कोरोना, लॉकडाऊन आणि आंब्याची पेटी

Lockdown
Lockdown

आज दुपारी पुण्याच्या सील केलेल्या पेठेतल्या एका मित्राचा फोन आला...
'अहो, आंब्याच्या पेट्या मागवल्या होत्या, त्या घ्यायला गेलो तर शनिपारापाशी पोलिसांनी अडवलं अन नोटीस दिली..., सगळ्या रस्त्यांवर बॅरिकेड टाकलेत, गाड्या चालवता येत नाहीत, पोलिस अडवताहेत..., सकाळी सात ते बाराच फिरू दिलं जातयं..., आम्हाला त्रास होतोय...''

त्याला आधी पूर्ण बोलू दिलं...
म्हणालो, 'झालं तुझं ? आता बोलू ?''...
'हां बोला...''
'अरे..., पहिली गोष्ट म्हणजे जाहीर झालेली वेळ सात ते बारा नाहीये तर दहा ते बारा अशी आहे..., खरं म्हणजे त्या दोन तासांतही कोणाला फिरू देता कामा नये, अशी परिस्थिती आता आहे. या वेळेत लोकं उत्सवासारखी गर्दी करताहेत, सणासारखी खरेदी करताहेत, एकमेकांजवळ जाताहेत, असं चित्र आहे का नाही ? ''

... 'अं..., हो..., तशीच स्थितीये...''
'मग काय उपयोग आहे या लॉकडाऊनचा आणि तुमचा भाग सील करण्याचा ? त्या दोन तासांत एकमेकांजवळ जाऊन बाधित असलेला कोणीही दुसऱ्याला बाधित करू शकतोय. म्हणूनच पुढचे पंधरा दिवस अजिबात घरातून बाहेर पडता कामा नये..., पंधरा दिवस दूध घेतलं नाही तर काय बिघडतं ? कोरा चहा पिऊ शकतो आपण. भाज्या संपल्या, अगदी पीठ संपलं तर डाळी-तांदूळ घरात आहेत. पिठलं-भात करून आपण खाऊ शकतो. पंधरा दिवस घराबाहेर पडायचं नाही म्हणजे नाही. जो बाधित असेल त्याला त्रास झाला तरच तो बाहेर पडेल आणि थेट दवाखान्यात जाईल. एक फोन केला तर सायरस वाजवत गाडी येते, पण दुसऱ्या कुणीही बाहेर पडायचं नाही अगदी शेजारच्या घरी जाऊनही गर्दी करायची नाही... टीव्ही पाहा, पुस्तकं वाचा, घरातल्या घरात गप्पा मारा-भेंड्या खेळा. कॅरम-पत्ते खेळा. घरातल्या मंडळींशी म्हणजे इतरांशी बोलून कंटाळा आला तर माझ्यासारख्या मित्राला फोन करून गप्पा मारा.''

'पटतयं तुमचं...''
'पटतयं ना ?. आंबे कसले मागवतोस ? ही काय आंबे खायची वेळ आहे का ? आधी आपला जीव राहिला तर आंबे. आंबे आता मे महिन्याच्या पंधरा तारखेनंतर... तुला नोटीस देऊन सोडलं म्हणजे फारच सौम्य कारवाई केली, खरं तर तुझ्यावर. माझा एक मित्र रात्री मला फोन करून गाणी म्हणत बसतो..., मीही ऐकतो आणि आम्ही जुन्या गाण्यांच्या आठवणी काढत बसतो... खरं म्हणजे अगदीच ज्याच्या घरातलं सगळचं संपलं असेल तर त्याला घरपोच डिलिव्हरी मिळेल, अशी व्यवस्था प्रशासनानं केली पाहिजे, पण बाकीच्या 99 टक्के लोकांनी घरात आहे, तेच पुरवून खाल्लं पाहिजे. तेल-चटणी-भाकरी, पोहे, फोडणीचा भात, पुलाव काहीही करता येतं. थोडं कमी खाल्लं पंधरा दिवस तर काय बिघडतयं ? पेठा सील केल्या त्याचं कारण सगळ्यांनाच माहितीये ना ? पेठांत मोठ्या प्रमाणात बाधित सापडलेत, म्हणूनच ना ? त्यांचा संसर्ग पेठांबाहेरच्या पुणेकरांपर्यंत पोहोचू नये अन पेठांमधल्या इतर नागरिकांनाही होऊ नये, म्हणूनच ना ? लक्षात ठेव, या कोरोना विषाणूचा लागणीचा काल साधारणतः चौदा दिवसांचा सांगितलायं. या चौदा दिवसांत बाधित माणसाला त्रास व्हायला लागला तर तो दवाखान्यात जाईल. त्याची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर चौदा दिवसांत तो बराही होईल, परंतु दुसऱ्याला बाधित करणार नाही. चौदा दिवसांनी बाधा झालेले सर्व जण बरे होतील आणि विषाणू हद्दपार होईल, पण आपण सकाळच्या दोन तासांत संसर्ग पसरवतो आहोत. मग उरलेले बावीस तास घरी बसण्यात काय अर्थ राहिला ? ''

'खरं आहे, तुमचं...''
'आणि एक सांग. पोलिस, महापालिका प्रशासन, डॉक्‍टर-नर्स ही आपल्यातलीच माणसं आहेत ना ? ते मुद्दाम त्रास थोडेच देणार आहेत ? ते काय रॅंड आहेत का बळजबरी करायला ? पण तुम्ही मंडळी रात्री गल्लीत गप्पांचे फड जमवायला लागलात, तर मात्र त्यांना तसं वागावं लागेल. मला आतापर्यंत जे पोलिस भेटले ते सगळे जण आधी हात जोडत होते आणि कुणी आगाऊपणा केला तरच ते काठीचा वापर करत होते. जे चाललयं ते आपल्याच भल्यासाठी ना ? आपणच जिवंत राहावो, यासाठी ना ?''

'चांगलंच अंजन घातलं तुम्ही मला... आता मी आमच्या पेठांमधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना असाच मेसेज करतो... आणि मी घरीच राहातो...''
'धन्यवाद मित्रा...'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com