कष्टकरी माणसं लय भारी !

यशेंद्र क्षीरसागर, सातारा
Sunday, 6 September 2020

स्वतःचा आनंद शोधताना इतरांच्या दुःखाचा विचार केला तर आनंदाचे सौंदर्य झळाळून निघते. दुसऱ्याचे अश्रू समजले नाहीत, दुसऱ्याच्या वेदना समजल्या नाहीत तर स्वतःचा आनंद हा वांझोटा राहतो. तो एककल्ली राहतो आणि आपले आपणच नाचत राहतो. त्यानंतर त्या नृत्यात इतरांचा आनंद सहभागी नाही. झाल्यास आपले अंगण खऱ्या अर्थाने रिकामी राहते. दुसऱ्याचे दुःख आपल्या हृदयात सामील करून त्याच्यावर उपाय शोधत राहिलो, तर आपल्या आनंदाला एक वेगळाच साज चढतो.

स्वामी विवेकानंद म्हणतात, या जगात तीन शब्द महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे प्रेम, प्रेम आणि प्रेम!!. संत ज्ञानेश्वर म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला!!!,तर, शृंखला पायी असू दे, गीत गतीचे गात जाई! दुःखे उगळावयास आता, अश्रूंनाही वेळ नाही! पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू, निर्मितीच्या मुक्तगंगा द्या इथे मातीत वाहू..! अशा शब्दांत समाजसेवक बाबा आमटे यांनी दुःखांमध्येही सौंदर्य व्यक्त केले आहे. जीवनात आनंद शोधताना खरा आनंद कष्टाचा, हे स्वामी विवेकानंद म्हणतात. प्रार्थनेसाठी दोन हात जोडण्यापेक्षा मदतीसाठी एक हात पुढे करावा, खरंच जीवनात कष्टकरी माणसं जेव्हा भेटतात, तेव्हा अपरिमित आनंद होतो. जिल्हा परिषदेमध्ये विस्तार अधिकारी म्हणून काम करताना अशी अनेक कष्टकरी माणसं भेटली. एक उदाहरण म्हणून सांगावसे वाटते. एक कचरावेचक मावशी आहेत. त्या भेटल्या की साहेब, जय भीम असा नारा देतात. आनंदाने बघून हसतात. मग मीही त्यांना चहा पिण्यासाठी भेट म्हणून पैसे देतो. ते आनंदाने चहा पितात. कधी-कधी तर सेल्फीसाठी पोजसुद्धा देतात. अशी कष्टकरी माणसं खरंच लय भारी असतात. एखादा रिक्षावाला असो, एखादा हातगाडीवाला असो अथवा एखादा भाजीविक्रेता. त्यांच्याशी संवाद साधून पाहा. खूप छान वाटते. या माणसांच्या शब्दालासुद्धा कष्टाचा गंध असतो. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असते. या माणसांमध्ये आपलेपणा नसतो. जे कमवायचं ते आज खर्च करायचं. बॅंक बॅलन्सची काळजी नाही. अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव असतो. असे असंख्य अनुभव आले. बऱ्याच वेळा टू व्हीलरवर जेव्हा लिफ्ट देतो. तेव्हा तर अशा असंख्य लोकांशी मी संवाद साधला आहे. कुणी छोटासा दुकानदार असतो. कुणी रंगकाम करणार असतो, तर कुणी लग्नाच्या बॅंडमध्ये बाज्या वाजवणारा असतो. अशा लोकांशी बोलल्यावर दैवी समाधान मिळते. कष्ट करणारे घरातील विद्यार्थी हे तर वेगळेच रसायन असते. त्यांना ८५ व ९० टक्के गुण मिळाले, तर फारसे कौतुक लाभत नाही. कारण त्यांना तरीसुद्धा पहाटे उठून गाई, म्हशीचे शेण काढायचे असते, धारा काढायच्या असतात आणि दुधाचे वाटप करायचे असते. स्वतःचा आनंद शोधताना इतरांच्या दुःखाचा विचार केला तर आनंदाचे सौंदर्य झळाळून निघते. दुसऱ्याचे अश्रू समजले नाहीत, दुसऱ्याच्या वेदना समजल्या नाहीत तर स्वतःचा आनंद हा वांझोटा राहतो. तो एककल्ली राहतो आणि आपले आपणच नाचत राहतो. त्यानंतर त्या नृत्यात इतरांचा आनंद सहभागी नाही. झाल्यास आपले अंगण खऱ्या अर्थाने रिकामी राहते.
 
