अपेक्षा करण्यापेक्षा प्रयत्न करा

 Try harder than expected
Try harder than expected

एका दुपारी वाचन करताना अचानक एक बातमी ऐकली. एका प्रसिद्ध अभिनेत्याने आत्महत्या केली. झगमगत्या दुनियेचा एक तारा पडद्याआड गेला. मन सुन्न झाले. मनात अनेक प्रश्‍न उभे राहिले. त्याने असे का केले असावे, काय कारण आहे, इतका प्रसिद्ध असताना टोकाचे पाऊल का घेतले असावे... असे नानाविध प्रश्‍न डोक्‍यात चालू होते, प्रश्‍नांनी गर्दी केली. 

आज माणूस अत्यंत तणावात आहे. आज जर तुम्हाला काही करायचं असेल तर तणावमुक्ती हा एकुलता एक पर्याय आहे. अत्यंत स्पर्धात्मक जीवन जगणारा माणूस आज ताण नावाने ग्रस्त आहे. त्याचेच एक उदाहरण आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. पैसा, गाडी, घर, बॅंकेत पैसा, प्रॉपर्टी, चकाचक रोशन दुनिया हे सर्व खालीच राहून जाणार आहे. राहणार आहे फक्त अंधारच. आपली जीवन ज्योत विझायच्या आधी जीवन जगणे शिकले पाहिजे. जीवनाचा प्रत्येक धडा, प्रत्येक पान नीट वाचले पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. यात आपण कमी पडत आहोत असे लक्षात आले तर गरज कितपत आहे हे जाणून घेणे अत्यंत आवश्‍यक आहे. काही लोक गरजांच्या पुढे जाऊन जीवन जगायचा प्रयत्न करतात आणि याचाच मानवी मनावर ताण येतो. 

छोट्या छोट्या गोष्टींत आनंद मिळवायला शिकला पाहिजे. आपण विसरून जातो की आनंद मनात आहे. सर्व जग एकीकडे आणि आपले मन एकीकडे. हीच परिस्थिती आहे, अशावेळी स्पर्धात्मक जीवन जगण्यापेक्षा जीवनाचे क्षण अशा आनंदात घालवावेत. 

आज बातमी एकताच मन सुन्न झाले. मनात थोडा अंधार झाला. विचारांनी काळोख गाठला. माझा कोणी नसताना "त्याची' एक्‍झिट चटका लावणारी होती. कुणाच्याही बाबतीत हे घडू शकते. कारण, काहीही असू शकते, पण याचा सर्वांवरच दूरगामी परिणाम झालेला दिसतोय. मी म्हटल्याप्रमाणे मन जर हरलेला असेल तर तुम्ही या जगात जिंकू शकत नाही. प्रथम पराभव हा मनातच होतो आणि मग जीवनाची वाट चुकते. आजचा तरुण अतिशय संवेदनशील आहे. हार त्याला सहन होत नाही आणि जिंकायची ताकद नसल्याने आणि प्रयत्न कमी पडत असल्याने टोकाच्या भूमिकेवर जावे लागत आहे. व्यसनाधीन माणूस सुद्धा याला अपवाद नाही. व्यसनही माणसाला खात आहे. कुठली गोष्ट किती मर्यादेपर्यंत करायची याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. 

ताणावपासून मुक्त होण्यासाठी संगीत ऐकावे, आवडता छंद जोपासावा, प्राणीमात्रांवर दया करावी समाजातील सकारात्मक गोष्टींवर लक्ष ठेवावे, तणावमुक्तीचे सर्व पर्याय खुले ठेवावे. लहान लहान गोष्टीत मजा करायला शिकावे, टीव्ही बघावा, नकारात्मक गोष्टीपासून लांब असावे असे अनेक पर्याय आहेत. योगा करावा, त्यामुळे मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. अशा अनेक गोष्टी केल्याने मन सकारात्मक राहते. युवकांनी मोठ्यांचे मार्गदर्शन घ्यावे आणि लहानांना मदत करावी. तसेच थोरांनी - मोठ्यांनी लहानांना सांभाळून घ्यावे, तर सामाजिक व मानसिक स्वास्थ राहील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठलीच अपेक्षा करू नये. अपेक्षाभंग झाल्यानंतर जो ताण येतो तो घातक ठरू शकतो. या जगात अपेक्षा करणे घातक ठरू शकते. अपेक्षा करण्यापेक्षा प्रयत्न व भर द्यावा तरच तुमच्या आयुष्यातले ध्येय गाठता येईल. अंधारातून उजेडाकडे जाताना एक दिवा लावत जावा. लहान दिव्यापासूनच प्रकाश निर्माण होणार आहे. त्यामुळे अंधाराला न घाबरता आपल्या प्रयत्नांना आपल्यातील ऊर्जेला प्रोत्साहन द्यावे तरच एक सुंदर आयुष्य जगू शकतो. 

आयुष्य हे पाठ्यपुस्तकासारखे आहे. रोज एक पान वाचले तरी चालेल, वाचनाचा आनंद, त्यातून मिळालेला अनुभव, हे जीवन बदलू शकतो. रोज एक पान उलटत जावे, आयुष्य असेच आहे. मागचे पान अनुभव घेऊन जाते आणि आपल्या ज्ञानात, आपल्या मनात नवीन उमेद आणते. सध्याच्या तणावपूर्ण जीवनात पैशाची कमतरता, रोगराई, जीवनातील उतार-चढाव, समोर येणारी दुःखं यातून मार्ग काढतच आपणास पुढे जायचे आहे. प्रत्येकाने जाणले पाहिजे, आयुष्य हे संघर्षमय असणारच आहे. प्रत्येक गोष्टीचा संघर्ष करायला जी मजा आहे ती तुम्हाला आयुष्यात आनंद देईल. संघर्षातून आयुष्य समृद्ध होईल. प्रत्येक क्षण, प्रत्येक काळ हा विचारून येत नाही, पण सुखदुःखाच्या खेळात प्रकाशाचा एक किरण महत्त्वाचा ठरतो. जसे अंधारात दिवा लावला की भीती काळजी हे सगळं निघून जाते आणि येतो तो उत्साह आणि एक नवीन उमेद. अशा जीवनात, जीवन प्रवासात आपल्याला चालायचे आहे. अंधारातून वाट काढत आपले ध्येय गाठायचे आहे आणि कुठल्याही प्रकारची टोकाची भूमिका न घेण्याचा पण करायचा आहे. तरच एक समृद्ध समाज निर्माण होईल. 

महाराष्ट्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com