Baba Bulke: जोपर्यंत जगात रामकथा सांगितली जाईल तोपर्यंत युरोपातून आलेल्या या ख्रिस्ती धर्मगुरूला कोणी विसरू शकणार नाही..

`रामायण' आणि महाभारत ही महाकाव्ये भारतीय संस्कृतीचा एक महान ठेवा. या दोन महाकाव्यांवर विविध दृष्टिकोनांतून आणि पैलूंनी सतत लिहिले गेले आहे.
Baba Bulke: जोपर्यंत जगात रामकथा सांगितली जाईल तोपर्यंत युरोपातून आलेल्या या ख्रिस्ती धर्मगुरूला कोणी विसरू शकणार नाही..

`रामायण' आणि महाभारत ही महाकाव्ये भारतीय संस्कृतीचा एक महान ठेवा. या दोन महाकाव्यांवर विविध दृष्टिकोनांतून आणि पैलूंनी सतत लिहिले गेले आहे. वाल्मिकीकृत रामायण जसे लोकप्रिय आहे तसेच उत्तर भारतात संत तुलसीदास यांनी रचलेले `रामचरितमानस' खूप लोकप्रिय आहे. या काव्याला `तुलसी रामायण' या नावानेही ओळखले जाते.

युरोपातून आलेल्या आणि भारतालाच आपली कर्मभूमी बनवणाऱ्या एका ख्रिस्ती धर्मगुरूला राम कथेने आणि या `रामचरितमानस'ने भुरळ घातली अन मग त्यानीं अनेक वर्षे या विषयावर मूलभूत स्वरूपाचे संशोधन केले. राम कथेच्या प्रेमात पडलेल्या आणि मूळचे बेल्जीयन असलेल्या या जेसुईट धर्मगुरूंचे नाव आहे फादर कामिल बुल्के.

फादर कामिल बुल्के यांचा जन्म बेल्जियम देशात १ सप्टेंबर १९०९ रोजी झाला. कॅथोलिक धर्मगुरू होण्यासाठी येशूसंघात दाखल होण्यापूर्वी त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. भारतात त्यांनी १९३५ साली पाय ठेवला आणि १९४१ साली धर्मगुरू म्हणून त्यांना गुरुदीक्षा देण्यात आली. कोलकाता विद्यापीठात त्यांनी संस्कृत विषयात पदवी संपादन केली, त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठात त्यांनी हिंदी विषयात डॉक्टरेट मिळवली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता, ‘रामकथा : उत्पत्ती और विकास’.

विशेष बाब म्हणजे जन्माने युरोपियन असलेल्या फादर बुल्के यांचा हा प्रबंध अलाहाबाद विद्यापीठातील हिंदी साहित्यावरील पहिलाच हिंदी प्रबंध होता. तोपर्यंत या आणि भारतातील इतर कुठल्याही विद्यापीठांत सर्व प्रबंध इंग्रजीतूनच लिहिले जात असत.

संत तुलसीदास आणि रामकथा या विषयांवर हिंदीतूनच प्रबंध लिहिण्यावर फादर कामिल बुल्के ठाम होते. अखेरीस विद्यापीठाने प्रचलित नियम बदलून हिंदी भाषेतून संशोधनात्मक प्रबंध लिहिण्यास त्यांना परवानगी दिली. ही घटना आहे १९४५ ची. भारताला तोपर्यंत स्वातंत्र्य मिळालेले नव्हते.

जन्माने बेल्जियम आणि ख्रिस्ती धर्मगुरु असलेल्या फादर कामिल बुल्के यांना १९४९ साली हिंदी भाषेतील पहिली डॉक्टरेट पदवी मिळवण्याचा मान मिळाला. फादर बुल्के यांचा हा प्रबंध स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास सादर केला गेल्याने या प्रबंधाचे लेखक त्या वेळी प्रकाशझोतात आले.

आपण हिंदी भाषा आणि तुलसीदासांच्या `रामचरितमानस'कडे कसे आकर्षित झाले याचे स्पष्टीकरण फादर कामिल बुल्के यांनी स्वतः दिले आहे. त्यांची गुरुदीक्षा होण्याआधी पाच वर्षे ते झारखंड येथे जेसुईट संस्थेच्या एका शाळेत शिक्षक होते. त्यावेळी स्थानिक लोकांना इंग्रजी भाषेत संभाषण करणे अभिमानास्पद वाटे. स्थानिक संस्कृतीचे त्यांना फारसे ज्ञान किंवा अभिमान नव्हता असे त्यांना जाणवले. त्याचवेळी त्यांनी भारतातल्या भाषांत प्राविण्य मिळवण्याचा आणि इथली संस्कृती आपली करण्याचा निर्धार केला.

