अजातशत्रू, एकवचनी, वक्तशीर व किंगमेकर : सातलिंगप्पा म्हेत्रे 

Satlingappa Mhetre
Satlingappa Mhetre

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, दुधनीचे माजी नगराध्यक्ष, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती असणारे कणखर नेतृत्व सातलिंगप्पा म्हेत्रे काळाच्या पडद्याआड गेले. सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1931 रोजी झाला. सर्वप्रथम 1959 ते 1965, 1967 ते 1980, 1986 ते 1995, 1996 ते 1997, 2009 ते 2011 या कालावधीत ते 31 वर्षे दुधनीचे नगराध्यक्ष होते. 1959 पासून दुधनी नगरपरिषदेवर त्यांची अबाधित सत्ता होती. 1974 ते 1982 या काळात ते अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते. 

अक्कलकोट तालुक्‍यातील राजकारणात त्यांचा शब्द अखेरचा होता. भाई छन्नुसिंह चंदेले, बी. टी. माने, पार्वतीबाई मलगोंडा, महादेव पाटील यांच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा होता. भाई छन्नुसिंह चंदेले यांनी सातलिंगप्पा म्हेत्रे यांना खऱ्या अर्थाने राजकारणात राजकीय बळ दिले. त्यामुळे त्यांना मागे वळून बघावे लागेल नाही. 1962 च्या विधानसभा निवडणुकीत प्रदेश कॉंग्रेस कमिटीने त्यांना उमेदवारीची ऑफर दिली होती; पण सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी विनम्रपणे ती ऑफर नाकारली. तद्‌नंतर 1998 मध्ये त्यांचे पुत्र सिद्धाराम म्हेत्रे यांना उमेदवारी मिळून ते विजयी झाले. दुधनी व दुधनी परिसरातील ग्रामीण भागात, कर्नाटकातील आळंद, अफजलपूर, कलबुर्गी या भागात त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने त्यांचा राजकीय दबदबा होता. 

1977 च्या कॉंग्रेसच्या पराभवानंतर कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे विश्वासू सहकारी सी. एम. स्टिफन हे गुलबर्गा येथून पोटनिवडणूक लढवत होते. त्या वेळी इंदिरा गांधी प्रचारासाठी गुलबर्गा येथे आल्या होत्या. तेव्हा विमानतळावर उद्योगपती व्यंकय्या गुत्तेदार व सातलिंगप्पा म्हेत्रे यांना बोलावून "यह उमेदवार जीतना चाहिए और इसकी जिम्मेदारी आप दोनों के कंधे पे है' असे इंदिराजी म्हणाल्या होत्या. 

सातलिंगप्पा म्हेत्रे हे कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक न्यायनिवाडे करीत होते व गरीब जनतेचे चालते-बोलते न्यायालय होते. त्यांच्या घरी अखंड अन्नदान चालत असे. त्यांचा सोलापूरच्या राजकारणात सुद्धा दरारा होता. त्यांचे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील, नामदेवराव जगताप, बाबूराव पाटील - अनगरकर, माधवराव पाटील (मुरूम), भाऊसाहेब झाडबुके यांच्याबरोबर मैत्रिपूर्ण संबंध होते. 

सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत खऱ्या अर्थाने सातलिंगप्पा हेच "किंग मेकर' असल्याने ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व शरद पवार हे सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्याशी संवाद साधत असत. त्यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त लोकसेवा युवक आघाडीने आयोजित केलेल्या नागरी सत्कारास एक लाखाचा प्रचंड असा जनसमुदाय उपस्थित होता. पाच वर्षांपूर्वी आयोजित केलेल्या सहस्रचंद्र दर्शन कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मातब्बर मंडळी व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्ज्वला शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, माजी मुख्यमंत्री धरमसिंग, बी. आर. पाटील, मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. 

गतवर्षी पार पडलेल्या ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात श्रीमंत शहाजीराजे भोसले शतकोत्तर वाचनालयाच्या वतीने त्यांना "जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सातलिंगप्पा म्हेत्रे हे अजातशत्रू, एकवचनी होते. वक्तशीरपणाबद्दल ते प्रसिद्ध होते. ते मितभाषी व मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांच्या अंत्ययात्रेस साश्रूपूर्ण नयनांनी माता भगिनींसह प्रचंड जनसमुदाय उसळला होता. 

प्रत्येकाच्या मनात भावना होत्या "अखेरचा हा तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत !' 

- अरुण जाधव, 
उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com