कलेचे एक अनोखे रूप 

कलेचे एक अनोखे रूप 

लोगो : आजचे विचारधन 
सदर : निर्मितीचा सोहळा 
लेखक : शर्वरी लथ 

कलेचे आपल्या जीवनातील महत्त्वाचे रूप म्हणजे साहित्य अर्थात वाङ्‌मय. साहित्य हे समाजाला सत्य व कल्पनेशी जोडत असल्याने आपल्या रोजच्या जीवनात याचे स्थान खूप अनन्यसाधारण असते. विद्यार्थ्यांसाठी साहित्य हा शिक्षणाचा प्रमुख घटक आहे. कारण विद्यार्थ्यांना ते कलेच्या माध्यमातून स्वत:चे प्रतिबिंब बघायला शिकविते. त्यांना जीवन व सत्याची शिकवण यामुळचे मिळते. अक्षरांशी ओळख वा परिचय हा लिटरेचर या शब्दाचा ऑक्‍सफर्ड इंग्लिश डिक्‍शनरीतील अर्थ. लिटरेचर हे नाव लॅटिन शब्द "लिटरा'पासून आले असून, लिहिलेले प्रत्येक अक्षर वा चिन्ह हा याचा अर्थ आहे. लिखाणाचा संग्रह ही याची सर्वसाधारण ओळख. पाश्‍चिमात्य संस्कृतीत गद्यभाषा- ललित म्हणजे फिक्‍शन व ललिततेर म्हणजे नॉन-फिक्‍शन, कविता व नाट्य यांचा यात अंतर्भाव असतो. 

गद्यभाषा (प्राजे) औपचारिक मेट्रिकल संरचना नसलले हे भाषेचे रूप. ओघवती भाषा व व्याकरणाची रचना असल्याने हे लयबद्ध पारंपरिक काव्यापेक्षा वेगळे असते. आपले रोजचे संभाषण गद्यभाषेतच असते. आपण विचार व लेखनही गद्यभाषतेच करतो. यात सौंदर्यानुभवापेक्षा व्याकरणाला धरून केलेली सरळ सोप्या भाषेतील वाक्‍ये परिच्छेदाच्या स्वरूपात असतात. जणू काही हे संभाषणाचे प्रतिबिंबच असते. चार्ल्स डिकन्स, लिओ टॉलस्टॉय यांनी त्यांच्या कादंबऱ्यांसाठी, तर नेल्सन मंडाले, मार्टिन ल्युथर किंग यांनी आपल्या भाषणात गद्यभाषेचा खुबीने उपयोग केला आहे. ख्यातनाम मराठी लेखक कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, रणजित देसाई यांच्यासारखे अनेक लेखक प्रसिद्ध आहेत. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांची प्रखर जहाल भाषणेही यासाठीच प्रसिद्ध आहेत. 

संवाद व सादरीकरणातून ललित साहित्याला मूर्त स्वरूप देण्याचा मार्ग म्हणजे नाटक. कृतीच्या अनुकरणावर आधारित हा साहित्यप्रकार असून, रंगभूमी, दूरचित्रवाणी, आकाशवाणी व सिनेमांसाठी हे लिहिले जाते. अगदी सोप्या शब्दांत सांगायचेच झाले तर नाटक ही गद्य व पद्याच्या माध्यमातून संवाद वा मूकनाट्याच्या अनुषंगाने सादर केलेली गोष्ट असते. यात कलाकार भूमिकेतील संघर्ष रंगमंचावर रसिकांसमोर सादर करतात. जे लोक रंगभूमीसाठी नाटक लिहितात त्यांना नाटककार म्हटले जाते. नाटकाचे काही लोकप्रिय प्रकार खालीलप्रमाणे आहेत. 

कॉमेडी : आनंदी व हलक्‍या-फुलक्‍या नाटकांचा हा एक प्रकार आहे. यात प्रेक्षकांना हसविणे हे नाटककाराचे मुख्य उद्दिष्ट असते, म्हणूनच असाधारण घटना, अफलातून भूमिका व आकर्षक शेरेबाजी याचाच भाग असतो. 

ट्रॅजेडी : नाटकाच्या या प्रकारात मृत्यू, दुर्घटना अशा क्‍लेशदायी भूमिका अथवा गोष्ट नाटकाद्वारे साकारली जाते. 
फार्स : म्हणजे जलदगतीचे हावभाव व शारीरिक हालचालींमार्फत घडणारा विनादोचा प्रकार आहे. तसेच याला एक असंभवनीय हास्यप्रकारदेखील म्हणता येईल. प्रसिद्ध फार्स सादरकर्त्यांपैकी बबन प्रभू, आत्माराम भेंडे ही काही निवडक उदाहरणे. 

मेलोड्रामा : हा एक अतिशयोक्तीपूर्ण सनसनाटी, खळबळजनक, प्रेक्षकांच्या विचारशक्तीला आव्हान देणारा, भावनांशी खेळ करणारा नाट्यप्रकार आहे. फार्सप्रमाणे येथेही साधी साचेबंद व एक परिणामाची पात्रे असतात. 

म्युझिकल ड्रामा- संवाद व अभिनयाव्यतिरिक्त नृत्य व संगीताच्या माध्यमातून येथे गोष्ट सांगितली जाते. काही गंभीर विषय जरी यात हाताळले गेले असले, तरी सर्वसाधारणपणे या सांगतिका हलक्‍या-फुलक्‍या असतात. प्रसिद्ध इंग्रजी नाटके "द फॅन्टम ऑफ द ऑपेरा', "अडू अबाउट नथिंग' त्याचप्रमाणे मराठीतील "नटसम्राट', "सौभद्र', "शाकुंतल' इत्यादी संगीत नाटके या प्रकारात मोडतात. वेगवेगळ्या प्रकाराची अत्यंत गाजलेली ही संगीतनाट्ये आहेत. बालगंधर्व, विश्‍वनाथ बागूल, कीर्ती शिलेदार ही काही संगीतनाट्ये सादर करणाऱ्या कलाकारांची नावे. 

कविता/काव्य : तीव्र अनुभवांच्या जाणिवेला भाषेच्या माध्यमातून अर्थ, नाद, ताल व लय देणारा हा भाषेचा एक आविष्कार. भाषेची अभिव्यक्ती लिखाणाव्यतिरिक्त तोंडीही होते. दीर्घकाव्य, दंतकथा, पौराणिक कथा, लोककथा, कथाकाव्य, पोवाडा आणि इतर कवितांचा मौखिक स्वरूपात प्रसार झालेला दिसतो. कविता वा काव्य हे इतिहासपूर्व काळापासून अस्तित्वात असून, ख्रिस्तपूर्व 25 व्या शतकात पिरॅमिडच्या मजकुरात आफ्रिकेतील पहिल्या काव्याचा संदर्भ सापडतो. प्रेम, दया, द्वेष, धर्म, राजकारण, पर्यावरण यांसारखे वेगवेगळे विषय मांडण्यासाठी याचा वापर केला जातो. भारतीय काव्यक्षेत्रात कालिदास, रवींद्रनाथ टागोर, मिर्झा गालिब, राम गणेश गडकरी, शांता शेळके आदींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. साहित्यावर ऑस्कर वाइल्डने सुंदर भाष्य केले आहे. तो म्हणतो, की "जीवनाची पूर्वकल्पना साहित्यात असते, ते त्याची नक्कल करत नाही तर उद्देशांनुसार त्याला आकार देते, त्यावर संस्कार करते जे खूप महत्त्वाचे असते.'  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com