कवी नारायण सुर्वे म्हणतात, ‘वेदनेचाही वेद गाता आला पाहिजे.’ खूप शिक्षण घेतले आणि रस्त्यावरील एखाद्या गरीब भिकारी मातेचे दुःख अथवा मजुराचे दुःख समजले नाही, तर आपल्या संवेदनांवर लागलेला तो मोठा डाग आहे. दुसऱ्याचे दुःख आपल्या हृदयात सामील करून त्याच्यावर उपाय शोधत राहिलो तर आपल्या आनंदाला एक वेगळाच साज चढतो. स्वतःचा आनंद, स्वतःचे हास्य कधी आत्मकेंद्री, स्वार्थी नसावे. शिक्षणाचा अर्थ संवेदनशील नागरिक बनवण्यात लपलेला आहे. तशा अर्थाने पहिले तर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असोत की मदर तेरेसा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा भगतसिंग... या सर्वांनीच इतरांच्या दुःखांना आपले मानले. त्यामुळेच त्यांना खऱ्या अर्थाने जगता आले. ज्या वाटेत काटे पसरले आहेत, तीच वाट निवडली. कारण त्या वाटेवर चालून इतरांच्या जीवनात फुले फुलवता येतील, हे त्यांना निश्‍चितच माहिती होते आणि त्या फुलांचा सुगंध स्वतःच्या आयुष्यातही दरवळत राहतो. हे जीवनाचे गुपित त्यांना समजले होते. ‘तुम बेसहरा हो तो, किसी का सहारा बनो,’ अशोक कुमार यांचे हे गीत खूप गाजले होते. खरे तर या गाण्याच्या बोलामध्ये विरोधाभास आहे, असे वरकरणी वाटते. मी जर बेसहारा आहे, मला जर आधार नाही, तर इतरांचा आधार कसा बनणार, असे वाटू शकते. परंतु; हीच तर या वाक्‍यातील यशाचे, जीवनाचे आनंदाचे गुपित आहे. अण्णा हजारे, सिंधूताई सपकाळ, मेधा पाटकर , डॉ. रवींद्र कोल्हे अशा अनेक समाजसेवकांनी इतरांच्या अश्रूंचा जणू स्वतःच्या आनंदासाठी आधारच घेतला, असे म्हणूया... या सर्वांना स्वतः सुखी राहता आले असते. परंतु, त्यांनी इतरांचे दुःख दूर करण्याचा जणू विडाच उचलला. समाजसुधारणेच्या, समस्या निवारणाच्या आनंदात यांचे जीवन कृतार्थ झाले म्हणून स्वतः बेसहारा असेल आणि इतरांना सहारा दिला तर त्यातला आनंद अवर्णनीय असतो म्हणून तर जुनी जाणती लोकं म्हणायची घासातला घास दुसऱ्याला द्यावा. स्वतः अपूर्णत्व पूर्णत्वाकडे न्यायचे असेल, तर दुसऱ्याचे दुःख, दुसऱ्याच्या भावना, दुसऱ्याचे अश्रू यांचा अर्थ, किंमत आपल्याला कळली तर खरी एकात्मता निर्माण होते.
 
जगात वावरताना केवळ स्वतःचा विचार केला तर कदाचित यश मिळेलही, कदाचित संपत्ती मिळेलही, परंतु ती साजरी करताना आपण एकटेच असतो, दुसऱ्याचे दुःख जेव्हा आपण वाटून घेतो आणि त्या वाटेवर चालताना जेव्हा आपण आनंदी होतो, तेव्हा तो आनंद सर्वव्यापी असतो. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची थोर किंबहुना चराचर आपण झाला... असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात म्हणून विश्वाला घर मानले की परकेपणा संपून अद्वैताचा उदय होतो. भेदभाव संपून जातो म्हणूनच संत नामदेव म्हणतात, ‘एक तरी ओवी अनुभवावी!! संपूर्ण पसायदान पाठ असून, तुकोबांचे अभंग पाठ आणि कुसुमाग्रज, नारायण सुर्वे यांच्या कविता तोंडपाठ असून त्यातील एकही वाक्‍य जगता आले नाही तर ते सर्व व्यर्थ आहे!! अनेकांना असे वाटते की दुसऱ्यासाठी झटत राहून संघर्ष करून काय उपयोग? स्वतःकडे दुर्लक्ष होते. परंतु, इतरांचा विचार केला की आपल्या विचाराला प्रगल्भता येते. आपोआपच आपल्या समस्यांवर उत्तरे सापडत जातात. कारण इतरांचा आशीर्वाद, दुवा आपल्याला मिळत जातो आणि आनंदाने जगण्यासाठी इतरांचे दुःख समजून घेत राहिले पाहिजे. प्रत्येकाचे दुःख, समस्या आपल्याला दूर करता येणार नाही, हे तर सरळच आहे. परंतु, केवळ आपली स्नेहार्द नजर टाकली तरी त्या माणसाच्या चेहऱ्यावर एक विश्वासार्हता निर्माण होते आणि हा विश्वास आपल्याला आपल्या दुःखाच्या समस्या निराकरणकडे अलगद घेऊन जातो. संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी हीच बाब ओळखली आणि सुखाच्या सागरात डुंबत राहिले. हीच विश्वव्यापक भावना त्यांना अजरामर करून गेली. म्हणूनच आनंदी राहायचे ना... मग इतरांचे दुःख वेचित जावे.
 
