कोरोना : सांगा तरी काय करायचं (कविता) 

विवेक बारकुल (vivekbarkul123@gmail.com)
Sunday, 26 April 2020

कोरोनावर युवा कवी विवेक बारकुल यांनी लिहलेली कविता

कोण कुठला आला हा विषाणू,
जणू स्फोट व्हावा परमाणु,
गरगर फिरला जीवनाचा सुकाणू,
          सांगा तरी काय करायचं 

बाहेर आहे लॉकडाऊन,
आणि घरी अस्तित्व गौण,
त्यामुळे घडे सक्तीचे मौन,
          सांगा तरी काय करायचं 

कंपनीने दिलंय वर्क फ्रॉम होम,
पण त्यातच आहे खरी गोम,
नुसतेच कॉल्स - कामाच्या नावाने बोंब,
          सांगा तरी काय करायचं 

म्हटलं जरा करावा व्यायाम,
बोरिंग रुटीनला नवीन आयाम,
गाळू दररोज बादलीभर घाम...
घामाचं माहीत नाही, पण वेळ बराच जातोय !
वाढू नये वजन, म्हणून दोनच टाइम खातोय !
तरी तो शनिरुपी काटा, ऐंशीच्या घरातच राहतोय !
          सांगा तरी काय करायचं 

टाळ्या थाळ्या वाजवल्या, दिवे पण झाले लावून..
नेक्स्ट टास्कची वाट पाहत, बातम्या झाल्या साऱ्या पाहून..
चिडून लाखोली अपशब्दांची, चीन निघाला आकंठ न्हाऊन..
          सांगा तरी काय करायचं

परंतु - 
जरी वाटे आहोत का ओलीस, आपलं जरा बरं आहे..
बाहेर पडणारे डॉक्टर आणि पोलीस,
हेच रियल हिरोज - एवढं खरं आहे !!

ह्यावर मात्र हे नाही विचारायचं,
की सांगा तरी काय करायचं,
आता फक्त एकच करायचं,
की येईना का फ्रस्ट्रेशन -
आपण फक्त घरातच राहायचं 
आपण फक्त घरातच राहायचं 

- विवेक बारकुल (vivekbarkul123@gmail.com)

इतर ब्लॉग्स