सांस्कृतिक चित्रकारितेला मिळावी साद अन्‌ दादही ! 

Painter.
Painter.

अनेक वर्षांपासून चालत आलेली चित्रकारिता आजही अस्तित्वात आहे. कोरोनासारख्या संकटामध्ये सर्वांनाच आर्थिक फटका बसला आहे. त्यात चित्रकारिता अपवाद नाही. चित्रकारितेला मोठा फटका बसलेला आज दिसून आला आहे. कोरोनाच्या काळात टाळेबंदीमध्ये अनेकांनी चित्रे रंगवली गेली. रंग आणि तोल यातला समन्वय साधत अनेक कलाकृती निर्माण केल्या. त्यातून मिळणारा आनंद घेतला. वेळ चांगला गेला असला तरी त्याची विक्री कशी करावी, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता आणि आहे. 

कोरोनाच्या काळात अनेक लोकटाळेबंदीत वेळ घालवण्यासाठी आपल्या छंदाकडे वळले. असे असताना निर्मिती कलाकृती लोकांपर्यंत पोचवण्याची इच्छा काही लोकांमध्ये होती. परंतु, काही कारणास्तव महागाईचा फटका या चित्रकारितेला बसला आहे. दैनंदिन जीवनामध्ये जीवनावश्‍यक वस्तू व जीवनावश्‍यक सेवा घेत असताना चित्रे विकत घेणे हे दुर्मिळ होत चालले आहे. आज चित्र रंगवताना जी साधने लागतात तीही महाग झालेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये चित्रकारितेपुढे मोठी संकटे उभी आहेत. 

रंगांची उधळण करत असताना चित्रकारांच्या मनामध्येच भीती निर्माण झाली आहे. आज अनेक नवोदित चित्रकार उदयास येत आहेत. अशामध्ये कलाकृतींना दाद मिळेल का, हा मोठा प्रश्न उभा आहे. सांस्कृतिक भारतीय बनावटीच्या कलाकृती लोकांना खूप आवडतात. कधीकधी त्यामध्ये रमून जातात. परंतु, ते विकत घेणे किंवा आपल्यापाशी असण्याची इच्छाही ते पूर्ण करू शकत नाहीत. अशावेळी चित्रे विकत घेतली जात नाहीत. त्याला योग्य किंमत येत नाही. एखादा व्यक्ती सांस्कृतिकदृष्ट्या त्याच्या नजरेतून कला पाहात असतो, अशावेळी कलेला किमतीच्या स्वरूपात म्हणजे पैशाच्या स्वरूपात रूपांतर करता येत नाही. अशावेळी अनेक नवोदित चित्रकार किंवा अगदी अनुभवी चित्रकारांच्या चित्रांना योग्य दाद मिळत नाही. यासाठी काय करावे, असे सर्वजण विचार करत आहेत. 

व्यावसायिक चित्रकारिता आणि छंदासाठी केलेल्या चित्रकारितेमध्ये खूप फरक आहे. पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी आपले सुप्त कलागुण बाहेर येत आहेत. एका प्रसिद्ध चित्रकाराने सांगितले आहे, की दोन प्रकारच्या कला असतात. एक तुम्ही स्वतःसाठी करता आणि दुसरी तुम्ही दुसऱ्यांसाठी करता; त्यालाच व्यावसायिक कला मानली जाते. पहिल्या कलेमध्ये आत्म्याची तृप्ती अनुभवली जाते, तर दुसऱ्या कलेमध्ये लोकांसाठी केलेल्या कलाकृतीला धनाची दाद मिळते. आज एकंदरीतच, सर्व कलाकार संघर्षमय परिस्थिती अनुभवत आहेत. अशा परिस्थितीमध्ये कलाकारांनी संयम बाळगला पाहिजे. योग्य वेळ आल्यावर चित्रकारितेला धनाच्या स्वरूपात तुम्हाला मोबदला मिळणारच आहे. त्याचबरोबर चित्र काढण्याचा आनंदही द्विगुणित होईल. 

एकंदरीत, आज परिस्थिती जरी अवघड असली तरी चित्रकारितेला थांबा नाही. प्रत्येक चित्र मन लावून काढावे आणि त्यात आपली संस्कृती झळकवावी, असे वाटत आहे. सांस्कृतिक योग्यता असल्यास आणि समाजासाठी चांगले करण्याचा उद्देश असल्यास तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. चित्रकारिता अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. जेव्हा इतिहास बघितला तर धनाची किंमत नसतानासुद्धा चित्रकारिता अस्तित्वात होती. म्हणजेच धनाची किंमत होण्यापेक्षा त्याचा व्यावसायिक उपयोग करण्यापेक्षा इतिहास घडवायचं सामर्थ्य चित्रकारितेमध्ये आहे. आज चित्रकारिता करायची असेल तर त्यातील रंगसंगती, आकार, भावना यांचा सुरेख संगम साधावा. सुरेख संगमाने एक उत्तम कलाकृती निर्माण होईल आणि त्यातूनच इतिहास घडेल. पुढची येणारी पिढी या सर्वांतून बोध घेईल. 

चित्रकारितेला दाद मिळत असताना काही लोकांनी पुढाकार घेऊन चित्रे विकत घ्यावीत असे वाटत आहे. योग्य तो दर आणि दाद यांचा संगम मिळून नक्कीच कलाकाराचे भविष्य सुधारणार आहे. त्यामुळे सर्वांनी प्रयत्न केला तरच चित्रकारितेला नवे वळण मिळेल. या संकटाच्या काळामध्ये कलाकारांना उचलून धरण्याचे काम आपण करावे. समाजाने प्रत्येकाच्या भावनांचा विचार करावा आणि आदर करावा; तरच चित्रकलेला एक सुंदर असे स्थान प्राप्त होईल. 

- ऋत्विज चव्हाण 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com