लॉकडाउननंतर विरंगुळ्यासाठी "स्टेकेशन' हा उत्तम पर्याय !

Staycation
Staycation

टाळेबंदीचा काळ सर्वांनाच कठीण गेला खरा! परंतु त्यातून खूप काही शिकायला मिळाले. सहा महिने घरात राहून मानसिकदृष्ट्या वैतागलेल्या प्रत्येक व्यक्तीस वेगळेपण करण्याची हौस निर्माण झाली. अशातच सर्व पर्यटन स्थाने बंद होती, मंदिरेही अजूनही बंद आहेत, दळणवळणाला उठाव आला नाही. अशा परिस्थितीत काय वेगळे करावे, असे मनात होते. जवळजवळ सहा महिन्यांनंतर स्टेकेशन हा एक उत्तम पर्याय आहे, असे वाटू लागले आणि त्यात काही चुकीचे नाही. हा एक उत्तम पर्याय वाटत आहे. स्टेकेशन पहिल्यापासून चालू आहे, परंतु टाळेबंदीनंतर याला उठाव आला आहे. 

आता काही लोकांना स्टेकेशन ही कल्पना माहीत आहे. परंतु खूप अशा लोकांना ही कल्पना आलेली दिसून येत नाही. कधी कधी आपण नकळत स्टेकेशन करत असतो परंतु आज त्याची व्याख्या व कल्पना बहरत आहे. बऱ्याच जणांना स्टेकेशन करण्याची हौस असते. मग स्टेकेशन म्हणजे काय? त्याचे फायदे काय? हे का करावे? यामुळे फायदा होईल का नुकसान होईल? असे नानाविध प्रश्न लोकांसमोर उभे राहतात. अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी स्टेकेशन करायचे ठरवले. परंतु इथे तुम्हास कल्पना देतो, की म्हणजे एखाद्या ठिकाणी एका दिवसासाठी आपल्या लोकल जागी जाणे, दिवस घालवणे, विरंगुळा म्हणून न राहता एखाद्या उद्यानात, तलावाच्या काठी, पर्वतावर जाणे व परत येणे तसेच एका दिवसातच परत येणे किंवा एखादी रात्र तिथे मनपसंतीदार जागी घालवणे हे स्टेकेशनचे पर्याय आहेत. 

पूर्वी पंचतारांकित हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये जायचे अवघड जात असे. श्रीमंत लोक याचा उपयोग घेऊ शकत होते; परंतु आज पंचतारांकित हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये जाणे सहज शक्‍य आहे. त्यामुळे खूप लोक स्टेकेशनसाठी पंचतारांकित हॉटेल किंवा रिसॉर्ट हे पर्याय निवडतात. महाराष्ट्र आणि सोलापूर जिल्ह्याचा विचार केला असता असे लक्षात आले, की आपली संस्कृती खूप अमूल्य आहे. महाराष्ट्र राज्यात आणि सोलापूर जिल्ह्यात असे अनेक फिरण्याची ठिकाणे आहेत जी बघण्यासारखे आहेत, ज्यातून इतिहास झळकतो, तसेच भौगोलिक वैशिष्ट्येही लाभली आहेत. ती बघण्याची सुवर्णसंधी स्टेकेशन देईल. 

आपल्या प्रांतात अनेक तलाव, पर्वतरांगा, गड-किल्ले, नद्या, समुद्रकिनारे आहेतच; त्यात भर पडावी ती चांगले रस्ते, राहण्याची उत्तम सोय, चविष्ट जेवण आणि उत्तम वातावरण असे असल्यास पर्यटकाला लांब जायची गरज नाही. त्याचप्रमाणे आपल्याकडे उद्याने आहेत, जंगले आहेत, विविध पक्षी आणि प्राणी आहेत, त्यांचा अभ्यास करता येतो. विविध ऋतूंमध्ये पक्षी येतात. त्यांचाही एक दिवस राहून अभ्यास करता येतो. सरकारने मुख्यतः पर्यटन विभागाने सुखसोई व सुरक्षित वातावरण द्यावे, जेणेकरून पर्यटक स्टेकेशन करतील. अनेक खासगी संस्था यासाठी सरकारबरोबर पाठपुरावा करत आहेत. त्यात लवकरच यश येऊन पर्यटन व्यवसायवृद्धी यावा हाच प्रयत्न आहे. काही लोक वेळ वाचवण्यासाठी आपल्या शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून तिथल्या वातावरणाचा आनंद लुटतात. 

याचा अनुभव घेण्यासाठी मी ही स्टेकेशन करायचे ठरवले. अनेक दिवसांपासून घर आणि काम याचा कंटाळा आल्याने मी एका आंतरराष्ट्रीय पंचतारांकित हॉटेलमध्ये एक रात्र राहायचे ठरवले. या हॉटेलने मला स्टेकेशन पॅकेज दिले. अर्थात कंटाळवाणी रुटीनमधून वेळ काढत मी हॉटेलमध्ये पोचलो. तेथे माझे स्वागत झाले, हे पाहून मन भारावून गेले. कोरोनामुळे काळजी घेत हॉटेल कर्मचाऱ्याने मला माझी रूम दिली. अत्यंत देखणे असे हॉटेल असताना मन प्रसन्नावस्था अनुभवत होते. मी या स्टेकेशनचा अनुभव घेताना उत्सुक होतो. मी एक रात्र तेथे काढली. काही गोष्टी बंद होत्या, जसे की स्वीमिंग पूल, जिम, स्पा. त्यामुळे थोडी नाराजी झाली; परंतु मन न मारता मी बाकी अनुभव घेण्याचे ठरवले. 

