Blog : 'तिचे' चार दिवस

Blog : 'तिचे' चार दिवस
Summary

जागतिक मासिक पाळी दिवस. आजही या विषयावर हल्ली तितकेसे कोणी काही बोलत नाही. स्त्रियांच्या जीवनातील ते 'चार' दिवस अतिशय महत्वाचे असतात.

28 मे..... जागतिक मासिक पाळी दिवस. आजही या विषयावर हल्ली तितकेसे कोणी काही बोलत नाही. स्त्रियांच्या जीवनातील ते 'चार' दिवस अतिशय महत्वाचे असतात. त्या 'चार' दिवसांमुळे खरंतर स्त्रियांचे आरोग्य टिकून असते. दर महिन्याला येणारी मासिक पाळी ही स्त्रियांच्या जीवनातील नैसर्गिक घटना आहे. निसर्ग चक्रामधील सर्वात असीम शक्ति आपल्याला म्हणता येईल. त्या 'चार' दिवसात होणार्‍या वेदना ह्या फक्त त्या स्त्रीलाच समजू शकतात. लोकांच्या मनामध्ये, ह्या बद्दल असलेले अनेक समज - गैरसमज, त्या दिवसांतील स्वच्छता - अस्वच्छता, या बद्दल जागृती करण्यासाठी 28 मे हा दिवस 'जागतिक मासिक पाळी दिवस' म्हणून साजरा केला जातो. 28 मे हा दिवस निवडण्यामागे कारण म्हणजे, मासिक पाळी आल्यानंतर साधारणतः ती 'पाच' किंवा 'चार' दिवस राहते. परंतु, जास्तीत जास्त 'पाच' दिवस राहते आणि दर 28 दिवसांनी तिचे चक्र परत सुरु होते. त्यामुळे, वर्षातील पाचवा महिना म्हणून 'मे' महिना आणि 28 दिवसानंतर येते म्हणून 28 ही तारीख निवडली गेली आहे.

मासिक पाळीच्या 'चार' दिवसांबाबत अनेक समज आणि गैरसमज आजही मनात बाळगले जातात. महाराष्ट्रात तर आजही या गोष्टीला 'विटाळ' हा शब्द दिला आहे. मासिक पाळीबाबत एक स्त्री आणि एक पुरुष दोघांच्याही मनात याबद्दल एक वेगळीच भावना असते. आपण या विषयाला इतके घाबरतो, की आजही त्याबद्दल जास्त कोणी बोलायला तयार नसते. स्त्रियांच्या बाबतीत तर, मासिक पाळीच्या दिवसात तिला अनेक जाचक गोष्टींना सामोरे जावे लागते. या 'चार' दिवसांमध्ये तिला कुठल्याही गोष्टीला स्पर्श करण्यास मज्जाव असतो, तिला स्वयंपाक घरात प्रवेश नसतो, तिला मंदिरात प्रवेश नसतो, तिला घरात वेगळी वागणूक दिल्या जाते. अशा, कितीतरी गोष्टी आहेत समाजात, ज्या आजही तशाच चालू आहेत. स्त्रीच्या जीवनातील नैसर्गिक गोष्टीला सुद्धा, समाजाने वाईट ठरवले आहे. अनेक, जाती आणि धर्मांमध्ये मासिक पाळीला निषिद्ध मानले आहे. खरंतर, संपूर्ण मानवी जीवनाचा डोलारा त्यावर उभा आहे. मासिक पाळी ही माणसाच्या अस्तित्वाशी संबंधित आहे. स्त्रियांच्या आयुष्यात मासिक पाळीचे चक्र आहे म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. माणसाला जर त्या 'चार' दिवसांच्या वेदना नसल्या तरी ती आणि तिच्या 'चार' दिवसामुळे आपले अस्तित्व आहे. कदाचित एक स्त्री सगळे सहन करू शकते म्हणूनच निसर्गाने सुद्धा त्या 'चार' दिवसांतील त्रास सहन करण्यासाठी स्त्रीची निवड केली असावी.

Blog : 'तिचे' चार दिवस
मुलींना १० व्या वर्षी का येते मासिक पाळी?

