भूल गये गोधन को सांवरिया 

story of srikrishna
story of srikrishna

वत्सला, कपिला, वैष्णवी, अनया.. साऱ्या गायी गोतावळा दूर. गोशाळेत गेलाही आणि कान्हा मात्र एकाच ठिकाणी. त्या स्तंभाला बांधलेल्या अज्ञात दोरीत अडकलेला! 

वैशाख असला की, नंदनगरीत धूळ यायचीच. गोपुरं-प्रासाद, कर्णिका, जलगृह सारं मातृकेच्या गेरु रंगात रंगायचं. यमुनेच्या पलीकडच्या भूमीवरून येणारं वारं मथुरेच्या अंग-प्रत्यंगाशी लगट करायचं. 

शुभ्र वस्रांच्या घड्यावर, वृक्षलतांच्या पानावर हा गेरु रंग उमटायचा. त्यात जेव्हा गाई-गुरं यमुनेकडून परतायची, तेव्हा धुळीसोबत गेरुही ! घुंगराच्या बोलात गेरुआ. निथळत्या लव असणाऱ्या पांढऱ्या शुभ्र कातड्यावरती ! 

यमुनेच्या तीरावरचे केतुवृक्ष, नृपवृक्ष, कदंब यातून घुमणारा वारा बासरीत उतरत जातो.... मित्र, सोबती, सवंगड्यांसह रमलेला -दमलेला कान्हा सांवरिया पात्रात भिजून गोधन सांभाळत नंदग्रामी परत फिरतोय... 

किरणं उतरल्यानंतर बासरी कमरेच्या वस्रात खोचून कान्हानं हाक दिली.. जणू वाजवलेली धूनच... तृप्तीनं, डोळ्यांत समाधान घेऊन भरल्या पोटानं-आचळानं गाई गोळा झाल्या. पांढरे ढग हिरव्या भूमीवर जणू एकत्र आले. 

मघाशी बाजूच्या ओहळात पाणी प्यायला गेलेली गाय, गर्भारपणानं हळूवार शेवटी आली... गुलाबी पोटात... पुन्हा चैतन्य घेऊन, सृष्टीच्या या अप्रुपाचं सदैव आश्‍चर्य वाटायचं कृष्णाला! कदंबाच्या सावलीत बोट बासरीवर फिरताना आसमंत आनंदलेला जाणवायचा...उद्या उमलणारी फुलं आज कळ्या असल्या तरी त्यांचा आनंद समजायचा.. वृक्षावरच्या खारी थबकायच्या, पक्षी उडण्याचा आळस करायचे, नीळे मोर एकटक बघत, समाधिस्त व्हायचे... काय आहे ही सृष्टी ? कशी उमलतात बीजं ? कपिला गाईच्या डोळ्यांत असं काय दडलंय की, आपण स्वत्व विसरतो ? 

रानमेवा, कंद, मध, झाडाच्या खोडातून पाझरलेला डिंक सर्व झोळीत घेऊन सोबतचे गोप पुढं गेलेही ! घरट्यात परतणारी रंगपाखरं, क्षणभर गायींच्या पाठीवर बसून पुन्हा झोपावली. हे असं एकमेकांचं अद्वैत. पुनः पुन्हा भेटत जायचं... स्पर्शातून. पुन्हा उद्या यांचा संवाद असतोच; पण संध्याकाळी आश्‍वासनं तर देत नसतील हे मुके जीव? गायीच्या हलत्या शेपट्यांवरचे रानकिडे, माशा गवतातल्या घरी एक रात्रीसाठी परतले. उनाड अवखळ वासरांच्या समजुती घालणाऱ्या गायी. त्यांची ही ओळखीची वाट. वर्षानुवर्षांची ! त्यांचे हुंकार, पळताना भुईवरचा आवाज, किणकिण, मथुरेकडं वाटचाल- रोजचीच ! 


सावळ्या अंगाचा कन्हैया! दंडावरच्या दोऱ्या हल्ली घट्ट रुतू लागल्यात. मणी फुगणाऱ्या स्नायुत कचत आहेत. प्रवाहात सूर मारला की, तटतटणाऱ्या दंडावरच्या या रेशमी दोऱ्या गच्च भिजायच्या. त्यांचा केशरिया, पिवळसर रंग चमकदार दंडावर स्थिर राहायचा. जणू दंडावर हळदीची नक्षी. 

हळूहळू आकार घेणारं शरीर. स्नायुंना माळणारं तेज. कदंबाच्या पारंब्या जशा. स्तव, तेज, चैतन्य. ओजाने लावणाऱ्या, रोज मजबूत, बळकट. 
पोहून किनाऱ्यावर आलं की, रुंद होत जाणाऱ्या पिळदार छातीवर पुनश्‍च मोतीहार घालताना, छातीवरच्या कोवळ्या केसांत यमुनेचे थेंब संकोचाने निघून जायचे. कुठं जाणारं शरीर... प्रमाणबद्ध तितकंच स्वतःला नवीन. काय उमलत आहे आतून? 