कोरोनामुळे थोडी काळजी घेत मी माझ्या हॉटेलमध्ये चांगला वेळ घालवला. छानसे जेवण मिळत होते. त्या रात्री उशिरा झोपत रूमचा व पर्यावरणाचा तसेच वातावरणाचा आनंद घेत मी दुसऱ्या दिवशी उठून शाही नाश्‍ता केला. आंतरराष्ट्रीय हॉटेलचा अनुभव निराळाच होता. 

स्टेकेशन हा उत्तम पर्याय असून मोठ्या शहरापासून लहान गावापर्यंत हा पसरला आहे. परंतु, आपणास हा शब्द नवीन वाटतो. इंग्रजी शब्द "स्टे' व "व्हेकेशन' म्हणजे सुटी मिळवून स्टेकेशन हा शब्द तयार झाला आहे. यात एक किंवा दोन दिवस पर्यटक आपल्या जवळील पर्यटनस्थळी किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊन उत्तम प्रकारे वेळ घालवणे हा आहे. 

टाळेबंदी संपत आल्यानंतर स्टेकेशनला महत्त्व प्राप्त झाले आहे. मानसिकदृष्ट्या विविध कृती करणे आता मानवास वाटू लागले आहे. अशातच महागाईची झळ काही पर्यटनाला बसला असून त्यातून मार्ग काढावा असे वाटताना स्टेकेशन हा विकल्प लोक निवडत आहेत. टाळेबंदीमुळे मानसिक, शारीरिक व आर्थिकदृष्ट्या लोक थकले आहेत, असे दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. परंतु दुसरी लाट येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्याची भीती पर्यटकांनी घेतल्यामुळे लांब पल्ल्याच्या गावी जाण्यास सर्वजण नको म्हणत आहेत. या नकारात्मक भावनेमुळे दूरवर जाऊन अडकून पडणे लोकांना विशेषतः पर्यटकांना अडचणीत आणू शकते. 

दुसरीकडे कोरोना महामारीची लाट पर्यटनाला बाधा आणत आहे. अशातच वेगळे काय करावे यासाठीच पर्यटक स्टेकेशन निवडत आहेत. मोठ्या शहरांत हौशी पर्यटक मोठी हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये राहून आपला वेळ चांगल्यारीत्या घालवत आहेत. घराच्या चार भिंतीत राहून लोक कंटाळलेले आहेत. व्यावसायिक, नोकरदार, कर्मचारी व इतर व्यवसायांशी संबंधित वर्ग स्टेकेशनचा आनंद घेत आहेत. 

परंतु, काही कारणास्तव ज्यांच्याकडे आर्थिक क्षमता नाही, ते यापासून वंचित राहात आहेत, असे दिसून आले आहे. या भ्रमंतीसाठी पैसा लागतो आणि आज सर्व स्तरावरील पर्यटकांच्या खिशाला चाप बसणार म्हणून खिसा पेलवेल इतकाच खर्च करत आहे. अशावेळी सुटी करणे थोडेसे अवघड जात आहे, असे निदर्शनास येते. 

पर्यटनवाढीसाठी व या क्षेत्राला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत तितक्‍यात विरंगुळा म्हणून पर्यटक सुटी घालवताना दिसून येत आहेत. अर्थव्यवस्था नीट व्हावी व त्यावर अवलंबून असणाऱ्या पर्यटनाचा मोठा भाग जीडीपीमध्ये वाढावा असा प्रयत्न आहे. मोठ्या प्रमाणावर जीडीपीचा भाग असून भारतीय अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्र मोलाची कामगिरी बजावत आहे, हे दिसून आले आहे. परंतु, आता त्याची परिस्थिती बिकट वाटत आहे. त्यातच स्टेकेशन करून थोडाफार हातभार या क्षेत्राला होईल अशी आशा आहे. सर्वतोपरी प्रयत्न व एकमेकांची साथ यातून स्टेकेशनचा उपयोग करून पर्यटन हे सर्वांसाठी एक वरदान ठरेल असे वाटत आहे. 

तसेच स्टेकेशनचे विविध प्रकार आहेत. अनेक लोक लांब फिरायला जाणार व वाहतुकीवर खर्च करण्याऐवजी जवळील स्थानावर मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचे अनेक फायदे आहेत. स्टेकेशनमुळे विरंगुळा तर मिळतोच परंतु डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. लोकल लोक जे की स्थानिक पर्यटनावर अवलंबून आहेत, त्यांना रोजगार व उत्पन्न मिळते. स्टेकेशनमुळे रोजगार निर्मितीही होईल, त्यामुळे अमूल्य वेळही वाचतो. मनोरंजन तर होतेच पण त्याचबरोबर पैसाही वाचतो. 

आज स्टेकेशनचा पर्याय सर्वांना उत्तम वाटत आहे. याचे अनेक फायदे आहेत, यामुळे पर्यटन क्षेत्राला चांगली चालना मिळेल. अर्थव्यवस्था सुधारेल. जीवनातून स्वतःसाठी वेळ काढता येईल, असे असून स्वतःला कौतुकास्पद वातावरणात नेता येईल. त्यामुळे मला वाटते, की प्रत्येकाने हा अनुभव घेऊन पाहावा तरच स्टेकेशनला बहार येईल. 

- ऋत्विज चव्हाण 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com