रोज काम केल्याशिवाय पोटाला मिळत नाही!... कथा 'त्या' माऊलीच्या संघर्षाची 

अर्चना बनगे
Thursday, 11 June 2020

तिच्या कपाळावरील कोरड्या रेषा मला सर्व काही सांग होत्या. तरणी-ताटी तीन मुलं असतानाही तिला उतारवयात पोटासाठी हाल-अपेष्टा सहन करत आजारी पतीसह संसाराचा गाडा ती हाकत होती. 

 सकाळची कोवळी किरणे सर्वत्र पसरली होती. चिमण्ंयाचा मस्त असा चिवचिवाट ऐकू येत होता. एवढ्यात हातात खुरप घेऊन डोक्यावरचा पदर सावरत ती भरभर चालत होती. माझी नजर नकळत तिच्याकडे वळली, तशी तिचीही नजर माज्याकडे वळली, तिचे डोळे पाण्याने डबडबलेले. काय झालं विचारावं म्हणून मी पुढे एक पाऊल टाकणार एवढ्यात तिच डोळे पुसत सांगू लागली, शहराची चाक फिरु लागली खरं माझ्या संसाराचं चाक तसंच रुतून बसलंय. ती सांगत होती. मी फक्त तिचे ते शब्द एेकत निशब्दपणाने उभी होते. तिच्या कपाळावरील कोरड्या रेषा मला सर्व काही सांग होत्या. तरणी-ताटी तीन मुलं असतानाही तिला उतारवयात पोटासाठी हाल-अपेष्टा सहन करत आजारी पतीसह संसाराचा गाडा ती हाकत होती. 

ती सांगू लागली,  'पती कारखान्यात काम करत होते. मात्र त्यांना दुर्धर आजार झाल्यामुळे ते घरीच राहिले. त्यामुळे संसाराचे अर्थचक्र फिरवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत स्वतः कारखान्यात काम धरले. पतीचे औषध आणि घरखर्च चालवताना बेजार झाली आहे.
 
लॉकडाऊनच्या काळात शेजाऱ्यांच्या मदतीने कसेबसे दोन अडीच महिने काढले आणि त्यानंतर पुन्हा कामावर जाण्याचा क्रम सुरू झाला. रोज कामावर गेल्याशिवाय पोटाला मिळतच नाही. कारखान्यात एक दिवस आड काम मिळाले. यावर उपाय म्हणून सध्या परिसरात सुरूअसलेल्या शेतात कामास जाण्यास सुरुवात केली. 

कामावर गेल्यावर रोज दोनशे रुपयाची हजेरी मिळते. त्यात कसेबसे घर चालते. मात्र आता एक दिवस आड काम मिळत असल्याने जेमतेम शंभर रुपयांमध्ये घर खर्च कसा चालवायचा आणि औषध  खर्च कसा करायचा याची विवंचना लागून राहिली आहे. त्यामुळे शेतामध्ये कामाला जाण्याचा निर्णय घेतला. 

आयुष्याच्या उतारवयात आपल्या मुलांच्या आधाराची गरज असताना त्यांनी आम्हा दांपत्याला झिडकारले आहे. यावरही मात करत असताना लॅाकडाऊनमुळे अर्थकारणलाच ब्रेक मिळाला. आता मात्र पुन्हा काही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरू झाल्याने एक नवा आधार मिळाला आहे.

इचलकंजी शहरानजीक असलेल्या तारदाळ मधील वाडी वसाहतीतील एका कुटुंबाची ही कहाणी आहे. ही कहाणी प्रातिनिधिक स्वरूपात असली तरी बहुतांश ज्येष्ठ नागरिकांच्या वाट्याला असाच प्रकार आला आहे. लॉकडाऊनमधून थोडी शिथिलता मिळाली असली तरी कष्टकरी वर्गाचा संघर्ष अद्याप संपलेला नाही. वयाची साठी ओलांडलेल्या या दाम्पत्याने लॉकडाऊनच्या काळात तर संघर्ष केलाच मात्र नंतरही आपली आर्थिक चक्रं गतिमान व्हावी यासाठी त्यांचा संघर्ष सुरूच आहे.  

महाराष्ट्राची मॅंचेस्टर नगरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजी शहरात या दांपत्याला आता त्यांच्या मूळ कामावर एक दिवसाआड काम मिळू लागले आहे. या माऊलीचा पती दुर्धर आजाराने घरीच आहेत. आर्थिक गणित जुळत नसल्यामुळे एक दिवस कारखान्यात तर एक दिवस शेतावर असा संघर्ष करत हे दांपत्य आपली गुजराण करत आहे. 

 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या