोरोना पोहोचला आहे. दाटीवाटीने घरे असलेल्या परिसरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. एखाद्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला की, तो भाग सिल केला जातो. मात्र, प्रत्यक्षात हे सिल नावापुरतेच दिसते. त्या परिसरातील नागरिक बिनधास्त फिरताना दिसतात. त्या भागात होणारे सर्वेक्षणच्या परिणामकारकतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. आज सर्वांत पहिला रुग्ण आढळलेला बैदपुरा भाग हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची खाण झाला आहे. या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी व कोरोना चाचण्या जोरात सुरू झाल्याने नवे रुग्ण निघताहेत हे खरे आहे. पण अशाप्रकारे यापूर्वी चाचण्या घेतल्या असत्या तर कोरोनाच्या प्रसाराला निश्चित आळा बसू शकला असता. या शिवाय अकोला शहर व जिल्ह्यात नागरिकांची ये-जा बिनधास्त सुरू आहे. अनेक नागरिकही बेजबाबदार आहेत. भाजीपाला खरेदी असो अथवा किराणा मालाची खरेदी सोशल डिस्टन्सला हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे. ही वेळ कुणावर आरोपप्रत्यारोपांची नाही तर एकत्र येऊन लढण्याची आहे. मात्र, वस्तुस्थिती लक्षात आणून देणे हे प्रसार माध्यमांचे काम आहे. आज प्रशासन आपल्या परिने प्रयत्न करते आहे. मात्र, त्याला दिशादेण्यासाठी लोकप्रतिनिधींचीही तेवढीच खंबीर साथ प्रशासनाला हवी आहे. आज हे मान्य केले पाहिजे की, यंत्रणा कुठे तरी कमी पडते आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन आणि महापालिकेची यंत्रणा कुठे कमी पडत असेल तर अन्य जिल्हयांची मदत घेण्याची हीच योग्य वेळ आहे.

शेजारील जिल्ह्यांची मदत घ्या...
सद्यस्थितीला तोंड देण्यात यंत्रणा अपुरी पडत असेल तर शेजारील किंवा राज्यातील अन्य ग्रीन झोन असलेल्या जिल्ह्यांची मदत घेण्याची गरज आहे. अकोला शहराची आठ-दहा भागांत विभागणी करावी आणि तेथे प्रत्येक भागावर एका उपजिल्हाधिकारी दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. त्यांच्या मदतीला पोलिस व आरोग्य विभागाची सक्षम व पुरेशी टीम देणे गरजेचे आहे. या सर्व दहा भागांमध्ये संशयीतांची आरोग्य तपासणी व्हायला हवी . त्यासाठी इतर जिल्ह्यांची मदत घेणे सहज शक्य आहे.

एसआरपी तैनात करा...
अकोला शहरातील कोरोना स्फोटाची स्थिती सावरायची असेल तर पुढील पंधरा दिवस महत्त्वाचे आहेत. पुढे पावसाळा सुरू झाल्यास स्थिती आणखी बिकट होईल. त्यामुळे हवं तर राज्य शासनाची विशेष परवानगी घेऊन पुढील पंधरा दिवस कडक लॉकडाउनची अंमलबजावणी करावी. जिल्हा पोलिस दल सातत्याने बंदोबस्तावर आहे. त्यांच्यावरही ताण आला आहे. त्यामुळे तातडीने एसआरपी अर्थात राज्य राखीव दल किंवा शिघ्रकृती दलाला बोलावण्याची गरज आहे. त्यांच्या हाती दिल्यास बेशिस्तांना वेसन घालणे शक्य होऊ शकेल.

खासगी हॉस्पिटल्स अधिग्रहित करा...
सध्या जेथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार होताहेत तेथील सुविधाबाबत आढावा घेण्याची गरज आहे. सरकारी रुग्णालयात जाण्याची अनेकांची तयारी दिसत नाही. त्यासाठी खासगी रुग्णालये अधिग्रहित केल्यास चांगल्या सुविधा मिळण्याची शक्यता आहे. तसेच वाढती रुग्ण संख्या पाहता खासगी डॉक्टर्सची मदत घेण्याची गरज वाटते. सोबतच कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. आणखी एखादी लॅब सुरू करण्याची गरज असेल तर ती ताबडतोब सुरू करयला हवी. डॉक्टर्स व अऩ्य आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असेल तर किंवा नसेल तरीही शेजारील जिल्ह्यांतून स्टाफ बोलवा किंवा खासगी सेवा घ्या...

काळजी न घेणाऱ्यांबाबत कठोर व्हा...
जे नागरिक, व्यावसायिक कोरोना प्रतिबंधासंदर्भात काळजी घेत नसतील आणि प्रशासनाला सहकार्य करीत नसतील तर त्यांच्याविरोधात यंत्रणेने कडक धोरण अवलंबविण्याची गरज आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे. निदान दोन आठवडे तरी वैद्यकीय सुविधा वगळता सर्वच सुविधांवर प्रतिबंध घाला व लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करावी... अन्यथा शेजारील जिल्हे सुरू होतील. तेव्हा आपल्याकडे आणीबाणी असेल...

कडक लॉकडाउनमध्ये गरजूंचीही काळजी घ्या...
दोन आठवडे कडक लॉकडाऊनची गरज भासत असेल तर ते करावे.... मात्र या काळात गरीब उपाशी मरणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे... विशेष हेल्पलाईन क्रमांकसह विविध भागांत स्वयंसेवक गट तयार करून मदत पोहोचविण्याचीही व्यवस्था करावी...बाहेर जिल्ह्यातून मायभूमीकडे निघालेल्या मजुरांसाठी निवारा केंद्रे उभारा, त्यांनाही मदत करा... सर्वकाही करा पण एकदा कठोर व्हा, प्रशासनाला सर्वांची साथ निश्चित लाभेल...! 

(लेखक हे सकाळ वऱ्हाड आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या