घासातील घास

दिलीप डाळीमकर
सोमवार, 6 मे 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune 

जवळपास १५ वर्षानंतर कॉलेजच्या माजी विद्यार्थी मेळाव्याला गेलो होतो. १५ वर्षानंतर कॉलेजचे रुपडे बदलले होते. कॉलेज परिसरात गेलो असता जुन्या आठवणी जाग्या झाल्या.चिखली पासून पाच साडेपाच किलोमीटर अंतरावर साकेगाव रोडवर आमचे कॉलेज. या रस्त्यावर सूतगिरणीला लागून एक झुणका भाकर केंद्र होते. कधीतरी आम्ही मित्रमंडळी या झुणका भाकर केंद्रावर जेवणासाठी जायचो. त्या झुणका भाकर केंद्रा शेजारी एक म्हातारी बाई बसलेली असायची. त्या कॅन्टीन शेजारी म्हातारीची कुडाची व दोन फुटक्या पत्रे टाकलेली एक झोपडी होती. अंगावर तीन चार लुगडे जोडून तयार केलेले तीन चार रंगाचे फाटके लुगडे, डोक्यावर पिकलेले केस, आजीचे वय साधारणतः ७० वर्षाच्या जवळपास असावे. चार दांडाचे दोन लुगडे, एक फाटकी चादर, जर्मनचे एक ताट, चपलेली वाटी ग्लास व पाण्यासाठी एक माठ असा आजीचा संसार.

ती म्हातारी आजी झुणका केंद्रावाल्याचे भांडे धुवून द्यायची झाडपुस करायची त्या बदल्यात तो आजीला जेवायला द्यायचा. पण दुर्दैवाने काही कारणास्तव ते झुणका भाकर केंद्र बंद पडले. आता आजीची जेवणाची आबाळ होऊ लागली.एवढं अठरा विश्व दारिद्र्य असूनही आजीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असायचं.

एक दिवस दुपारी जेवण करून येत असताना आजी मला रस्त्यात भेटली. माझ्या हातात जेवणाचा रिकामा डब्बा होता. आजीने मला थांबविले विचारले "बाळा,तुझं नाव काय?" मी माझे नाव गाव सांगितले. माझ्या जेवणाच्या डब्ब्याकडे बघून आजीने मला विचारले की, ''डब्ब्यामध्ये काही शिल्लक आहे का?'' मी क्षणभर गोंधळात पडलो अन बोललो "नाही ओ आजी" जेवण करून परत कॉलेज क्लासकडे जात असल्याने माझ्या डब्ब्यात जेवण शिल्लक नव्हते. डब्ब्यात जेवण शिल्लक नाही असे भुकेल्या आजीला सांगतांना मला वाईट वाटले. यावर आजी म्हणाली, "बाळा हरकत नाही, उद्यापासून डब्ब्यात काही शिल्लक उरले तर, टाकून दिल्यापेक्षा मला देत जा" हे सांगताना आजीचा चेहरा हसत दिसत असला तरी डोळे ओशाळलेले होते. कदाचित आजीला जेवण मागायची लाज वाटत असावी, पण दुर्दैवाने ती आजीची मजबुरी होती. उपाशी पोट हे कोणाकडेही जेवण मागायला लाजत नाही.

माझा जेवणाचा डब्बा माझ्या खेड्यागावातून मी शिकत असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी दररोज सकाळी बसने येत असे. रिकामा डब्बा परत पाठवताना "उद्यापासून तीन चार चपाती व भाजी शिल्लक पाठविणे" अशी चार ओळीची चिट्ठी आईला लिहिली. दुसऱ्या दिवसापासून आईने तीन चार चपाती भाजी शिल्लक पाठविणे चालू केले. कॉलेजच्या अंतिम वर्षाला असतांना आजीने सांगितल्यापासून शेवटचे चार महिने दुपारचा जेवणाच्या सुट्टीत आजीला तीन चपाती भाजी द्यायचो. आजी त्यातल्या दोन अडीच चपाती खायची व उरलेल्या अर्धी चपातीचे बारीक बारीक तुकडे करून चिमण्याला खाऊ घालायची व वाटीत पाणी ठेवायची.

त्या दिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग अनुभवयला मिळाला. माझी आई माझ्यासाठी जेवणाचा डब्बा पाठविला. माझ्या डब्यातील काही घास मी आजीला दिले होते. आजीने तिच्या घासातील घास त्या चिमण्याला दिले. त्या चिमण्यांनी पण आजीने दिलेल्या घासातील काही भाग त्यांच्या पिलाला दिले. कदाचित हेच जीवन होतं. अंतिम वर्षाला असतांना शेवटचे तीन चार महिने हे असंच चालू राहिले. 

फार्मसीचा अंतिम वर्षाचा निकाल लागला, चांगल्या गुणांनी डिग्रीकोर्से उत्तीर्ण झालो. पेढे घेऊन त्या आजीकडे गेलो. ती आजी तिथे नव्हती. शेजारच्या चहाच्या टपरीवाल्याकडे चौकशी केली. त्याने मला सांगितले की आजी दोन महिन्यांपूर्वी वारल्या. हे ऐकून वाईट वाटले. मन सुन्न झाले. जणु काही जवळचं कोणी गेलं असं वाटले.

आजीच्या झोपडीजवळ आजीची वाटी दिसली. त्या वाटीत पेढा ठेवला व तिथून परत निघालो. चालता चालता सहज मागे वळून पाहिले तर एक चिमणी त्या पेढयावर चोच मारत होते. मनात आले की मी आजीला पेढा दिला अन् आजीने तिच्या घासातील घास त्या चिमणीला दिला व ती चिमणी तोच घास आता खात आहे. मनात आले मरणानंतही जणु आजीने घासातील घास दुसऱ्याला देणे सोडले नाही मग जिवंतपणी आपण का सोडावे? आपणही आपल्या घासातील घास उपाशी व्यक्तीला देणे चालू ठेवावे.
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune 

 

Web Title: Dilip Dalimkar Write about Sharing Food