मासिक पाळी, हा स्त्रीच्या जीवनातील अतिशय नाजूक आणि संवेदनशील विषय आहे. स्त्रियांचे संपूर्ण आरोग्य त्यावर अवलंबून असते. त्यामुळे, तिने या 'चार' दिवसात काळजी घेणे खूप महत्वाचे ठरते. अनेकदा स्त्रिया या 'चार' दिवसात आरोग्याची काळजी घेत नाहीत म्हणून, त्यामुळे त्यांना पुढे, अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेक, स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन्स काय आहे, हेच माहिती नाही. खेड्यामध्ये तर याबद्दल बोलणे म्हणजे, जणूकाही अपराधाच. आजही, खेड्यामध्ये या 'चार' दिवसांत अनेक स्त्रिया जुना 'कपडा' वापरण्यात धन्यता मानतात. ते कपडे धुवून धुवून परत तेच वापरायचे, आणि त्याला कोरडे होण्यासाठी इतर कपड्यां मध्ये त्याला बाहेर वाळू घालायचे. तिथपर्यंत सूर्यप्रकाश सुद्धा पोहोचू शकत नाहीत अशी त्याची व्यवस्था करायची. म्हणजे, आपल्याला मासिक पाळी बद्दल इतकी भीती आहे. अनेक, स्त्रिया अशाही सापडल्या आहेत, आपल्या 'चार' दिवसांमध्ये त्या लाकडाची राख वापरतात, कुणी गवत असे कितीतरी उदाहरणे आहेत. हे असे घडण्याचे कारण म्हणजे, या सगळया गोष्टी जाणून घेण्याची आणि त्यावर खुलेपणाने चर्चा करण्याची भीती वाटणे होय.

मासिक पाळी हा 'चार' चौघांमध्ये न बोलण्याचा विषय आहे. त्यामुळे त्यावर खुलेपणाने चर्चा होत नाही. अनेक स्त्रिया, आपल्या घरच्यांना सॅनिटरी नॅपकिन्स आणून द्या, असे म्हणायला सुद्धा घाबरतात. किंवा, स्वतःच मेडिकल मध्ये आणायला जात नाहीत. आणि, आणायला गेल्यात तरी अतिशय हळू आवाजात बोलतात आणि, मेडिकल मधला माणूस त्याच्यावर पेपर लावून देतो. म्हणजे, इतके यामध्ये लपविण्याचा का अट्टहास? अनेकदा शाळा, कॉलेजमध्ये व्यवस्थित सुविधा नसल्या तर मुली त्या चार दिवसांत शाळा, कॉलेज बुडवतात. खरंतर स्त्रियांच्या आयुष्यातील ही एक नैसर्गिक घटना आहे आणि अतिशय सुंदर सुद्धा. मासिक पाळी मुळे स्त्री परिपूर्ण होत असते.

Blog : 'तिचे' चार दिवस
मासिक पाळी दरम्यान ‘ती’ची ‘बीएफपी’ला पसंती

मासिक पाळी बद्दल जनजागृती करण्यासाठी, सर्वांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. सर्वात महत्वाचे यात पहिल्यांदा तर, घराघरात याबद्दल निसंकोचपणे बोलायला हवे. घरातील पुरुषांनी त्यांना विश्वासात घेऊन या बद्दल खुली चर्चा करायला हवी. जेणेकरून, स्त्रियांना सुद्धा त्या चार दिवसांमध्ये मोकळेपणाने वावरता येईल. शाळेमध्ये, कॉलेज मध्ये योग्य त्या सुविधा उपलब्ध करून त्याबद्दल जनजागृती केली पाहिजे. अनेक, सामाजिक संस्थानी याबद्दल माहिती सांगण्यास पुढाकार घेतला पाहिजे. मासिक पाळी बद्दल ज्या जुन्या चालीरीती आहेत, त्या मोडून काढल्या जाव्यात यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आजच्या काळात, जुन्या चालीरिती, परंपरा ह्या बंद व्हायला हव्यात. स्त्रियांच्या आरोग्याची काळजी, जबाबदारी जितकी स्त्री घेत नाही तितकी तिच्या घरच्यांनी घ्यायला पाहिजे. जेणेकरून तिला, या 'चार' दिवसात आपण काही गुन्हा केल्यासारखे अपराधी वाटता कामा नये. परिपूर्ण होण्याच्या काळात आपणही तिला तेवढाच आनंद द्यायला हवा, ना की निराशा. कारण, एक स्त्रीच आहे जी नवीन गोष्ट निर्माण करू शकते. निसर्गाने या गोष्टीपासून पुरुषांना वंचित ठेवले आहे. त्यामुळे, प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य आहे की, निर्मितीची जनक असणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेणे. ते 'चार' दिवस फक्त तिने न जगता पुरुषाने सुद्धा जगून पाहिले पाहिजे. मानवी आयुष्य फुलपाखरां सारखे स्वच्छंदी असते, त्यामुळे ते चार दिवस सुद्धा फुलपाखरां सारखे स्वच्छंदी उडता आले पाहिजे... हो ना!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com