
आंबेगाव बुद्रुक येथील नेमबाजपटू अभिज्ञा अशोक पाटील हिने नवी दिल्ली येथे पार पडलेल्या मास्टर्स शूटिंग चॅंपियनशीप स्पर्धेत कनिष्ठ व वरिष्ठ गटात ब्रॉंझ पदक पटकावल्यानंतर ब्राझील येथे होत असलेल्या जागतिक स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
पुणे : आंबेगाव बुद्रुक येथील नेमबाजपटू अभिज्ञा अशोक पाटील हिने नवी दिल्ली येथे पार पडलेल्या मास्टर्स शूटिंग चॅंपियनशीप स्पर्धेत कनिष्ठ व वरिष्ठ गटात ब्रॉंझ पदक पटकावल्यानंतर ब्राझील येथे होत असलेल्या जागतिक स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
अभिज्ञाने दिल्ली येथे 25 मीटर स्पोर्ट पिस्टल प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केली होती. 600 गुणांपैकी 571 गुणांचा वेध साधत पात्रता फेरीत प्रवेश केला होता. कनिष्ठ गटातील अंतिम स्पर्धा निवेदिता नायर, स्नेहा भारद्वाज, अरुणिमा गौर, इशिका सिंग, विश्वा दाहीया, देवांशी राणा या आठ खेळाडूंमध्ये झाली. यामध्ये 23 गुण मिळवून अभिज्ञाने ब्रॉंझ पदकावर आपले नाव कोरले होते. वरिष्ठ गटातही अंतिम सामन्यात उत्तम खेळ करत 22 गुणांसह ब्रॉंझ पदक पटकावले होते.
ही स्पर्धा भारतातील नामवंत निमंत्रित नेमबाजांच्या दरम्यान झाली होती. अभिज्ञाने अल्पावधीत केलेल्या उल्लेखनीय खेळाच्या जोरावर तिची ब्राझील येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली. तब्बल सत्तावीस दिवस चालणाऱ्या स्पर्धेसाठी अभिज्ञा नुकतीच ब्राझीलला रवाना झाली. तिला प्रबोधिनीचे प्राचार्य चंद्रशेखर साखरे, गगन नारंग शूटिंग फाउंडेशनचे पवन सिंग, गगन नारंग आदींचे मार्गदर्शन लाभले.