esakal | तंत्र आणि सुटकेचा मंत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Technology

तंत्र आणि सुटकेचा मंत्र

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

दिवस बदलत आहेत. ऋतू बदलत आहेत. माणसंही बदलत आहेत. खरं तर नेहेमीच बदलतात. पण, आज काल जरा जास्तच वेगानं बदलतायत. म्हणजे बदलण्याचा वेगही बदललाय म्हणूयात आपण. या बदलांची कारणं अनेक आहेत अर्थातच. पण, बदलाच्या या वायूवेगाचं साधन आणि कारण आहे तंत्रज्ञान. हे युग आपली ओळखंच ‘तंत्रज्ञानाचं युग’ अशी सांगतं.

तंत्रज्ञान (technology) ही आमची गरज झाली आहे का? जगण्याच्या गरजाही बदलल्यात जणू! अन्न-वस्त्र-निवाऱ्यात आता विनोदानं का होईना मोबाईल-इंटरनेट-वायफाय (mobile internet wifi) या आधुनिक त्रिकुटाची भर पडली आहे. तंत्रज्ञान हे नव्या पिढीच्या जन्माआधीच त्यांच्या जीवनात घुसतं आहे. दुर्दैवानं तंत्रज्ञान मृत्यूचीही सोबत करतं आहे; नव्हे कित्येकदा मृत्यूचं कारणसुद्धा ठरतं आहे! पण, तरीदेखील आपण तंत्रज्ञान नाकारू शकतच नाही. तंत्रज्ञान आमची गरज बनली आहे! (satara marathi news national technology day article dr animish chavan)

काय आहे तंत्रज्ञान? विज्ञानाचं अपत्य म्हणूयात? की विज्ञानाचं उपायोजन केवळ? काहीही म्हटलं तरी तंत्रज्ञान आज आमच्या जीवनात खूप खोलवर घुसलंय, हे मान्य करावंच लागेल. इतकं खोलवर की जीवनातून दूर करणं कठीण व्हावं. तंत्रज्ञान ही आमची गरज झाली आहे का? जगण्याच्या गरजाही बदलल्यात जणू! अन्न-वस्त्र-निवारा या चिरकालीन त्रिकुटात आता विनोदानं का होईना मोबाईल-इंटरनेट-वायफाय या आधुनिक त्रिकुटाची भर पडली आहे आणि विनोद तरी काय असतो? जीवनातलं बोचरं वास्तवच हलक्‍या हातानं सांगण्याचं काम विनोद करीत असतो, नाही का!

तेव्हा, तुम्हा-आम्हाला आवडो अथवा न आवडो, तंत्रज्ञान हे नव्या पिढीच्या जन्माआधीच त्यांच्या जीवनात घुसतं आहे आणि जगण्याची अखंड सोबत करतं आहे. दुर्दैवानं तंत्रज्ञान मृत्यूचीही सोबत करतं आहे; नव्हे कित्येकदा मृत्यूचं कारणसुद्धा ठरतं आहे! पण, तरी देखील आपण तंत्रज्ञान नाकारू शकतच नाही. तंत्रज्ञान आमची गरज बनली आहे!

हेही वाचा: लसीकरण केंद्र ठरताहेत सुपर स्प्रेडर; आमदार शिंदेंचा निष्कर्ष

माणसाच्या गरजा दोन प्रकारांत विभागता येतील. जीवन जगण्याच्या गरजा आणि जगणं समृद्ध करण्याच्या गरजा. कोणी तरी म्हटलंच आहे ना की, तुम्हाला मिळालेल्या दोन पैशांतील एका पैशानं भाकरी विकत घ्या, जी तुम्हाला जीवन देईल; आणि दुसऱ्या पैशानं एक फूल विकत घ्या, जे तुम्हाला जीवन का जगायचं आणि कसं जगायचं हे शिकवेल! माणूस केवळ जगत नसतो; तो आपापल्या परीनं स्वत:चं आणि आपल्या भोवतीच्यांचंसुद्धा जगणं समृद्ध करीत असतो; निदान प्रभावित तरी करीत असतो. तंत्रज्ञान यांत कुठं-कुठं डोकावतं? जीवन जगण्याच्या आणि जीवन समृद्ध करण्याच्या अशा दोन्ही प्रकारच्या गरजा तंत्रज्ञान भागवतं. जीव निर्माण करणं, त्या जिवांचा या जगातला प्रवेश सुकर करणं, त्यांची जोपासना करणं, त्यांना जगण्याच्या लढाईसाठी सक्षम करणं, जीवन जगविण्यासाठी वैद्यकीय साह्य करणं, जीवन सुकर करणं आणि शेवटी मरणही कमीत-कमी वेदनादायक करणं...

