ज्याचं मन मोठं त्याचं आयुष्य मोठं ; वय ठरतं मनावर

special article of archana mule in sangli on the topic of age depends on our mind
special article of archana mule in sangli on the topic of age depends on our mind

सांगली : मनुष्य, मानव, माणूस या तीनही शब्दांमध्ये एक समान शब्द लक्षात येतो तो आहे मन. मनुष्य या शब्दामधे तर दोन अर्थपूर्ण शब्द मिळतात ते म्हणजे मन आणि आयुष्य. ज्याचं आयुष्य मनाबरोबर चालतं आणि मनाबरोबरच संपतं तो म्हणजे मनुष्य. जो आयुष्यात मनाला महत्त्व देतो. मनाला समतोल ठेवण्याची कला अवगत करतो तो मनुष्य. 

ज्याचं मन मोठं त्याचं आयुष्य मोठं. ज्याचं मन आनंदी त्याचं आयुष्य आनंदी. मानवी शरीराचं वय कितीही वाढलं तरी त्याच्या मनाचं वय हे नेहमीच तरुण आणि उत्साही असू शकतं. शेवटपर्यंत मन ताजं टवटवीत असेल तर शरीराचं थकणं लांबणीवर पडू शकतं. शरीर मनाचा गुलाम असतं. म्हणून मन टवटवीत तर शरीरसुद्धा टवटवीत राहणार यात शंकाच नाही. याचाच अर्थ आयुष्याची नाडी मनाच्या हातात असते. 

स्वत:च्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी मनाला विचारांची दिशा द्यावी लागते. मनाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्या त्यावेळी मिळवावी लागतात. अनुत्तरीत प्रश्नांमुळे मनाचा समतोल बिघडत असतो. त्यासाठी बालवयापासूनच काही कौशल्य शिकवावी लागतात. मात्र बालवयाला मोठेपण हवं असतं तर मोठेपणाला म्हातारपण नको असतं. तारुण्य ओलांडलेली प्रत्येक व्यक्ती "पुन्हा बालवयात रमायला आवडेल' असेच म्हणत असते. त्यापाठीमागे असते ती भीतीची भावना. तारुण्याला नेहमीच बेफिकिरी, उधळपट्टी, चंगळवादी असे शिक्के मारले जातात. बऱ्याच अंशी ते खरेही असतं. पण त्यानंतर मध्य वयात आल्यावर आयुष्याचा खरा अर्थ कळायला लागतो. त्याचवेळी आयुष्याचा उत्तरार्ध आणि त्यापाठोपाठ येणारा शाश्वत सत्य असणारा मृत्यू कळायला लागतो. जेव्हा आयुष्यातील जन्म आणि मृत्यूच्या मधील शरीर आणि मनाच्या गोष्टी समजायला लागतात तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो. 

आयुष्यात असंख्य वेळा मनाची लहर बिघडते. मनाचा समतोल बिघडतो. मनावर ताण येतो परिणामी शरीराला सावरणे प्रचंड कठीण जाते. म्हणूनच शरीराचं घडणं बिघडणं मनावर अवलंबून असतं. शरीराचं आयुष्य मनाच्या चिरतारुण्यावर ठरत असतं. मनाला नेहमी जाणीव असते की, शरीर थांबलं तर त्याचंही अस्तित्व संपणार आहे. मन जरी दिसत नसलं तरी त्याच्या अस्तित्वाची लढाई सुरुच असते. मन सातत्याने शरीराला उत्साही ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यावर बऱ्याचवेळा प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर विजय मिळवते. हा समतोल ज्याला जमतो तोच आनंदी मनुष्य थोडक्‍यात काय कमकुवत शरीरावर मनाने केलेली मात म्हणजेच सुखी समाधानी आयुष्याचा आनंदी संवाद म्हणता येईल. मनुष्याने आयुष्यात पेरलेली भावनिकतेची संवादी बीजे रसरसलेल्या फळांसारखी गोड आणि चविष्ट वाटली नाहीत तरच नवल...! 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com