राम कथेवर संशोधन पूर्ण केल्यानंतर फादर कामिल बुल्के पुन्हा आपल्या कर्मभूमीकडे म्हणजे झारखंडला परतले. जेसुईट संस्थेच्या तेथे असलेल्या सेंट झेव्हियर कॉलेजात फादर बुल्के यांनीं संस्कृत आणि हिंदी विभागाची स्थापना केली.

ख्रिस्ती धर्मगुरु म्हटले की ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारे लोक अशी प्रतिमा नजरेसमोर उभी राहते. मात्र सर्वच ख्रिस्ती धर्मगुरु धर्मप्रसाराचे कार्य करत नसतात. बहुतांश ख्रिस्ती धर्मगुरु शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, समाजसेवा वगैरे अनेक मिशनकार्यांत गुंतलेले असतात. अशा धर्मगुरुंमध्ये फादर कामिल बुल्के यांचा समावेश करता येईल.

कॅथोलिक चर्च ही जगातील एक सर्वांत मोठी संस्था आहे. चर्चच्या विविध कार्यांना वाहून घेणाऱ्या धर्मगुरुंच्या आणि धर्मभगिनींच्या संस्था-संघटनाही आहेत. उदाहरणार्थ, जेसुईट्स, डॉन बॉस्को आणि मदर तेरेसा सिस्टर्स. यापैकी `जेसुईटस ' म्हणजे सोसायटी ऑफ जिझस या धर्मगुरूंच्या संघटनेचे सदस्य. जेसुईट धर्मगुरुंनी शिक्षण, समाजकार्य, साहित्य वगैरे क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान दिले आहे.

जेसुइट संस्थेचे मुंबईतील सेंट झेव्हियर कॉलेज तसेच जमशेदपूर येथील झेव्हियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट ही भारतातील अग्रगण्य मॅनेजमेंट शैक्षणिक संस्था आहे. पुण्यात लोयोला आणि सेंट व्हिन्सेंट या शाळा आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी आधुनिक शिक्षणसंस्था स्थापन केल्या, त्या जेसुईट मिशनरींच्या मिशनरी कार्याने प्रभावित होऊनच.

लोकमान्य टिळक आणि आगरकर यांना ‘इंडियन जेसुइट्स’ असे संबोधन देण्यात आले आहे ते यामुळेच श्रीरामपूरला दहावीची परीक्षा दिल्यानंतर मी स्वतःही गोव्याला जेसुईट धर्मगुरू होण्यासाठी गेलो होतो. त्या प्रशिक्षणाच्या पाच वर्षांच्या काळात येशूसंघीयांची काम करण्याची तळमळ, धडपड आणि अपार कष्ट घेण्याची, त्रास सहन करण्याची तयारी मी जवळून अनुभवली आहे.

आताचे पोप फ्रान्सिस हे पोपपदावर पोहोचलेले जेसुईट संस्थेचे पहिलेच धर्मगुरु आहेत. आपल्या आगळ्यावेगळ्या कार्याद्वारे फादर कामिल बुल्के अशा नामवंत संस्थेची परंपराच चालवत होते.

बेल्जियममधून भारतात आल्यापासूनच फादर कामिल बुल्के या देशाच्या प्रेमात पडले. फादर बुल्के यांनी धर्मगुरुपदाचे कार्य पार पाडण्यासाठी सर्वप्रथम स्थानिक लोकांशी आणि संस्कृतीशी एकरूप होण्यावर अधिक भर दिला. त्यासाठी त्यांनी १९५० साली भारतीय नागरिकत्व स्वीकारून आपल्या मायदेशाची नाळ कायमची तोडून टाकली.

अलाहाबाद विद्यापीठाने फादर कामिल बुल्के यांचा ‘रामकथा : उत्पत्ती और विकास’ हा प्रबंध १९५० साली प्रसिद्ध केला आणि त्या प्रबंधाची विस्तारित म्हणजे ८१८ पानांची तिसरी वृत्ती १९७१ साली प्रकाशित झाली. रामकथेवर डॉक्टरेट मिळवल्यानंतरसुद्धा अनेक वर्षे या विषयावर फादर बुल्के यांचे संशोधन चालूच होते. या तीन आवृत्तींच्या प्रकाशनांवरुन जवळजवळ पंचवीस वर्षे फादर बुल्के हे रामकथेच्या कसे प्रेमात पडले होते हे दिसून येते.

