ठाकरेंचा ‘मास्टरप्लॅन’; शिंदेंसाठी ‘स्पेशल ४०’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेत ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष पेटतो

ठाकरेंचा ‘मास्टरप्लॅन’; शिंदेंसाठी ‘स्पेशल ४०’

‘स्पेशल २६’ हा चित्रपट आपण पाहिला असेल... त्यात अक्षय कुमार, अनुपम खेर हे जसे अवैध संपत्ती असलेल्या राजकारण्यांना फेक आयटी अधिकारी बनून जसा चुना लावतात ना, तसंच काहीसं राज्याच्या राजकारणातही आपल्या मतदारांनाही चुना लागलाय का? असा प्रश्न पडतो.

म्हणजे २०१९ साली शिवसेना-भाजप युतीत निवडणूक लढतात, विजयीसुद्धा होतात पण सत्तावाटपावरुन दोन्ही पक्षात मतभेद होतात मग शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीला हाताशी धरुन तीनचाकी सरकार स्थापन करतात. हे सरकार कसंबसं अडीच वर्ष चालतं. पण २०२२च्या जून महिन्यात राज्याच्या राजकारणात भूकंप येतो. एकनाथ शिंदेंसारखा पक्षातला वरच्या फळीतला नेता आणि दुसऱ्या क्रमांकाचं मंत्रिपद असूनही तब्बल ४० आमदारांच्या पाठिंब्यावर शिवसेनेतून बंडखोरी करतो आणि गुवाहाटीची वाट धरतो. त्यानंतर शिवसेनेत ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष पेटतो आणि पुढे जे काही होतं ते तुम्ही आम्ही मागील ३ महिन्यांपासून दररोज अनुभवतोय.

अशातच आता भाजपच्या पाठबळावर मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी एक मास्टरप्लॅन आखलाय. तो म्हणजे ज्या ४० आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षातून बंडखोरी केली आणि राज्याच्या सत्तेच्या चाव्या मिळवल्या. आता त्याच ४० बंडखोरांसमोर ठाकरेंचे स्पेशल ४० चॅलेंज देणार आहेत. ठाकरेंचे हे स्पेशल ४० म्हणजे बंडखोरांच्या मतदारसंघातील शिवसेनेचं नवं नेतृत्व असणार आहे. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही जोरदार तयारी सुरु केली आहे.

मागील काही दिवसांपासून मातोश्री आणि शिवसेना भवनातही पक्ष बळकटीसाठी बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी आपले स्पेशल ४० बनवण्यासाठी पदाधिकाऱ्यांची चाचपणी सुरु केल्याचं कळतंय. त्याचाच एक भाग म्हणून की काय मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून संजय देशमुखांना पुढे करण्यात येणार आहे. अशाच प्रकारे इतर जिल्ह्यांमध्येही बंडखोरांना शह देण्यासाठी आणि तोडीस तोड देण्यासाठी तगड्या नेत्यांना घडवण्यावर ठाकरेंनी भर देण्याचं ठरवलंय. त्यामुळे आता ४० बंडखोरांना ठाकरेंचे स्पेशल ४० कसे काय चॅलेंज देतात हे तर येणारा काळच ठरवेल.

तरी, दुसरीकडे निवडणुका लढवण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू यशस्वीपणे लावून धरण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे. आदित्य ठाकरेही शिवसंवाद यात्रेतून महाराष्ट्रभर दौरा करताहेत. यावेळी आदित्य ठाकरेंचाही बंडखोर आमदारांच्या मतदारसंघावर डोळा असल्याचं दिसतंय. तर शिवसेना ठाकरे गटाकडून सुषमा अंधारेही आपल्या खास आक्रमक शैलीतून शिंदे गटावर आणि बंडखोरांवर निशाणा साधताना दिसताहेत. त्यामुळे माध्यमांसमोर शिंदे गटाला आव्हान देणाऱ्या सुषमा अंधारे, आदित्य ठाकरेंसोबतच निवडणुकीतही शिंदेंसह ४० बंडखोरांना ठाकरेंचे स्पेशल ४० कसं चॅलेंज देतात हे पाहणं महत्वाचं असेल. याविषयी आपल्याला काय वाटतं हे कमेंट करुन नक्की कळवा.