कोरोनासाठी चीनला दोष देणं कितपत बरोबर आहे?

corona
corona

कोरोना विषाणूपासून बचाव कसा करायचा, कोणती काळजी घ्यायची, याबाबत सांगत असतानाच या विषाणूच्या संकटामागची मूळ कारणं, त्यातून घ्यायचे धडे याबाबत वस्तुनिष्ठ, अभ्यासपूर्ण लिखाणही होते आहे. त्यातील काही मुद्दे, विचार तुमच्याशी शेअर करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच.

कोरोनाच्या विषाणूने जगात मृत्यूने घातलेल्या तांडवाबद्दल एकट्या चीनला दोष दिला जातोय, हे कितपत बरोबर आहे ? निसर्गाचा खातमा करायचाच असा विडा उचललेले तुम्ही-आम्ही सगळेच, या पृथ्वीतलावरची सगळी मानवजातच आपल्या पायावर धोंडा मारून घेत असल्यानंच कोरोनासारखा जणू जग गिळंकृत करायला निघालेला राक्षसी विषाणू फोफावतो. गेल्या दोन दशकांत त्याचे अनेक फटके बसूनही जगभरातला माणूस शहाणा झालेला नाही आणि आगामी काळात कोरोना शांत झाल्यावरही पुन्हा "येरे माझ्या मागल्या'च होणार असेल, तर ते दुर्दैवच ठरेल.

कोरोनासारखे अनेक जीवघेणे विषाणू निसर्गामध्ये शतकानुशतके सुखनैव नांदताहेत. माणसाच्या कधीच तृप्त न होणाऱ्या लालसेने या निसर्गसंपत्तीचा नाश सुरू झाला, दाट अरण्यातले हे विषाणू माणसाच्या संपर्कात येऊ लागले अन तिथून माणसाचं अस्तित्त्व धोक्‍यात येऊ लागलं. केवळ विषाणूंच्या जवळिकीनं नव्हे तर निसर्गचक्रात ढवळाढवळ केली, म्हणून निसर्गानंही माणसाला अनेकदा तडाखे दिलेत. यावर उपाय ? निसर्गाची जपणूक करणं, त्याच्या प्रत्येक घटकाला धक्का न लावता त्यांच्यापासून योग्य ते अंतर ठेवणं.

... चीनचा हुकूमशहा माओ झेडांग यानं चीनमधील चिमण्या मारण्याची उघडलेली राक्षसी मोहीम आपल्या वाचनात असेल. हाताशी आलेल्या पिकापैकी किती टक्के पीक चिमण्या फस्त करतात, याचा "अभ्यास' झाल्यावर ते पीक वाचवण्यासाठी "चिमण्याच मारून टाका' असे फर्मान त्यानं 1958 मध्ये काढलं. प्रत्येक माणूस चिमणी मारायला लागला आणि चीनमध्या चिमण्या जवळपास संपल्याच. त्यानंतरच्या दोन वर्षांत मोठी टोळधाड आली, तिनं त्या वर्षीचं सगळंच पीक खाऊन टाकले. चीनच्या अजस्त्र लोकसंख्येला खायला काही उरलं नाही आणि कोट्यवधी माणसं मरून गेली. सरकारी आकडेवारीनुसारच बळी पडलेल्या माणसांची संख्या दीड कोटी होती तर खरा आकडा साडेचार कोटी ते पावणेआठ कोटी या दरम्यानचा होता. या टोळांना संपवण्याचं काम निसर्गानं चिमण्यांसारख्या पक्ष्यांकडं दिलं होतं अन त्यात माणसानं हस्तक्षेप केल्यानं माणसावरच संक्रांत आली. त्यापेक्षा चिमण्यांनी पीक खाऊनही माणसांना अन्न मिळत होतं.

... चीन कशाला ? आपल्याकडे लेप्टोस्पायरोसिसच्या साथीनं अनेक जण मरण पावली ती देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईच्या उपनगरांत तसंच कोकणातही, हे आपल्याला आठवत असेल. हा लेप्टोस्पायरोसिस प्राण्यांच्या मूत्रामधून माणसामध्ये येतो.

... "सार्स'ची 2002-03 मध्ये आलेली साथ आपल्याला अजून निश्‍चितच आठवत असणार. "सिव्हिअर ऍक्‍युट रेस्पिरेटली सिंड्रोम'चं लघुरूप म्हणजे "सार्स'. साध्या शब्दांत श्‍वसनमार्गात अडथळे आणणाऱ्या विषाणूचा धुमाकूळ. त्याची लागण जगात 8098 जणांना झाली अन 774 जण मेले. त्याला कारणीभूत होता कोरोनाच.

... सौदी अरेबियात प्रथम आढळलेला आणि पश्‍चिम आशियाई देशांत पसरलेला "मार्स' म्हणजे "मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम'. उंटांपासून त्याचा संसर्ग माणसाला झाला आणि अजूनही तो रेंगाळतोच आहे. त्यातील विषाणूही होता कोरोना.

