दिव्यांग विद्यार्थी  शिक्षणापासून अद्याप वंचितच 

-----------  संदीप जगदाळे, हडपसर  ----------------- 
Tuesday, 3 December 2019

जागतिक दिव्यांग दिन 3 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. शासनाच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध योजना राबविल्या जातात त्याविषयी. 
 

जागतिक दिव्यांग दिन 3 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. शासनाच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध योजना राबविल्या जातात त्याविषयी. 

देशात 17 एप्रिल 2017 पासून दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 अमलात आलेला आहे. सरकारने दिव्यांगांच्या सर्वसमावेशक शिक्षणाचा प्रसार करणे व सुविधा देण्यासाठी विशेष उपाययोजना करणे अपेक्षित आहे. सध्या दिव्यांगकल्याण आयुक्तालयाकडून शालांतपूर्व, शालांतोत्तर, बीजभांडवल, अपंगांना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे, व्यवसायासाठी अर्थसाह्य, मार्गदर्शन व सल्ला केंद्रे आदी योजना राबविल्या जातात. दिव्यांगांच्या शैक्षणिक संस्था प्रामुख्याने शहरी भागात केंद्रित झाल्या आहेत. त्यामुळे अपंगांना शहरांमध्ये जाऊन शिक्षण घ्यावे लागते. परिणामी, शहरी भागात त्यांच्यासाठी वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. मात्र, सध्या अपंगांसाठीचे एकही वसतिगृह कार्यान्वित नाही. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तीन टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. मात्र, विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता त्या जागा पुरेशा नाहीत. 

दिव्यांग प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात एकही स्वतंत्र वसतिगृह नाही. त्यामुळे दहावीनंतर अनेक विद्यार्थ्यांची शिक्षणात गळती होते. त्यामुळे गुणवत्ता असून अनेक विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणापासून गळती होते. त्यामुळे विद्यार्थी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहतात. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या दिव्यांगकल्याण आयुक्तालयाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दिव्यांगासाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्याची मागणी होत आहे. 

दिव्यांगकल्याण आयुक्तालयामार्फतच केवळ 1 ली ते 10 वीपर्यंत शालेय शिक्षण व व्यावसायिक शिक्षणासाठीच निवासी विशेष शाळा व कर्मशाळा कार्यरत आहेत. राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत दहावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह व शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक साह्य केले जाते. याच धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र योजना सुरू करण्याचा प्रस्ताव दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या सचिवांना पाठविला आहे. या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे अनेक दिव्यांग व्यक्ती शिक्षणापासून अद्याप वंचितच आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disability student still deprived of education