हडपसर गाडीतळवरील अतिक्रमण हटेणात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 December 2018

हडपसर : फेरीवाले, विक्रेते, रिक्षाचालक, खासगी गाड्यांचा हडपसर बस स्थानकामध्ये खुला वावर आहे. त्यामुळे गाडीतळ येथील पीएमपीएल डेपो परिसरातील अतिक्रमण महापालिकेने हटवावे व प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. याबाबत सकाळ संवादमधून "सकाळ'चे वाचक पंडित हिंगे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. 

हडपसर : फेरीवाले, विक्रेते, रिक्षाचालक, खासगी गाड्यांचा हडपसर बस स्थानकामध्ये खुला वावर आहे. त्यामुळे गाडीतळ येथील पीएमपीएल डेपो परिसरातील अतिक्रमण महापालिकेने हटवावे व प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. याबाबत सकाळ संवादमधून "सकाळ'चे वाचक पंडित हिंगे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. 

याबाबत प्रवासी सविता कोरे म्हणाल्या, की स्थानकाच्या आवारात फेरीवाले, रिक्षावाले आणि अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने दिसून येतात. त्यामुळे बसमध्ये चढणे; विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना जिकिरीचे होते. फेरीवाल्यांमुळे चालकाला, बस मार्गावर नेताना अडचण येते. सार्वजनिक स्वच्छतागृहात अस्वच्छता असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे महापालिकेने आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात. 

प्रवासी संजय जाधव म्हणाले, की अवैध खासगी वाहने परिसरात थांबतात. परिणामी, चालकाला बस उभी करण्यासाठी कसरत करावी लागते. येथील बसथांब्यांभोवतीही व्यावसायिक व फेरीवाल्यांनी अतिक्रमणे केली आहेत. गर्दीमुळे पाकिटमारीच्या घटना येथे नेहमीच घडतात. चांगल्या बसथांब्यांमध्ये भिक्षेकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहावे लागते. त्यातच खासगी वाहने बस थांब्यांभोवती कोंडाळे करतात. त्यामुळे बस दूरवर उभी राहते अन् प्रवाशांना पळत जावे लागते. त्याचा ज्येष्ठ नागरिक, महिलांना त्रास होत असल्याचे चित्र आहे. या परिसरात वाहतूक पोलिस असतात, परंतु त्यांच्याकडून कारवाई होताना दिसत नाही. 

प्रवासी कविता लाड म्हणाल्या, की रिक्षाचालकांचे अतिक्रमण थांब्यांसमोरच असते. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी संपूर्ण स्थानकात कोठेही स्वतंत्र जागा नाही. कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित माहितीही मिळत नाही. महापालिकेचे अतिक्रमण विभागप्रमुख माधव जगताप म्हणाले, की बस स्थानकांभोवतालच्या अतिक्रमणांवर वेळोवेळी कारवाई होते. त्यानंतर पुन्हा अतिक्रमणे होतात.
परंतु, पुन्हा कारवाई करून अतिक्रमणे हटविली जातील. 

''अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आमच्या विभागाकडून सातत्याने कारवाई केली जाते. ती अधिक कडक करण्यात येईल.''
- शब्बीर सय्यद, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर वाहतूक विभाग. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for de-encroachment at bus station and area