पाण्याचं गणित सोडवायला हवं...

Water should be tested
Water should be tested

    मध्यंतरी एक लेख वाचनात आला. लेखकाने एका मादक द्रवपदार्थ निर्मितीची कथा त्यात मांडली होती. यातून तो पदार्थ बनविण्यासाठी अनेक घटकांपैकी पाणी या घटकाचा किती अभ्यासपूर्ण वापर केला जातो, अमुक एका ठिकाणचेच पाणी कसे त्या पदार्थासाठी वापरले जाते आणि तो ‘ब्रॅण्ड’ जगभर कसा प्रसिद्ध आहे हे समजले आणि पाण्याबाबतचा चोखंदळपणा, उपलब्धता यात आपण किती दूर वा जवळ आहोत, याचा विचार करू लागलो. साधारण एखादा फिल्टर किंवा प्युरीफायर बसवला की, पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होते हा अनुभव सार्वत्रिक रूढ आहे. याशिवाय पाणी उकळून थंड करून गाळून पिणे, ऋतूनुसार विविध धातूंच्या भांड्यांचा वापर करणे, असे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी आपण प्रयोग करतो. आयुर्वेदात तर संस्कार केलेल्या पाण्याचा उल्लेख वाचायला मिळतो. अगदीच काही करणे शक्‍य नसेल, तर बाजारातील मिनरल वॉटर विकत आणून तहान भागविण्याची व्यवस्था सध्या आहेच.

शेतीच्या पाण्याबाबत मात्र उपलब्धतेपासूनच अडचणी आहेत. आपल्याकडे आजही शेतीला व्यवस्थित पाणी मिळत नाही. जेथे पाणी आहे तेथे ते उचलून शेतीपर्यंत न्यायची सोय तोकडी आहे. जेथे पाणी उचलून न्यायची व्यवस्था आहे; तेथे सुरळीत वीज उपलब्ध नाही. पाणी शेतापर्यंत आल्यानंतर ते किती प्रमाणात द्यायचे याचे गणितही अद्याप मांडले गेलेले नाही. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन करणारे काही सन्माननीय अपवाद आहेत; मात्र ही संख्या तुलनेत कमी आहे. याही पुढे प्रश्‍न राहतो तो पाण्याच्या गुणवत्तेचा. उपलब्ध असणाऱ्या पाण्यात कोणकोणते घटक आहेत, आपण घेत असलेल्या पिकास ते पूरक आहेत का, हे कळण्यासाठी पाणी परीक्षणाची आवश्‍यकता असते. पण जिल्ह्यात पाणी परीक्षण करून घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तीन टक्‍क्‍यांच्याही पुढे जात नाही. सध्या ठिबक सिंचन, हरितगृह संदर्भातील अनुदान देत असताना शासनाने पाणी परीक्षणाचा अहवाल देणे बंधनकारक केले आहे. यातून पाणी परीक्षण करून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे एवढीच काय ती सकारात्मक बाब; पण याबाबत आवश्‍यक तेवढे प्रबोधन अद्याप झालेले नाही. परीक्षणाला पाण्याचे नमुने आणताना ते कसे आणावेत याचे सोपे तंत्र आहे. ते सांगण्यापासून पाण्यातील कमी-जास्त घटक संतुलित कसे करावेत, इथपर्यंत शेतकऱ्यांना साक्षर करण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर, गडहिंग्लज या तालुक्‍यांतील पाण्यात क्षार, सोडियमचे प्रमाण आढळते; जे पीक, जमीन आणि अंतिमत: मानवी शरीरास घातक ठरू शकते. शिवाय शेतीत होत असलेल्या रासायनिक खतांच्या आणि औषधांच्या वापरामुळे खारपड जमीन, माती प्रदूषणाचे प्रमाणही वाढले आहे. त्यातून पाणी प्रदूषित होण्याचे प्रकार वाढले आहेत. हे पाहता पाणी परीक्षण करून ते संतुलित करण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज बनली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com