... आता जगात धुमाकूळ घालणारा कोरोना विषाणू आणि सार्स-मार्सचा विषाणू यांच्यात थोडा फरक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्याला आता नोव्हेल कोरोना व्हायरस-2019 असं नाव दिलं असलं तरी त्याचा अभ्यास गेली काही वर्षे सुरू आहे. वटवाघळापासून हा विषाणू माणसांमध्ये आल्याचं संशोधन 2017 मध्ये करण्यात आलं होतं आणि कोरोनाच्या या वेगवेगळ्या प्रकारांपासून सावध राहण्याचा, दूर राहण्याचा इशाराही संशोधक देत होते, पण ऐकेल तर तो माणूस कसला ? अनेक वन्य जिवांच्या मांसाला चटावलेली त्याची जीभ या वन्य प्राण्यांची शिकार करायला भाग पाडत होती. चीनमध्ये तर अशा प्रकारच्या वन्य प्राण्यांच्या वापराला कायद्यानं बंदीही नव्हती. त्यामुळं तिथल्या मांसांचे बाजार वटवाघळं, उदमांजरं, साळिंदरं, कासवं, उंदीर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांनी भरून जात असत. त्यातून हा कोरोनाचा नवा अवतार जगातल्या माणसाला भिडला आणि आज आपण त्याचं भीषण, रौद्र रूप पाहातो आहोत.

आपल्या निसर्गसंपदेमध्ये अनेको विषाणू सुखनैव नांदताहेत, पण माणूस आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी या वन्य प्राण्यांची शिकार करतो. आपल्याकडे रानडुकरे, जंगली ससे, घोरपडी, हरणे यांची शिकार करण्याचे प्रकार आपण अनेकदा ऐकतो. सलमान खानने केलेल्या हरणाच्या शिकारीच्या आणि त्याच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या खटल्याच्या बातम्या आपण वाचतो, पुण्यासारख्या शहरांमधील काही झोपडपट्ट्यांमध्ये घोरपडी विकल्या जातात, हेही आपण जाणून आहोत. अनेक आदिवासी पट्ट्यांमध्ये समोर दिसेल तो प्राणी खाल्ला जातो. तिथं उंदीर, मोर, माकड, वन्य पक्षी खाल्ले जातात.

एका बाजूने आपण वन्य प्राण्यांची शिकार करतो तर दुसरीकडे बेसुमार जंगलतोड करून या वन्य प्राण्यांना आसऱ्यासाठी माणसाच्या जवळ यायला भाग पाडतो. निसर्गचक्राला, जैविक साखळीला आपण तोडतो. "वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड' म्हणजे "डब्ल्यूडब्ल्यूएफ' ही जागतिक पातळीवर निसर्गसंवर्धनासाठी काम करणारी संस्था आपल्याला माहिती आहे. तिने केलेल्या अहवालानुसार 1970 पासून आतापर्यंत आपण साठ टक्के वन्यजीव नष्ट केले आहेत. त्यामुळं आपली संस्कृतीच नष्ट होण्याची भीतीही तिनं व्यक्त केली. दरवर्षी 2000 विविध प्रजाती नष्ट होत आहेत. गेल्या वर्षभरात जंगलांना लागलेल्या (त्यातील काही लावलेल्याही) आगीचं अन त्यानं नष्ट झालेल्या वनसंपदेचं प्रमाण लक्षणीय आहे. ऑस्ट्रेलियात या वर्षीच एक कोटी बारा लाख हेक्‍टरवरचं अरण्य होरपळलं आणि त्यातील शंभर कोटी वन्यजीव मेले. अलास्कातील आगीनं 16 लक्ष हेक्‍टर जंगल, इंडोनेशियातील आगीनं 11 लाख हेक्‍टर जंगल तर रशियातल्या सायबेरियातील आगीनं 10 लाख हेक्‍टर जंगल संपलं. या आगीतून वाचलेले वन्यजीव माणसांच्या वस्तीकडे सरकले अन त्यांच्याबरोबर विषाणूही. चीनमध्ये 1958 मध्ये आलेल्या टोळधाडीचा आपण उल्लेख केला, पण गेल्या वर्षी इराण, सौदी अरेबिया आणि आफ्रिकेतल्या काही देशांत 20 अब्जांच्या संख्येने टोळधाड आली आणि तिनं अडीच लाख हेक्‍टरवरचं पीक संपवलं.

पूर्णपणे शाकाहारी होणं अधिक श्रेयस्कर का निवडक प्राण्यांचं प्रजोत्पादन करून, सर्व प्रकारची काळजी घेत प्रथिनांसाठी मांसाहारही करणं योग्य, या वादात आता जाण्याचं कारण नाही. वन्य प्राण्यांचा आपल्या अन्नात समावेश न करणं, त्यांना आपल्यापासून आदरपूर्वक दूर ठेवणं आणि त्यासाठी त्यांचं नैसर्गिक घर सुरक्षित ठेवणं एवढं तर आपण करू शकतो.

... पण आपल्याला काय दिसतं ? आपल्याला दिसते निसर्गाविषयी उदासीनता, नैसर्गिक साधनसंपत्ती ओरबाडण्याची वृत्ती. या वृत्तीनं अतिरेक केल्याची शिक्षा निसर्गानं माणसाला आज-शनिवार- 4 एप्रिलपर्यत 57 हजारांवर माणसांचा कोरोनाच्या प्रादुर्भावात बळी देऊन केली आहे. पुढील दोन महिन्यांत मर्यादित असलेली भारतातील कोरोनाची लागण आणखी वाढली तर ? ती वाढू नये यासाठी संचारबंदी, एकमेकांपासून दूर राहणे वगैरे गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील, पण एकदा(ची) ही साथ आटोक्‍यात आल्यावर आणि आताचा धुरळा बसल्यावर माणूस पुन्हा निसर्गाला लुबाडण्याचा आपला राक्षसी उद्योग सुरू करणार का निसर्गाची जपणूक करीत आपल्या स्वास्थ्याची काळजी वाहणार हा खरा प्रश्‍न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com