पुण्यातच सुरू झाली होती मुस्लिम मुलींसाठी पहिली शाळा, कोण होते वझीर बेग?

अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतात पाय रोवू लागली आणि त्यानंतर देशात आधुनिक शिक्षणपद्धत रुढ झाली. अमेरिका आणि इंग्लंडमधून धर्मप्रसारासाठी आलेल्या ख्रिस्ती मिशनरींनी या देशात पहिल्यांदाच विविध धर्मांच्या आणि जातीजमातींच्या मुलांमुलींसाठी आधुनिक शिक्षणाची दरवाजे खुली केली.
 पुण्यातच सुरू झाली होती मुस्लिम मुलींसाठी पहिली शाळा, कोण होते वझीर बेग?

अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतात पाय रोवू लागली आणि त्यानंतर देशात आधुनिक शिक्षणपद्धत रुढ झाली. अमेरिका आणि इंग्लंडमधून धर्मप्रसारासाठी आलेल्या ख्रिस्ती मिशनरींनी या देशात पहिल्यांदाच विविध धर्मांच्या आणि जातीजमातींच्या मुलांमुलींसाठी आधुनिक शिक्षणाची दरवाजे खुली केली.

या शिक्षणास सर्वांत प्रखर विरोध झाला तो इथल्याच लोकांकडून. या शाळांत शिकण्यासाठी मुलांमुलींना गोळा करणे हे अत्यंत अवघड काम होते. अनेकदा या मुलांमुलींनी शाळेत यावे यासाठी दरवेळेस त्यांना पैसे, कपडेलत्ते पुरवावे लागत असे. मुलांमुलींच्या पालकांच्या शिक्षणाबाबतच्या अनास्थेमुळे नव्याने सुरु झालेल्या या शाळा अल्पावधीत बंद पडत असत.

अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत १८४०च्या दशकाच्या मध्यात पुण्यात केवळ मुस्लीम समाजातील मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा सुरु करण्यात आली होती आणि या शाळेतील शिक्षक होते वझीर बेग.

पुण्यातच एका मुस्लीम कुटुंबात जन्म झालेल्या आणि तरुणपणात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या वझीर बेग यांच्याकडे भारतात केवळ मुस्लीम मुलींसाठी आधुनिक शिक्षणपद्धतीची असलेली पहिलीवहिली शाळा सुरु करण्याचे श्रेय जाते.

वझीर बेग आणि महात्मा जोतिबा फुले एकाच वयाचे. जोतिबांप्रमाणे वझीर बेग यांचाही जन्म १८२७च्या आसपासचा.

बेग यांचा ख्रिस्ती धर्माकडे १८४२ पासून ओढा होता, बहुधा जोतिबा फुले यांच्याप्रमाणे त्यांनीसुद्धा स्कॉटिश मिशनरींनी पुण्यात चालवलेल्या शाळांत शिक्षण घेतले असावे. मात्र उघडपणे त्यांनी आपली धर्मश्रद्धा व्यक्त केली नाही. आपल्या धर्मांतराचा आपल्या मुस्लीम कुटुंबावर काय विपरीत परिणाम होईल या शंकेने त्यांनी आपली धर्मश्रद्धा लगेचच प्रकट केली नाही.

एका सरकारी शाळेचे हेडमास्तर होण्यास त्यांनी नकार दिला, याचे कारण म्हणजे स्वतःला एक मुस्लीम म्हणवून घेत आणि आपली धर्मश्रद्धा लपवून ज्ञानदान करण्यास ते तयार नव्हते.

स्कॉटिश मिशनरींच्या प्रभावामुळे ख्रिस्ती झालेल्या व्यक्तींमध्ये वझीर बेग या मुस्लीम व्यक्तीचा समावेश होता. एका स्कॉटिश मिशनरी कुटुंबाशी संपर्क आल्यानंतर १८४६ च्या सप्टेंबर महिन्यात त्यांनी बाप्तिस्मा घेऊन उघडपणे ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. हे स्कॉटिश मिशनरी कुटुंब म्हणजे सावित्रीबाई आणि जोतिबा फुले या दोघांचेही शिक्षक असलेले रेव्हरंड जेम्स मिचेल दाम्पत्य असावेत.

याचे कारण म्हणजे या काळात या स्कॉटिश मिशनरी कुटुंबाचे पुण्यात वास्तव्य होते. रेव्हरंड जॉन स्टिव्हन्सन आणि जेम्स मिचेल यांनी १८३० ला पुण्यात स्कॉटिश मिशनचे काम सुरु केले. स्टिव्हन्सन यांनी लवकरच ईस्ट इंडिया कंपनीचे चॅप्लेन (धर्मगुरु) पद स्विकारले. त्यानंतर पुण्यात स्कॉटिश मिशनची धुरा जेम्स मिचेल त्यांच्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत म्हणजे १८६६ पर्यंत वाहत होते. मिसेस मार्गरेट शॉ मिचेल यांच्याकडे सावित्रीबाई फुले यांनी अद्यापनाचे धडे घेतले.

