BLOG : ...म्हणून शिवजन्मोत्सव पाच दिवसांचा हवा!

shivaji maharaj
shivaji maharajesakal

प्रा. डॉ. हरिभाऊ भापकर

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी व प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीला समजावण्यासाठी आपण महाराजांच्या प्रतिमेची स्थापना घराघरामध्ये १९ फेब्रुवारी पासून पाच दिवसांसाठी करावी असे मला वाटते.

या पाच दिवसांमध्ये कुटुंबातील सर्व मंडळींनी एकत्र येऊन महाराजांविषयी, त्यांच्या कार्याविषयी चर्चा करावी, नवनवीन पुस्तके वाचावीत. या निमित्त महाराजांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये जाणून घ्या, ज्यामुळे तुम्ही आयुष्यातील प्रत्येक संकटाचा सामना करताना खंबीरपणे व संपूर्ण आत्मविश्वासाने पुढे जाल, याचा मला ठाम विश्वास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाची महानता दर्शवणारी काही वैशिष्ट्ये पाहूया.

रयतेवर जीवापाड प्रेम: महाराजांनी रयतेवर, मावळ्यांवर जीवापाड प्रेम केले. जातीपातीच्या भिंती तोडून सर्वांना सम्मान दिला. रयतेचे सर्व प्रश्न समजून घेऊन त्यावर वेळीच उपाययोजना केली, म्हणून फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच रयतेचा राजा म्हंटल जात.

निर्भीडपणा आणि जिद्द: भय हा शब्द महाजांच्या शब्दकोशामध्ये नव्हताच. आपल्यापेक्षा प्रबळ शत्रूला महाराज कधीही घाबरले नाहीत किंवा कधी शत्रूला दुर्बल समजलेही नाही. महाराजांनी संयमाने प्रत्येक संकटाचा सामना केला. जिद्दीने, चातुर्याने,अंदाज आणि बुद्धी वापरून महाराजांनी कल्पनेपेक्षाही मोठ्या संकटावर मात करत प्रचंड यश संपादन केले.

दूरदृष्टी: महाराजांना खूप व्यापक दूरदृष्टी होती. स्वराज्य वाढवण्यासाठी व टिकवण्यासाठी काय काय करायला पाहिजे याचा वेगवेगळ्या प्रकारे विचार करून त्याप्रमाणे योजना आणल्या गेल्या. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गडकिल्ले, जलदुर्ग इत्यादी. हा खूप मोठा वारसा आहे जो आजही महाराष्ट्र मोठ्या अभिमानाने मिरवत आहे.

गनिमी कावा: महाराजांनी काही मावळ्यांच्या मदतीने, गनिमी कावा या युद्ध कौशल्याने शत्रूच्या प्रचंड सैन्यालाही पराभूत केले. शत्रूची ताकद आपल्यापेक्षा मोठी असूनही त्यांना पराभूत करण्यासाठी वापरलेले युद्ध कौशल्य म्हणजे गनिमी कावा.

व्यवस्थापन: युद्ध कोठे व कधी करावे त्यासाठीची अचूक योजना महाराज आखत असत आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत असे. रयतेच्या कल्याणासाठी महाराज नेहमी अग्रेसर असायचे. म्हणूनच महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर विविध खात्यांची नियोजन करणारे आणि रयतेचे प्रश्न सोडवणारे अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. महाराजांचा एक एक गड किल्ला म्हणजे स्थापत्यशास्त्र, व्यवस्थापन आणि गनिमी काव्याचे प्रतीकच होते.

न्याय व सर्वधर्मसमभाव: शिवाजी महाराज रयतेला आपले कुटुंब मानत असत, त्यामुळे त्यांनी कधीही नातेवाईक, मित्र व रयत या मध्ये भेदभाव केला नाही. महाराज हिंदू असूनही इतर धर्माचा त्यांनी कधीही अनादर केला नाही. स्वराज्यात व दुर्बलांवर स्त्रियांवर अन्याय, अत्याचार व हिंसाचार करणाऱ्याना महाराजांनी कठोर शिक्षा केल्याची अनेक उदाहरणे आहेत.

योग्य सहकाऱ्यांची निवड: महाराजांनी नेहमीच योग्य व्यक्तीला योग्य पद दिले, त्यामध्ये त्यांनी कधीही आपला व परका असा भेदभाव केला नाही.

लवचिकता: कोणत्यावेळी युद्ध करावे व कधी दोन पावले मागे घ्यावी, हे महाराजांना चांगलेच माहित होते. म्हणूच कधी लढाई हरले किंवा तह केला तरी महाराज पुन्हा नव्याजोमाने पुढच्या कार्यासाठी सर्वाना तयार करत असत.

सातत्य: महाराजांमधील सर्वात महत्वाचा गुण म्हणजे कामातील सातत्य. ते नेहमीच स्वराज्याच्या कामात व्यस्त असत. महाराजांमध्ये चिकाटी हा गुण होता त्याचा प्रत्यय त्यांच्या कृतीतून आपणाला वेळोवेळी जाणवतो.

म्हणूनच आजच्या काळामध्ये महाराजांचे गुण तरुण पिढीमध्ये आणण्यासाठी १९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या काळामध्ये प्रत्येक घराघरांमध्ये महाराजांच्या मूर्तीची / फोटोची स्थापना करावी, असे मला वाटते. घरातील प्रत्येकाने महाराजांचे स्मरण करून हर हर महादेव असा जयघोष करत महाराजांचे कोणते गुण आपण अंगिकारणार आहोत याची शपथ घ्यावी. या गोष्टीची सुरुवात मी व माझ्या कुटुंबाने तीन वर्षांपूर्वीच केली आहे. आपणही याची सुरुवात कराल याची मला खात्री आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादासोबतच विचार घेऊया,

महाराजांना अपेक्षित स्वराज्य घडवूया… शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा !!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com