""सावळ्या ! कुठं गुंतलास ? भानावर ये गड्या !'' ते बघ... सांभाळ. किती काट्यातून चालतो आहेस? लक्ष कुठाय? असं चित्त गुंतवून पुढं नकोस पाऊल टाकू !'' सवंगड्याच्या त्या उद्‌गारांनी भान जागवलं... 

ब्रह्ममुहुर्तावर उठून नंदग्रामात आलं की, या संवंगड्यांचा सहवास, जीवाभावाचे सोबती हे! यशोदामाईच्या अंगाखांद्यावर मोठी झालेली ही माझी भावंडं! सुबाहू, सुबल, रसाल सगळे बालसखे. पितांबऱ्या निऱ्या बांधताना, तैलस्नान करताना, किंवा मस्ती करताना मोठेपणा विसरणारे! सुबाहूला तर ओठांखाली झुपकेदार केसांचं वैभव उगवलं...तोच मग मोठेपणानं, ज्येष्ठत्वानं निर्णय घ्यायचा. न्याय देणारा. ब्रजभाषेतील काही गाणी भसाड्या, विचित्र आवाजात गायचा. हे गोप नव्हते... नाहीत.. ही तर नंदग्रामची वानरेच ! वृक्षाला लटकणारी. त्यांच्या बाललीला, मर्कटलीला बनल्या... यशोदामाईच्या धाकाचेही त्यांना भान नाही... वारा पिलेली, उधळलेली ही यमुनातीराची हरणं... सैरावैरा पळणारी चपळ... 

आता मात्र सुबाहू बालपणात, क्रीडेत रमायचा नाही. नगरात असला की, तिरप्या कटाक्षातून काही न्याहाळायचा. पैंजणाची हलकी छूमछूम ऐकली.. की, थबकायचा. गाईच्या आवाजातून, मंदिरातील मंत्रोच्चारातून नेमका हाच आवाज त्यालाच कसा ऐकू जायचा? 

पुन्हा भानावर येत सावळ्यानं गायींचा अदमास घेतला. आलीच मथुरा. इथून प्रातःसमयी निघताना सारे वृक्ष, प्रासाद, ग्रामशिल्पं, पाठशाळा, अग्रहार ताजीतवानी असतात. आता मात्र झाकोळलंय सगळं. रातकिडेही ध्वनी करत आहेत. या अग्रहारापासून वळालं की, भव्य राजमार्ग सुरू होतो. हा ईशान्येकडे घाटावर जाणारा पथ. सदैव गोपींच्या लगबगीनं भरलेला ! त्या विरुद्ध दिशेला मोठ्या गोशाला. यंत्रालये, कोठारे, पाठशाला... 

रथसप्तमीला, जलपूजनाला, ग्रामोत्सवाला अवघी मथुरा याच राजमार्गावर. गोशाळेतून गाईच्या हंबरण्याचे, वासरांचे, धातुच्या भव्य भांड्यांचे आवाज तीव्र झाले. द्वारपालाची घाई- लगबग- दीप उजळण्याची. अहिरांची दूध काढण्याची. नीलवृक्षाएवढ्या उंचीच्या या भव्य अश्‍वदीपमाला उजळल्या की, प्रकाशात गोपुरे उजळून मुग्ध व्हायची. 

कान्हा या दीपमाळेच्या विस्तिर्ण परिसरात आला. धूप, चंदन यांचा सदैव सुगंध! अचानक, बाजूच्या स्तंभामागून, घडीव कभिन्न मार्गावरून उत्तरेकडे कोणी धावत गेलं... पैंजणाची हलकी धून... चंदनापेक्षाही धुंद गंध.. पाठोपाठ. कोण गेलं असा सुगंध पसरून ? आहे कोणीतरी... श्‍वास फुललेला ऐकू येतोय. त्या नक्षीदार स्तंभाआड ती कुणाची पावलं? 

कान्हा थबकला भान हरपून. 
यमुनेच्या पैलतीरावरच्या रावल ग्रामातून मथुरेत आलेली राधा तर नसेल? आणि आपलाही श्‍वास असा अचानक फुलला का? रुधिरातून काय उसळतंय नेमकं? डोहात उतरलं की, गोल गोल फिरवायची नदी. त्यावेळी बाहेर आलं की, अनेक भोवरे चित्तात फिरायचेच. काही क्षण धुंदी असायची ती. 

इथं तर आवेग आहे अनोखा. 
पाण्यात न खेचता भान हरपवणारा. 
वत्सला, कपिला, वैष्णवी, अनया.. साऱ्या गायी गोतावळा दूर. गोशाळेत गेलाही आणि कान्हा मात्र एकाच ठिकाणी. त्या स्तंभाला बांधलेल्या अज्ञात दोरीत अडकलेला! 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com