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या `सत्यशोधक' चित्रपटात जोतिबांचे शिक्षक म्हणून रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्यावर काही प्रसंग चित्रित करण्यात आले आहेत.

बेग यांच्या धर्मांतरामुळे त्यांच्या स्वकियांनी त्यांना प्रचंड विरोध केला. त्यांना त्यांच्या हत्येची धमकीसुद्धा देण्यात आली होती. यानंतर पुण्यात रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या शाळेत बेग शिकवू लागले. स्कॉटिश मिशनच्या शाळेत बेग हे एक उत्तम शिक्षक मानले जात असत. याच काळात वझीर बेग यांनी पुण्यात केवळ मुस्लीम मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा सुरु केली होती.

जॉन टेरेन्स यांनी `स्टोरी ऑफ अवर मिशन्स : वेस्टर्न अँड सेंट्रल इंडिया’ या १९०२ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात लिहिले आहे :

``स्कॉटिश मिशनच्या अगदी सुरुवातीच्या काळात इस्लाम धर्मातून ख्रिस्ती झालेल्या वझीर बेग यांनी काही काळ मुस्लीम मुलींसाठी एक शाळा चालू केली होती. त्याशिवाय डॉ. मरे मिचेल यांनी आपल्या शाळेत सत्तर मुलींना आणण्यास यश मिळवले होते. विशेष नमूद करण्याची बाब म्हणजे या शिक्षणासाठी एक छोटीशी रक्कम फी म्हणून सुद्धा आकारली जात असे.

त्यानंतर काहीं काळाने अशीच एक शाळा प्रखर विरोधाला तोंड देत एकदोन वर्षे चालवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र या कार्यात सातत्य नव्हते, मिस स्मॉल यांची नेमणूक करण्यात आली तेव्हा समाजाच्या या घटकासाठी काहीच करण्यात येत नव्हते. ‘’

हिंदुस्थानी आणि पर्शियन भाषांवर वझीर बेग यांचे प्रभुत्व होते. त्याशिवाय अरेबिक, तुर्की आणि इंग्रजी भाषा ते शिकले. पुण्यात ते नंतर लॅटिन आणि ग्रीक भाषासुद्धा शिकले. ख्रिस्ती मिशनरी म्हणून कार्य करण्याचे आपल्याला पाचारण आहे अशी त्यांची भावना होती.

वझीर बेग यांनी १८५३ साली ईशज्ञानाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि १८५४ साली ते स्कॉटलंडला गेले, तेथे युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गमध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे त्यानीं ठरवले होते. या विद्यापीठाच्या कागदपत्रांत मात्र त्यांचे नाव दिसत नाही. लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सचे सदस्यत्व त्यांना १८६१ साली मिळाले.

मेलबर्न येथे आल्यानंतर स्थानिक प्रेस्बीटेरियन चर्चच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले. पोर्ट अल्बर्ट येथे १८६४ साली धर्मगुरु म्हणून त्यांचा दीक्षाविधी झाला. सिडनी येथील युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी येथे पौर्वात्य भाषा आणि साहित्य या विषयांवर अरेबिक ही मुख्य भाषा ठेवून व्याख्यातेपद निर्माण केले होते, त्या पदावर १८६६च्या डिसेंबर महिन्यात बेग यांची नियुक्ती झाली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच पौवार्त्य संशोधनासाठी एक विभाग स्थापन झाला होता.

त्याशिवाय पौर्वात्य भाषांसाठी अनुवादक म्हणून ऑस्ट्रेलियन सरकारने बेग यांची नेमणूक केली, मात्र विद्यार्थ्यांच्या पुरेशा संख्येअभावी हे व्याख्यातेपद काही काळच टिकले. नॉर्थ कॅरोलिनातील ग्रीनव्हिल येथील बॅप्टिस्ट कॉलेजने त्यांना १८६४साली मानद डॉक्टर ऑफ लॉ (एलएलडी) पदवी प्रदान करुन त्यांच्या विद्वत्तेचा सन्मान केला.

वझीर बेग ऑस्ट्रेलियात प्रेस्बीटेरियन चर्चचे धर्मगुरू बनले. बेग यांच्या या आध्यात्मिक जीवनक्रमातील या घटनेचे जॉन टॉरेन्स या लेखकाने आपल्या पुस्तकात भारतातील त्याकाळच्या एका महत्त्वाच्या राजकीय घटनेशी तुलना केली आहे. एका भारतीय नेत्याची लंडनमधल्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये कायदा करण्यासाठी निवड झाली आहे असे या लेखकाने म्हटले आहे. ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय नागरीक (१८९२-९५) म्हणून निवड होणाऱ्या दादाभाई नौरोजी यांचा हा संदर्भ आहे हे उघड आहे.

क्विन्सलँड येथील प्रेस्बीटेरियन चर्चमध्ये १८६७ साली काही काळ धर्मगुरु म्हणून काम केल्यानंतर बेग चालमर्स चर्चचे प्रमुख होते. या पदाचा त्यांनीं १८८२ साली राजीनामा दिला. प्रेस्बीटेरियन चर्चच्या युतीचे ते खांदे समर्थक होते आणि चर्चच्या अनेक समित्यांवर त्यानीं काम केले.

