आता ठरवा, तुम्ही कोणत्या बाजूला आहात!

डॉ. मेघा पानसरे
Tuesday, 20 February 2018

कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज (ता. २0) तिसरा स्मृतिदिन. तीन वर्षे उलटल्यानंतरही त्यांच्या हत्येच्या अनुषंगाने अनेक प्रश्‍न आजही अनुत्तरित आहेत...

कॉम्रेड पानसरेंच्या हत्येनंतर तीन वर्षे उलटली. अजूनही ती सकाळ, हिंसेचा प्रत्यक्ष थरार जसाच्या तसा आठवतो. घरासमोरच रस्त्याकडेला हात जमिनीवर टेकून बसलेल्या, प्रचंड वेदना आणि रक्तस्राव होत असूनही काही सांगू पाहणाऱ्या कॉम्रेड पानसरे यांना मी आणि मुलांनी आक्रंदत जवळ घेतले तेव्हाचा त्यांच्या हाताचा उष्ण स्पर्श अजूनही जाणवतो. त्यानंतर सुरू झालेली कटू अनुभवांची मालिकाही अजून संपलेली नाही.

खुन्यांना शिक्षा मिळावी यासाठी लोकशाही व्यवस्थेत न्यायालयीन स्तरावर शक्‍य ते सर्व प्रयत्न करणे ही योग्यच बाब आहे; पण त्याला न्याय म्हणता येईल का, आणि तो खरेच मिळणार का, असे अनेक प्रश्‍न अजूनही अनुत्तरित आहेत; पण गेल्या तीन वर्षांत कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच्या हिंसेच्या अनुभवापासून एका व्यापक, सामूहिक वैचारिक व राजकीय लढाईच्या दिशेने झालेला प्रवास विनातक्रार स्वीकारणे आज विवेकी ठरते. 

विवेकवाद्यांच्या हत्यांचा निषेध आणि न्यायासाठी आंदोलने अजून थांबलेली नाहीत. देशभरात सतत कुठे ना कुठे विविध स्तरांवर, विविध मंचांवर या हत्या आणि विवेकवादावरील संकट यावर गांभीर्याने बोलले जात आहे. लोकशाही मूल्यांची जपणूक करू इच्छिणारे लोक एकत्र येत आहेत. असं म्हणतात, की साहित्यिक, बुद्धिजीवींना समाजात चाललेल्या खळबळीचा वेध घेता येतो. भविष्यातील संकटे आणि संभाव्य उद्रेकाचा अंदाज येतो. म्हणूनच प्रा. कलबुर्गींच्या हत्येनंतर ते जाहीरपणे आपली अस्वस्थता, उद्वेग व्यक्त करू लागले. पुरस्कार वापसीचे उत्स्फूर्त आंदोलन हा देशातील असहमतीच्या भावनेचा प्रकट आविष्कार होता. अलीकडे नॉट इन माय नेमसारखी आंदोलनेही झाली. ही एक सामाजिक-राजकीय प्रक्रिया आहे. ती नक्कीच विकसित होत राहील. गतिमान होत अखेरीस आर या पार संघर्षापर्यंत जाऊन धडकेल.  

गेल्या काही वर्षांत धर्मांधतेच्या विरोधातील, सांस्कृतिक विविधता आणि बहुलतावादाचा पुरस्कार करणारे पत्रकार, साहित्यिक, कवी, वैज्ञानिक यांना धमक्‍या, हल्ले आणि हत्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. संघ परिवार आणि भाजपचे पदाधिकारी, मंत्री जाहीरपणे संविधानविरोधी वक्तव्ये करत आहेत. विशेष म्हणजे आता हे सारे राष्ट्रवादाच्या नावाखाली केले जात आहे. एका बाजूला मानववंशशास्त्रज्ञ हे ठामपणे सांगताहेत, की आज जगातील कोणताही वंश स्वत:ला विशुद्ध मानू शकत नाही, तर दुसऱ्या बाजूला शुद्ध हिंदुत्वाचा नारा हे एक राजकीय अस्त्र बनले आहे. 

दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी आणि गौरी यांच्यावरील हल्ला हा आता केवळ सत्ताधारी शासनाच्या विचारप्रणालीला विरोध करण्याचे साहस करणाऱ्यांच्या हत्यांचा प्रश्‍न राहिला नाही. ते ज्यांचे रक्षण करू पाहत होते, ती संविधानिक मूल्ये, धर्मनिरपेक्ष विचारप्रणाली आणि लोकशाही रचना यावर हा हल्ला आहे. या देशाला हिंदू धर्माधारित राष्ट्र बनवण्याच्या संघ परिवाराच्या राजकीय उद्दिष्टाविरुद्ध ते उभे होते. लोकांना विचार करायला, प्रश्‍न विचारायला आणि स्वत:ची असहमती व्यक्त करायला ते प्रोत्साहन देत होते. त्यामुळे त्यांच्या हत्या हे सरळसरळ राजकीय खून आहेत, अशी भूमिका आता सर्व विवेकी, हिंसेला विरोध करणाऱ्या लोकांनी घेतली पाहिजे.  सुप्रसिद्ध हिंदी कवी सर्वेश्‍वरदयाल सक्‍सेना यांची कविता "देश काग़ज़ पर बना नक्‍शा नहीं होता...'मधील काही पंक्ती आजच्या अस्वस्थ, हिंसात्मक वर्तमानात जगणाऱ्या सर्वच संवेदनशील माणसांसाठी एक महत्त्वाचा प्रश्‍न उपस्थित करतात. 

यदि तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो 
तो क्‍या तुम दुसरे कमरे में सो सकते हो ? 
यदी तुम्हारे घर के एक कमरे में लाशें सड़ रहीं हों 
तो क्‍या तुम दुसरे कमरे में प्रार्थना कर सकते हो ? 

आपल्यासमोरही आज हाच प्रश्‍न आहे. विद्वेष आणि हिंसेचा गंध भरलेल्या भवतालात आपण शांतपणे श्‍वास 
घेऊ शकतो? व्यक्ती म्हणून सुखाने जगू शकतो? हिंसा की मानवता, विद्वेष की प्रेम आणि करुणा, अंधश्रद्धा 
की विवेक? आपल्या पुढच्या पिढीला आपण बहुरंगी सांस्कृतिक जीवन देणार आहोत की एकरंगी जगणं? यात निवड करायलाच हवी. 

कवी बल्ली सिंह िचमा यांच्या शैलीत विचारायचे तर, 
तय करो किस ओर हो तुम, तय करो किस ओर हो । 
आदमी के पक्ष में हो, या कि आदमखोर हो ।।... 
इससे पहले युद्ध शुरू हो, तय करो किस ओर हो । 
तय करो किस ओर हो तुम, तय करो किस ओर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Megha Pansare article