वेगळ्या वाटा धुंडाळताना!

Success stories of women farmers story by sachin charati
Success stories of women farmers story by sachin charati

महिला कृषी दिनाचे औचित्य साधून भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने नुकतीच देशातील ५१ प्रयोगशील महिला शेतकऱ्यांची यशोगाथा प्रसिद्ध केली. शेतीतील प्रयोग, पीक व्यवस्थापन, बागायत शेती, दूध, मासेमारी, मधमाशी पालन, बचत गट, शेती प्रक्रिया यात वेगळा विचार करून यशस्वी झालेल्या महिलांची दखल यात घेतली आहे. या यादीत देशाच्या पूर्वेकडील आसाम, नागालॅंड, मेघालय या राज्यांतील महिलांची संख्या १५ इतकी आहे, जी एकूण ५१ शेतकऱ्यांच्या ३० टक्‍क्‍यांपर्यंत आहे. महाराष्ट्रातील दोन महिला शेतकऱ्यांचा यात समावेश आहे आणि त्यातही कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्‍यातील कसबा सांगावमधील रूपाली विजय माळी यांचा यात समावेश आहे. ही तशी अभिमानाची बाब. गांडूळखत निर्मितीत माळी यांनी केलेले काम प्रेरणादायी असेच आहे.

पूर्वेकडील राज्यांनंतर कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, केरळ आणि तेलंगणा राज्यातील महिला शेतकऱ्यांनी केलेले वेगळे प्रयोगही शेतीत उत्साह निर्माण करणारे आहेत. सर्वसाधारण आपल्याकडे जूनपासून भात लावण सुरू होते. चिखलात आधीच केलेल्या तरवांची लावण करून भात पीक घेतले जाते. यासाठी आधी तरवे तयार करणे आणि नंतर चिखल करून लावण करणे, अशा दोन प्रक्रिया यात होतात. शिवाय हे काम विशिष्ट वेळेत पूर्ण करावे लागते. यातून हेक्‍टरी ३० ते ३७ क्विंटल सरासरी उतारा पडतो. भाताच्या वेगवेगळ्या जातीनुसारही उतारा वेगळा आहे. 


कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रयोगशील महिला शेतकऱ्यांच्या यशोगाथेत तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील रुपारेड्डी लक्ष्मी या महिलेने भात शेतीत केलेला प्रयोग या पार्श्‍वभूमीवर जास्त लक्षवेधी असा आहे. या महिलेने प्रतिहेक्‍टर ७२.५ क्विंटल भाताचे उत्पादन घेतले आहे. यासाठी त्यांनी पीक व्यवस्थापनाचा अभ्यास केला. आपल्याकडे भाताची लावण करतात तशीच तिकडेही पद्धत आहे; पण रुपारेड्डी यांनी तरवे तयार करून चिखलात लावण करण्याऐवजी थेट भाताचीच पेरणी केली. यासाठी त्यांना प्रतिहेक्‍टर १५ किलो बियाणे लागले. या पद्धतीतून त्यांनी उत्पादन खर्च तर कमी केलाच; शिवाय मनुष्यबळ आणि वेळेचीही बचत केली. त्यांना यातून प्रतिहेक्‍टर एक लाख ३४ हजार ५०० रुपये इतका नफा मिळाला. 


सध्याचा बदललेला मॉन्सून पॅटर्न आणि शेतीतील अन्य अडचणी यावर मात करत शेती करणे ही एक प्रकारची कसरतच आहे. या धबडग्यात वेगळ्या वाटा धुंडाळून कागलच्या रूपाली विजय माळी आणि तेलंगणातील रुपारेड्डी लक्ष्मी यांसारख्या महिला शेतकऱ्यांनी शेतीतून मिळवलेला पैसा धीर देऊन जातो. या महिलांनी निवडलेला हा वेगळा मार्ग आपल्याला वाटाड्या ठरू शकतो. त्यासाठी आपल्यातली दृष्टी अधिक विकसित होण्याकरिता पोषक व्यवस्था तयार व्हावी इतकेच.

संपादन - अर्चना बनगे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com