फादर बुल्के यांची साहित्यक्षेत्रातील कार्याची दखल घेऊन १९५० साली बिहार राज्याच्या राज्यपालांनी बिहार साहित्य अकादमीचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांची नेमणूक केली. त्यानंतरच्या काळात राष्ट्रीय पातळीवरील अनेक महत्त्वाच्या समित्यांचे सदस्य म्हणून केंद्र सरकारतर्फे त्यांची निवृत्ती करण्यात आली. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक साहित्य संस्थांचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. राष्ट्रीय पातळीवर हिंदी भाषेचा राष्ट्रभाषा म्हणून मोठ्या प्रमाणात वापर व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले.

रामकथेच्या संशोधनानंतर फादर बुल्के यांनी इंग्रजी-हिंदी शब्दकोशाची निर्मिती आणि संपूर्ण बायबलचे हिंदीत रूपांतर करण्याच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतले. त्यांचा इंग्रजी-हिंदी कोश १९६८ साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर या शब्दकोशाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. १९७७ साली संपूर्ण नव्या कराराचा म्हणजे बायबलच्या दुसऱ्या खंडाचा त्यांनी केलेला अनुवाद प्रसिद्ध झाला. संपूर्ण बायबलचा हिंदी अनुवाद १९८६ साली प्रसिद्ध झाला.

फादर बुल्के हिंदी भाषिक प्रदेशातील बिगर ख्रिस्ती समाजात ‘बाबा बुल्के’ म्हणून ओळखले जात. हिंदी आणि संस्कृतव्यतिरिेक्त फादर बुल्के यांना हिब्रू, ग्रीक, लॅटिन भाषा अवगत होत्या. डच, फ्रेंच आणि जर्मन भाषांतसुद्धा ते उत्तमरीत्या संभाषण करत असत.

कॅथोलिक चर्चमध्ये आंतरधर्मीय सामंजस्याचे आणि सुसंवादाचे वारे १९६२साली भरलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेनंतर सुरू झाले, पण या परिषदेपूर्वीच फादर बुल्के यांनी या दिशेने वाटचाल सुरू केली होती. त्यामुळेच त्यांना अनेकदा विरोध आणि टीकेस तोंड द्यावे लागले. आज मात्र फादर बुल्के यांनी केलेल्या कार्यास सगळीकडे मान्यता मिळाली आहे.

भारतीय संस्कृतीशी एकरूप होऊन महान कार्य केल्याबद्दल मदर तेरेसा यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सरकारने त्यांचा गौरव केला. त्याचप्रमाणे रामकथेवर मूलभूत स्वरूपाचे संशोधन करणाऱ्या, इंग्रजी-हिंदी शब्दकोशाची निर्मिती करणाऱ्या फादर कामिल बुल्के या जन्माने बेल्जियम असणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरूचाही ‘पद्मभूषण' हा सन्मान देऊन गौरव करण्यात आला.

प्राच्यविद्यापंडित, संपूर्ण बायबलचे हिंदीत रूपांतर करणारे अनुवादक, हिंदी व संस्कृत भाषेचे पंडित म्हणून फादर बुल्के यांचा खास उल्लेख केला जातो.

फादर बुल्के यांचा इंग्रजी-हिंदी शब्दकोश आजही नावाजला जातो.

फादर बुल्के १९५० ते १९७७ या काळात यांची येथील सेंट झेव्हियर कॉलेजमध्ये हिंदी आणि संस्कृत विषयांचे विभागप्रमुख होते. यावरून त्यांनी या विषयात किती प्राविण्य मिळवले होते, याची कल्पना येते.

त्यांच्या निधनानंतर रेडिओवर आणि दूरदर्शनवर या प्राच्यविद्यापंडिताच्या कार्यावर आधारित खास कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता . ‘जोपर्यंत जगात रामकथा सांगितली जाते, तोपर्यंत बाबा बुल्के हे नाव विसरले जाणार नाही, असे म्हटले जाते.

फादर कामिल बुल्के यांच्या निधनानंतर पस्तीस वर्षांनी दिल्लीतील त्यांची कंबर खोदून त्यांचे अवशेष त्यांच्या कर्मभूमीला म्हणजे रांची येथे नेण्यात आले आणि अनेक लोकांच्या उपस्थितीत तेथे समारंभपूर्वक पुरण्यात आले. फादर कामिल बुल्के यांच्या या आगळ्यावेगळ्या `घरवापसी' कार्यक्रमाला अनेक धर्मांचे लोक आवर्जून उपस्थित होते. रांची येथील सेंट झेव्हियर कॉलेजात त्यांचा एक अर्धपुतळा उभारण्यात आला असून तेथील रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com