आपण लवकरच अत्यंत आनंदाने, समाधानाने ज्यांची १५० वी जयंती साजरी करणार आहोत, ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ग्रामीण भागावर प्रचंड प्रेम केले. परिस्थितीने असेल किंवा कमी शिक्षण घेण्यामुळे असेलही. कष्टकरी माणसं खूप राबत असतात; परंतु घासातला घास काढून देतात. पाहुणे जेवण थोडं नाजूक आग्रह करतात. त्यावेळी खूप बरे वाटते. विशेषतः संस्कृती ग्रामीण असते. त्यांनी खेड्याकडे चला, असा महत्त्वपूर्ण संदेश दिला. ग्रामीण जीवन, ग्रामीण लोक, ग्रामीण संस्कृती आणि एकंदरीतच गावगाडा यातील गोडी अविट असते. शासन असो सामाजिक जीवन असो, सामाजिक संस्था असोत किंवा समाजासाठी झटणारे शांतपणे कार्य करणारे समाजसेवक असोत, हे सर्वच घटक एकंदरीत समाजव्यवस्थेला मानवी चेहरा कसा देता येईल, याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. हा मानवी चेहरा प्रदान करीत असताना समाजातील सर्वच घटक मग ते किशोरवयीन मुले-मुली असोत, बालक असोत, प्रौढ व्यक्ती असोत की ज्यांच्या आशीर्वादाची आपल्याला नितांत गरज असते, अशा वृद्ध व्यक्ती असोत अशा सर्वच घटकांचा सांगोपांग विचार करूनच समाज एकजिनसी बनत असतो. या सर्व विचार मंथनामध्ये ग्रामीण भाग हा आनंदाचा गाभा असतो. सुखाची पर्वणी असते. मनाची शांतता जिथे नांदते आणि निर्मळ आपलेपणाचा झरा जिथे वाहतो, तो ग्रामीण भाग हा नव्या भारताचा सुद्धा आत्माच असला पाहिजे. ग्रामीण भागातील माझ्या बंधू-भगिनींना, बालक मित्रांना आणि सर्वच ज्येष्ठांना बरोबर घेऊन ग्रामीण भागातील माती अद्‌भूत सुगंध घेऊन येते. स्नेह घेऊन येते. पावसाचा पहिला थेंब मातीला अत्यंत मूलभूत, अर्थगर्भ आणि जीवनाच्या जीवनाच्या गाभ्याशी स्थिर राहणारा अर्थ प्रदान करतो. मन मोहरून जाते. आपली माणसं हृदयात घट्ट रुतून बसलेली असतात. या माणसांच्या भल्याचा विचार करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य असते. विशेषतः सुशिक्षित घटक यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो.
 
ग्रामीण भागासाठी काम करणे हा अपरिमित आनंद आहे. कुणासाठी काही करू शकलो, तर त्यासारखे दुसरे अपार समाधान नाही. शेती असो, शिक्षण असो, समाजकल्याण असो, ग्रामपंचायत विभागासह अंगणवाड्यांचा बालविकास विभाग असो की बांधकाम विभाग असो या सर्वच विभागांचा खरा आत्मा हा ग्रामीण आहे. शहरी बंधूही आपलेच आहेत आणि त्यांचीही खरी नाळ मातीशी म्हणजेच ग्रामीण भागाशी जोडलेली असते. हा देखील मुद्दा इथे महत्त्वाचा आहे. प्रशासनात काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे ग्रामीण भागातील लोकांचा गोड स्वभाव आणि आपण त्यांचे एखादे काम केल्यावर, सहकार्य केल्यावर त्यांच्या डोळ्यातून दिसणारी अपार कृतज्ञता!! हीच कृतज्ञता आपल्याला बळ देते ऊर्जा. प्रगतीचे फुगलेले मनोरे तेथे साद घालत नाहीत. लग्न असो, जत्रा असो की बारसे असो... सर्वच बाबतीत ग्रामीण जनता एकत्र येते. भगतसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर असो की डॉ. अभय बंग, राणी बंग, बाबा आमटे, प्रकाश आमटे असे महान समाजसेवक, समाजसुधारकांच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एकच समान धागा आहे, तो म्हणजे अविरत कष्ट करणे. या सर्वांनीच कष्टावर प्रेम केले. अजूनही जे अविरतपणे कष्ट करीत आहेत. स्वतः प्रचंड संपत्ती कमावून तीच खरी समाधानी आहेत. याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे केवळ ७० वर्षे वयाचा तरुण अमिताभ बच्चन हे होत. प्रचंड संपत्ती असूनही कष्टावर प्रेम करणारा हा माणूस अजूनही रोज १६ तास काम करतो. सुपरस्टार आहेत, खूप मोठे अभिनेते आहेत. अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे. ‘ब्लॅक’ ‘अग्नीपथ’ अशा चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत. इतकं सगळं करूनही ते कष्टकरी माणूसच आहेत, अशी प्रत्येक क्षेत्रात उदाहरणे आहेत. वयाच्या ऐंशीच्या घरात असूनही कवी गुलजार हे पहाटे पाचला उठतात. स्वतःच्या ऑफिसला सकाळी दहा वाजता जातात. संध्याकाळी सहापर्यंत ऑफिसमध्ये लेखन करतात आणि मग घरी येतात. त्यांना सुद्धा किती तरी राष्ट्रीय पुरस्कार, उत्कृष्ट गीतकार म्हणून मिळाले आहेत. पुरस्कार मिळाले आहेत तरी ते थांबत नाहीत. कवी जावेद अख्तर यांचेही तसेच आहे. प्रत्येक क्षेत्रात अशी माणसे आपल्याला बघायला मिळतात.
 