हे सारं तंत्रज्ञान करू शकतं आणि खूपशा प्रमाणात करंतही आहेच. त्याखेरीज, हे जगणं अनेक पटींनी सक्षम, सुलभ, सुसंवादी आणि समृद्ध करण्यासाठी तंत्रज्ञान खूप मदत करू शकतं. किंबहुना, या कारणांसाठीचाच तंत्रज्ञानाचा वापर हा जास्त प्रमाणात होताना दिसत आहे. टीव्ही, काम्प्युटर्स, इंटरनेट, वायफाय, मोबाईल फोन्स, मोबाईल गेम्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ही तंत्रज्ञानाची सुपरिचित रूपं ही जीवन जगण्याच्या गरजांपेक्षा जास्त प्रमाणात जगणं समृद्ध करण्याच्या कामी येताना दिसत आहेत.

माणसाच्या गरजा या दोन्ही प्रकारच्या असल्या तरी त्यांचा क्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. जीवन जगणं आधी आणि ते सुलभ-समृद्ध करणं नंतर असाच क्रम असायला हवा. नाही तर ही सुलभता स्वत:च्या किंवा इतरांच्या जगण्याच्या आड येऊ शकते! एखादी सुविधा आपण का आणि किती वापरायची, याचं भान राहण्यासाठी हा क्रम लक्षात ठेवायलाच हवा! आज तंत्रज्ञानाचा वापर आपल्या जीवनात करताना हा क्रम आपण विसरतो आहोत का? तंत्रज्ञान ही मानवी जीवनातील गरज होत असतानाच ती मानवी जीवनाची समस्यासुद्धा बनावी, याचे सर्वांत महत्त्वाचे कारण जगण्याहून अधिक प्राधान्यक्रम जगण्यातील सुलभतेला दिला जाणं हेच आहे! आज-काल मोबाईल्स आणि इंटरनेट, सोशल मीडिया यांचा वापर ही घराघरांतील समस्या, वादविवाद, दु:खे यांची कारणं बनत आहेत. त्यामुळे या बाबतच्या इतरही कारणांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

हे तंत्रज्ञान जितक्‍या सहजतेनं सर्वांच्या हातात पोचतं आहे तितक्‍याच सहजतेनं ते तंत्रज्ञान सुरक्षितरित्या हाताळण्याचं प्रशिक्षण आपण देत आहोत का? समाजानं याचा विचार खूप तातडीने करायला हवा. आपण आपल्या स्वत:ला किंवा आपल्या मुलांना तंत्रज्ञानाचा वापर रोखायला सांगण्यात जितकी शक्ती आणि वेळ वाया घालवित आहोत, त्याच्या काही प्रमाणात जरी आपण हे प्रशिक्षण उपलब्ध केले तरी खूप संकटे आणि दु:खे आपण टाळू शकू. त्याचबरोबर लक्षात घेण्याची आणखी एक बाब म्हणजे तंत्रज्ञानाच्या अतिरिक्त वापराचा दोष तंत्रज्ञानाच्याच माथी मारणे हे कितीही सोपे आणि सोईचे असले तरी खरे नक्कीच नाही! एखाद्या व्यक्तीनं खांबाला घट्ट मिठी मारून बसावं आणि ही मिठी न सुटण्याला खांबालाच जबाबदार धरावं हे कसं होईल? मुले किंवा कोणीही व्यक्ती मोबाईल्स, इंटरनेट, सोशल मीडिया यांच्या आहारी जातात, तेव्हा त्यामागे निश्‍चित अनेक मानसिक कारणं असतात.

जीवनातील ताण हाताळता न येणं, आत्मप्रतिमा कमकुवत असणं, सोशली कनेक्‍टेड असण्याची कृत्रिम आणि अनैसर्गिक गरज अशा काही मानसिक कारणांनी अनेक जण मोबाईल्स किंवा सोशल मीडिया वगैरेंमध्ये गुंतून राहतात. त्यांना केवळ दोष देऊन अथवा उपदेश करून भागत नाही; तर त्यांची मानसिक कारणे ओळखून दूर करण्यासाठी मदत, प्रशिक्षण द्यावे लागते. असे उपाय करणं हे सोपं नसलं तरी अशक्‍यसुद्धा नाहीच ना? गरज आहे आपण आपले डोळे उघडून वास्तवाचा स्वीकार करण्याची!

- डॉ. अनिमिष चव्हाण, मनोविकारतज्ज्ञ, सातारा.

हेही वाचा: हळू चालणारेच दूरपर्यंत जातात

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा

loading image
go to top