
सोशल डिकोडिंग - राजकारणात यायचंय...
राजकारणात यायचंय; विशेष म्हणजे थेट निवडणुकीच्या राजकारणात यायचंय; पण तिथे तरुणांना संधी नाही किंवा घराणेशाहीच चालते ही चर्चा नवीन नाही. राजकारणात प्रवेश करताना आपापलं राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी सर्व तरुण नेते वेगवेगळी शक्कल लढवताना दिसतात.
उदाहरणार्थ, एखादं प्रतिष्ठान किंवा सामाजिक संस्था सुरू करून त्याअंतर्गत रोजगार मेळावे, सांस्कृतिक कर्यक्रम, freebies distribution, आरोग्य शिबिर असे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात. यामध्ये कार्यकर्ते जोडून घेणं, लोकांशी थेट संपर्क वाढवणं आणि स्वतःची ‘व्हिजिबिलिटी’ वाढवणं, असे हेतू साध्य होणं अपेक्षित असतं.
कार्यक्रमांतून किंवा सामाजिक संस्थेच्या मंचावरून लोकांशी संवाद साधताना ठराविक वर्गापर्यंत पोचणं शक्य होतं. यामध्ये गरजू लोक, महिला, कुटुंब यांचा प्रामुख्यानं समावेश असतो. इतर वर्गापर्यंत कमीत कमी वेळेत पोचण्यासाठी संस्थात्मक रचनेचा फायदा होतो. यामध्ये पतसंस्था, साखर कारखाने, शाळा - कॉलेज यांसारख्या मोठ्या संस्थांचा समावेश होतो. यापैकी अनेक संस्थांचं पाठबळ घराणेशाहीच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतं.
याशिवाय चळवळीच्या राजकारणातून समोर येणारं नेतृत्वही आपण गेल्या दशकभरात उदयाला येताना बघितलं आहे. त्यात हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणीपासून कन्हैयाकुमारपर्यंत नेते राजकारणात सक्रिय होताना दिसतात. पण, विचारांचं राजकारण आणि निवडणुकीचं राजकारण हे दोन स्वतंत्र भाग या प्रत्येक नेत्याच्या बाबतीत ठळकपणे समोर आले आहेत.
सर्वसामान्यांना राजकारणात जागाच नाही, हा समज गेल्या दशकाभरातच समोर आलेल्या अनेक राजकीय प्रयोगांनी फोलही ठरविला आहे. यामध्ये आंध्र प्रदेशमधील लोकसत्ता पार्टीसारखे काही मर्यादित यशाचे प्रयोग आहेत, तर अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’सारखे व्यापक यशस्वी प्रयोगही आहेत.
‘सातत्य’ महत्त्वाचं
ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल म्हणतात, ‘‘राजकारण म्हणजे उद्या, पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात आणि पुढच्या वर्षी काय घडणार आहे हे सांगण्याची क्षमता. आणि आपल्या अंदाजाप्रमाणे का घडले नाही हेही नंतर स्पष्ट करण्याची क्षमता राजकारणात असावी लागते.’’
म्हणजेच राजकारणात यायचं असेल, तर जनभावना ओळखण्याची समज, त्यासाठीचं सामाजिक आकलन, वैयक्तिक प्रभाव (influence), आपल्या भवतालातील प्रभावशाली लोकांशी वैयक्तिक संबंध (networking) आणि नेतृत्वगुण असणं आवश्यक आहे.
तुमचं प्रभावक्षेत्र ठरवा. यामध्ये फक्त मतदारसंघ निवडणं इतका मर्यादित अर्थ अपेक्षित नाही तर नेतृत्व म्हणून सातत्यानं काम करता येईल, मांडणी करता येईल असं क्षेत्र निवडण्याकडे प्राधान्य हवं. उदाहरणार्थ : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका अभिनयातून साकारली आणि हाच धागा पकडून आपलं राजकीय नियोजन आणि मांडणी केलेली सातत्यानं बघायला मिळाली.
अनेकदा एखादं विशिष्ट क्षेत्र निश्चित करूनही तरुण आपल्या कामाला सुरुवात करताना दिसतात. यामध्ये ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य अशा क्षेत्रांना अधिक प्राधान्य असतं. या क्षेत्रांतर्गत रचनात्मक उपक्रम राबवताना लोकांशी थेट संपर्क साधणं हा हेतू असला,
तरी लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठीचं कम्युनिकेशन मॉडेल, डेटा आणि त्याचा सातत्यानं सुयोग्य वापर करण्याचं नियोजन आवश्यक आहे. या सगळ्यांत एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ‘सातत्य’...स्वतःचं सूत्र बनवा, त्यात सातत्य ठेवा आणि उचला पाऊल नेतृत्वासाठी...