गरीब कष्टकरी माणसं आणि श्रीमंत कष्टकरी माणसं यामध्ये हा एक समान धागा आहे. त्या दृष्टीने हे दोन्ही घटक आहेत. बऱ्याच वेळेला आपण आपल्या सहकाऱ्यांमध्ये रमून जातो. दंग होतो आणि आपले ज्ञान सीमित राहतो. आपण विविध कष्टकरी, भाजी विकणारे विक्रेते तसेच फळ विक्रेता असो, हातगाडीवाला असो, रिक्षावाला असो, चालवणारा ड्रायव्हर असो पण संवाद साधत नाही. त्यामुळे एका जीवन अनुभूतीला आपण मुकतो. विचार मंथन होत नाही. आपण आपल्या समस्यांमध्ये गुरफटून राहतो. कदाचित हे सर्व वाचताना वाचकाला अशी शंका येईल. ती त्यांच्याशी बोलून आपल्या समस्या कशा मिळणार. पण, तेच तर खरेच गमक आहे. एका गाण्यात म्हटले आहे, ‘बेसहारा हो तो किसी का सहारा बनू.’ आपण त्यांचा जर शाब्दिक आणि प्रेमळ सहारा झालो तर त्यांच्यापासून जे बळ मिळेल ते आपल्या समस्या सोडवायला निश्‍चितच उपयोगी पडते. खिशात दोन रुपये जरी असतील तरी त्यातला एक रुपये देण्याची दानत असेल तर ते कष्टकऱ्यांना खूप आवडते. कारण देणे हा त्यांचा गुणधर्म असतो. बऱ्याच वेळा उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत वर्ग लाभल्यावर आपल्याला अधिक लालच आणि लालसा निर्माण होते आणि तिथेच खरे तर आपले चुकते, कारण आपल्या हृदयातला कष्टकरी माणूस हळूहळू मर जावू प्रगतीला किंबहुना प्रगती नावाची सूज आहे. तिला हपापलेला माणूस घेतो म्हणून आपण कष्टकऱ्यांची सतत संवाद साधत राहिले पाहिजे. त्यांच्यातही बरे-वाईट लोक असू शकतात परंतु; आपण बोलत राहिले पाहिजे. नक्कीच त्यांचे कौतुक आपल्याला मिळतं. त्यांची काही मिनिटांची साथ सुद्धा आपल्याला खूप काही देऊन जाते. एका आजोबांना मी जेव्हा टु व्हिलर गिफ्ट दिली आणि त्यांना त्यांच्या आश्रमात सोडलं, तेव्हा ते गरीब आजोबांनी मला तुझे भले होईल, असा मोठा आशीर्वाद दिला. तो दिवसच माझा सुंदर होता. अनेक वेळा असे होते की अत्यंत गरीब रिक्षावाला असतो. वय सत्तरीच्या आसपास असते आणि आपल्याकडे सुट्टे पैसे नसतात. त्याला बिनधास्त पाच हजार रुपये द्यावेत आणि सांगावं ‘चहा पिऊन जा, कुठे तरी रस्त्यात माझ्यातर्फे!’ त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा ईश्वरप्राप्तीचा आनंद आपल्याला होईल. एकंदरीतच कष्टकरी माणसं लय भारी असतात. सतत घामाची आठवण करून देतात. स्वार्थापासून दूर ठेवतात. खऱ्या निसर्गाचा आनंद भोगण्यासाठी उद्युक्त करतात.

संपादन : दिलीपकुमार चिंचकर

इतर ब्लॉग्स