कात्रज बस स्थानकात प्रवासी शेडची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 July 2019

#PmcIssue

बीआरटीच्या पुनर्विकासाच्या कामात कालबाह्य ठरलेल्या बसथांब्यांपैकी दोन बसथांबे कात्रज चौकातील मुख्य स्थानकाच्या शेजारी ठेवण्यात आले आहेत. हे थांबे सध्या विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. गंजलेले शेड, कचऱ्याचे ढीग पसरले आहेत. प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कालबाह्य बसथांबे हटवून प्रवाशांसाठी नव्याने शेड उभारून त्यात बैठकव्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पुणे : बीआरटीच्या पुनर्विकासाच्या कामात कालबाह्य ठरलेल्या बसथांब्यांपैकी दोन बसथांबे कात्रज चौकातील मुख्य स्थानकाच्या शेजारी ठेवण्यात आले आहेत. हे थांबे सध्या विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. गंजलेले शेड, कचऱ्याचे ढीग पसरले आहेत.  त्यामुळे कालबाह्य बसथांबे हटवून  नव्याने शेड उभारून त्यात बैठकव्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 
प्रायोगिक बीआरटीच्या कामात कात्रज चौकात बारा वर्षांपूर्वी फीडर रूट बस स्थानक आणि वाहनतळाची उभारणी झाली होती. कात्रज आगारातील तब्बल दोनशे बस मार्गांवर धावत होत्या. फेऱ्या पूर्ण करण्यासाठी दोनशे बस तब्बल तीन हजार वेळा या विस्तारित बस स्थानकात येऊन सुमारे तीस हजार प्रवाशांना सेवा देत असताना बस स्थानक अपुरे पडत होते. सावंत कॉर्नरला कमी पल्ल्याच्या आणि नव्या बस स्थानकात लांब पल्ल्याच्या बस स्थानकांची विभागणी झाली. पुणे महापालिकेचा जकात विभाग बंद झाला आणि जकात नाक्‍याची जागाही बस स्थानकाला मिळाली. 
येथे दोन वर्षांपूर्वी दोन शेड उभारण्यात आल्या. त्याचवेळी बीआरटीच्या पुनर्विकासात कालबाह्य ठरलेले दोन बसथांबे या स्थानकात आणून ठेवण्यात आले. त्याचा पाया भरणे आणि प्रवाशांसाठी बैठकव्यवस्था करण्याकडे दुर्लक्ष झाले. सध्या या थांब्यांचा पत्रा सडला आहे. येथे मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. रात्री मद्यपी येऊन लघुशंका करत असल्याने प्रचंड दुर्गंधीने व्यापलेल्या या बसथांब्यात उभे राहण्याऐवजी प्रवासी ऊन, पावसात उभे राहणे पसंत करत आहेत.
कालबाह्य बसथांबे हटवून प्रवाशांसाठी नव्याने शेड उभारून त्यात बैठकव्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कात्रज आगाराने दोन वेळा पत्रव्यवहार करून नवीन शेडउभारणीची मागणी केली; परंतु पीएमपी प्रशासन याकडे दोन वर्षे झाली तरी दुर्लक्ष करीत आहे. 

''महापालिका आणि पीएमपी प्रशासनातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहणीनंतर बसथांबे उभारण्याचे नियोजन होणार आहे.'' 
- विक्रम शितोळे, प्रभारी आगार प्रमुख, कात्रज

''कात्रज स्थानकात भंगारमध्ये निघालेले बसथांबे उभारून प्रवाशांची चेष्टा केली आहे. या बसथांब्यांनी तब्बल पन्नास फूट लांबीची जागा व्यापली आहे. दुर्गंधीने आम्ही तिथे थांबतच नाही. ती अडगळ दूर करून नव्याने शेड उभा करा आणि प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करा.'' 
- दिलीप जगताप, प्रवासी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for passenger shed at Katraj bus station