बेग यांनी लिहिलेल्या `मॅन्युअल ऑफ प्रेस्बीटेरियन प्रिन्सिपल’ चे सिडनी येथे १८७० साली प्रकाशन झाले. रोमन कॅथोलिक पंथाचे बेग कट्टर विरोधक होते. बेग यांचा विवाह मार्गारेट रॉबर्टसन स्मिथ यांच्याशी १२ मार्च १८७२ रोजी झाला होता आणि त्यांना दोन मुले होती. रेव्हरंड वझीर बेग यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांचे ४ जानेवारी १८८५ रोजी निधन झाले आणि वेव्हर्ले कबरस्थानांत त्यांना चिरविश्रांती देण्यात आली.

मुस्लीम समाजातील मुलींना आधुनिक पद्धतीचे शिक्षण देण्याच्या कार्यांत स्कॉटिश मिशनच्या वझीर बेग यांना यश आले नाही, तरी काही वर्षांनी स्कॉटिश मिशनच्याच मिशनरींना या कार्यांत अगदी भरीव यश मिळाले.

जोतिबा फुले यांचे एक प्रेरणास्थान असलेल्या,पुण्यातल्या संस्कृत कॉलेजचे म्हणजे आताच्या डेक्कन कॉलेजचे काही काळ प्राचार्य (व्हिझिटर) असलेल्या रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांनी पुण्यात केवळ मुस्लीम मुलींसाठी एक शाळा सुरु केली होती. या शाळेस मुस्लीम मुलींचा नुसता चांगलाच प्रतिसाद लाभला नाही तर या शाळेची असलेली फी भरण्याससुद्धा मुलींचे पालक तयार होते.

भारतात लोकांचा मुलींच्या शिक्षणा बत असलेल्या दृष्टिकोनाबाबत आणि स्कॉटिश मिशनच्या मुस्लिम मुलींसाठी चालवलेल्या स्वतंत्र शाळेबाबत विस्तृत माहिती जॉन मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिली आहे. ती अशी :

``ब्राह्मण आणि इतर जातींचे लोक आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत खूप उत्साही होते तरी आपल्या मुलींच्या शिक्षणाबाबत ते बेफिकीर होते. मिशनरींच्या आणि स्टुडंट्स सोसायटी ऑफ बॉम्बेच्या उदाहरणामुळे स्थानिक लोकांनी याबाबत पुढारी घेतला आणि सरकारने त्यांना सर्व प्रकारचे उत्तेजन दिले. यासाठी सरकारने दक्षिणा फंडातून दरवर्षी सहाशे रुपयांची रक्कम पुरवली. मात्र या शाळांत मुलींची संख्या फक्त दिडशे होती. सरकारने आमच्या मिशनला रक्कम दिली नव्हती तरी आमच्या शाळेत १८६२ च्या मे महिन्यात मुलींची संख्या तिनशेपर्यंत वाढली होती.

सर्वांत खास बाब म्हणजे आमच्या मिशनची एक मुस्लिम समाजातील मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा होती आणि या शाळेचा संपूर्ण खर्च या विद्यार्थिनींनी दिलेल्या फिमधून चालवला जात होता. या शाळेत विद्यार्थिनींची संख्या सत्तर होती. त्याकाळात केवळ मुस्लिम मुलींसाठी चालवली जाणारी पुण्यातील ही एकमेव शाळा होती.

त्याकाळात शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून फी घेणे ही एक विशेष बाब म्हणावी लागेल. याचे कारण एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला कोलकाता, नंतर मुंबईत, अहमदनगर आणि पुण्यात ख्रिस्ती मिशनरींनी शाळा सुरु केल्या तेव्हा शाळेतल्या मुलांमुलींसाठी अन्न, कपडेलत्ता किंवा काही रक्कम यासारखे आमिष देणे आवश्यक असायचे. नंतरच्या काळातसुद्धा म्हणजे अगदी जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनासुद्धा आपल्या शाळांत विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी असे करावे लागत असे.

भारतातील मुस्लीम समाजातील काही समाजसुधारकांनीसुद्धा केवळ मुस्लीम मुलींसाठी शाळा सुरु केल्या होत्या, मात्र त्यासाठी खूप काळ जावा लागला होता. त्यादृष्टीने अव्वल ब्रिटिश अमदानीच्या काळात वझीर बेग आणि जॉन मरे मिचेल यांची ही कामगिरी फार मोलाची असे म्हणावे लागेल.

भारतातील स्त्रीशिक्षणाच्या इतिहासात रेव्हरंड वझीर बेग आणि रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांनी केलेले हे महत्त्वाचे योगदान कदाचित विस्मृतीत गेले असते. मात्र स्कॉटिश मिशनसंबंधीच्या दस्तऐवजांत आणि विविध पुस्तकांत मुस्लीम मुलींसाठी असलेल्या या शाळांबाबत उल्लेख आढळतो. त्यामुळे बेग आणि मरे मिचेल यांच्या या ऐतिहासिक कार्याची नोंद राहिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com