
सफाई न झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी
पुणे : भवानी पेठ येथील कै. आनंदराव बागवे कमाननजीक असलेल्या नाल्याकाठची सीमाभिंत धोकादायक आहे. या भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. शहरात गेल्या काही दिवसांत संरक्षण भिंती पडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून वेळीस पालिकेने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
पुणे : भवानी पेठ येथील कै. आनंदराव बागवे कमाननजीक असलेल्या नाल्याकाठची सीमाभिंत धोकादायक आहे. या भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. शहरात गेल्या काही दिवसांत संरक्षण भिंती पडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून वेळीस पालिकेने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
सोनावणे हॉस्पिटलसमोरील बागवे कमाननजीक नाल्याकाठी एक वसाहत आहे. या वसाहत व नाल्यामध्ये एक सीमाभिंत उभारण्यात आली आहे. सध्या भिंतीची दुरवस्था पाहता सुरक्षेच्या दृष्टीने ती धोकादायक झाली आहे. तसेच या नाल्याची सफाई झालेली नाही. नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आहे. त्यामुळे नाल्यातील प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे.
मोठ्या पावसात नाला भरून भिंतीच्या वरून, खालून पाणी झिरपत नागरिकांच्या घरात शिरते. ही भिंत झिजत असल्याने ती पडण्याची भीती नागरिकांकडून वर्तवली जात आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत धोबीघाट, शंकर शेठ रस्ता, 10 नंबर कॉलनी, कै. आनंदराव बागवे कमान, टिंबर मार्केट, घसेटी पूल, दारूवाला पूल आदी परिसरातून या नाल्याचा प्रवाह होत असतो. त्यामुळे या भागात नाल्याच्या काठावर राहत असलेल्या नागरिकांना धोका संभवतो. या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. तसेच, ड्रेनेज लाइन व चेंबरची स्वच्छता नियमित होत नसल्याने एकाच वेळी सांडपाणी व नाल्यातील पाणी थेट घरात शिरत असते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
नालेसफाई शहरातील स्वच्छता ठेकेदार व संस्थेतर्फे केली जाती. याकरिता सुमारे 15 लाखांची तरतूद मनपाकडून करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वीच या कामांना सुरवात झाली असल्याचे पालिका भासवत असली, तरी खरी परिस्थिती प्रत्यक्ष पाहिल्यावरच स्पष्ट होते. या संबंधित स्थानिक नगरसेवकांनी सीमाभिंतीकरिता मुख्य खात्याकडे पत्रव्यवहार केले आहे. मात्र, हे काम नगरसेवकांच्या अखत्यारीत येत नसल्याचे उत्तर महापालिकेने नगरसेवकांना दिले आहे. मनुष्यहानी होण्यापेक्षा तत्पूर्वी याठिकाणी प्रशासनाने ठोस पावले उचलावी व चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नालेकाठी असलेल्या महिला रहिवाशांनी केली आहे.
''नालेसफाईचे काम मे महिन्यांपासून सुरू आहे. मनुष्यबळाचा अभाव व डंपरसारखी वाहने आत जात नसल्याने नाल्याची सफाई करताना खूप कसरत करावी लागते. तरीदेखील सफाईची कामे सुरू आहेत. मात्र, नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात थर्माकोल, लाकडी भुसा, कपड्यांच्या चिंध्या टाकल्या जात आहेत. त्यामुळे नाला भरत आहे.''
- बाळासाहेब टुले, उपअभियंता, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय