सार्वजनिक कार्यालये, स्वच्छतागृहे सुरक्षित कशी होतील?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

वैद्यकीय निदान केंद्रातील एका तंत्रज्ञाकडून महिलांच्या चित्रीकरणाचा प्रकार सोमवारी निदर्शनास आला.  आधुनिक तंत्रज्ञानाच्या गैरवापराचे आणखी एक प्रकरण यानिमित्ताने पुढे आले आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षितता हा विषयही ऐरणीवर आला आहे. या प्रकारात संबंधित डॉक्‍टरांची वैयक्तिक काही चूक नाही असे सकृतदर्शनी दिसते. महिला स्वच्छतागृहांची सुरक्षितता आणि स्वच्छता हा विषयही तितकाच महत्त्वाचा आहे. याबाबत दक्षतेबाबतचे अभ्यासाचे आणि अनुभवाचे चार बोल.

कार्यालय प्रमुखांसाठी पथ्ये - 
महिलांच्या सुरक्षिततेबाबत सार्वजनिक आस्थापनांच्या प्रमुखांनी दक्ष राहून काही पथ्ये पाळली पाहिजेत. त्यातले पहिले काम म्हणजे कार्यालय ‘सीसीटीव्ही’च्या कक्षेत आणले पाहिजे. त्याचा नकळतपणे कार्यालयीन वर्तन व्यवहारावर, सुरक्षिततेवर चांगला परिणाम होतो. जिथे महिलांच्या खासगीपणाच्या जागा आहेत. उदाहरणार्थ चेंजिंग रुम्स, स्वच्छतागृहे येथे कपाटे, पसारा, भिंतीला खाचा असणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे. तिथला बंदिस्तपणा, स्वच्छता, रंगरंगोटीकडे नित्य लक्ष दिले पाहिजे. कालच्या प्रकारात चेंजिंग रूममधील कपाट पसाऱ्याचा आधार विकृत कर्मचाऱ्यांकडून घेतला गेला. चेंजिंग रुम्ससारख्या जागांमध्ये कुणालाच मोबाईल-कॅमेऱ्यांसारखी साधने घेऊन जाता येणार नाहीत असे कठोर वाटले तरी नियम केले पाहिजेत. अशा जागांचे नियंत्रण महिला कर्मचाऱ्यांच्या हाती सोपवणे अधिक इष्ट. अर्थात कर्मचाऱ्यांची योग्य निवड आणि शिवाय त्यानंतरही आस्थापनातील कर्मचाऱ्यांचे समुपदेशन खूप महत्त्वाचा भाग नियमित वेळेत व्हावा. त्यांच्यासाठी समुपदेशनाचे वर्ग घेतले जावेत.

- विनायक राजाध्यक्ष, (सायबर गुन्हेगारी क्षेत्रातील तज्ज्ञ)

मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या 
विकृतीला तंत्रज्ञानाची गती मिळाल्याने होत असलेले गुन्हे चिंतेचा विषय झाला आहे. स्मार्ट फोनसारख्या हत्यारांचा गुन्हेगारी वापर सर्वच लोक करीत नाहीत. जे करतात त्यांच्यात तशी विकृती आहे. दोष त्या साधनात नसून ते वापरणाऱ्या मेंदूत आहे. मुळात कार्यालयीन वेळेत होत असलेला स्मार्ट फोनचा अनावश्‍यक वापर, सरकारी कार्यालयांमध्ये संगणकावर सोशल माध्यमांमध्ये हरवलेले कर्मचारी ही सारी मानसिक विकृतीचीच लक्षणे आहेत. प्रगत देशांमध्ये अशा वापरांवर बंधणे असतात. सुटीच्या वेळेतच मोबाईल वापरता येतो. आपल्याकडे तशी कार्यसंस्कृती घडवणे कल्पनेच्या पलीकडे आहे. आज तंत्रज्ञानातील सुलभता, सहजता विचारात घेता त्याचे गंभीर दोषही लक्षात घेतले पाहिजेत. अगदी आरशातही कॅमेरे बसवले जाऊ शकतात. दूरवरच्या खिडकीतूनही मुलींच्या वसतिगृहाचे शूटिंग करणारी मुले आहेत. कुठे कुठे लक्ष ठेवणार तुम्ही? महिलांचा सार्वजनिक वावर कधी नव्हे इतका असुरक्षित झाला आहे. गुन्हा घडतोय हे वरिष्ठांच्या लक्षातही येणार नाही इतके हे सहज शक्‍य झालेय. त्यामुळे विकृतीवरच मानसिक उपचारांची गरज आहे. मानसिक आरोग्यासाठी महाविद्यालय - कार्यालयीन स्तरावर समुपदेशन वर्गांची मोठी गरज आहे.

- उज्ज्वला परांजपे,
(आकार फाऊंडेशन, मानसिक आरोग्य
क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संस्था) 

महिला स्वच्छतागृहांबाबत धडा घ्यावा
काही स्वयंसेवी संस्थांनी न्यायालयात धाव घेऊन महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा आग्रह धरला. न्यायालयाच्या आदेशाने राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी ती उभारली. आपल्याकडेही ती उभारली. मात्र ती उभारताना महिलांच्या सुरक्षिततेचा कोणताही विचार केलेला नाही. बहुतेक स्वच्छतागृहे रस्त्याच्या कडेला उभी केली आहेत. ती शासकीय कार्यालयांच्या आवारात हवी होती. तेथील कार्यालय प्रमुखांवर तिथल्या स्वच्छतेची तसेच सुरक्षिततेची जबाबदारी निश्‍चित करायला हवी होती. यासाठी जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी एकत्रितपणे निर्णय करणे गरजेचे होते. कोणतीही महिला या स्वच्छतागृहांचा वापर करण्यास धजावणार नाही. आयुक्तांनी प्रशासनप्रमुख म्हणून या सर्व स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेची तसेच सुरक्षितेतेची नियमित दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी. अन्यथा लाखो रुपये खर्च केलेली स्वच्छतागृहे येत्या काही महिन्यांत कचरा कोंडाळी झालेली दिसतील. एखाद्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये असा प्रकार घडू शकतो तेव्हा कोणतेही नियंत्रण नसलेल्या स्वच्छतागृहात असे प्रकार सहज शक्‍य आहेत. पालिका प्रशासनाने योग्य तो धडा घ्यावा.
- राणी यादव,
जिल्हा सुधार समितीच्या कार्यकर्त्या

सुरक्षितता प्राधान्यक्रमावर हवी
महिलांच्या स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि सुरक्षितता याकडे होत असलेले दुर्लक्ष गंभीर आहे. त्यातून घराबाहेर पडणाऱ्या महिलांना होणारे शारीरिक  त्रास खूप मोठे आहेत. त्याची जाणीवच पुरुषप्रधान समाजात दिसून येत नाही. कोट्यवधी रुपयांच्या हॉस्पिटल्स, महाविद्यालयांच्या इमारतींमधील स्वच्छतागृहांची अवस्था शरम वाटावी अशी असते. मी मात्र अभिमानाने सांगू इच्छितो की माझ्या क्‍लासमध्ये कधीही या आणि स्वच्छतागृहाची स्वच्छता पाहा. गेल्या दहा वर्षांपासून आमच्या महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांत सॅनिटरी पॅडस्‌ची सोय मोफत करून दिली जाते. मुलींकडून त्याचा होत असलेला योग्य वापर, वापरानंतर घेतली जाणारी स्वच्छतेबाबतची दक्षता या साऱ्याच गोष्टी मनाला समाधान देणाऱ्या आहेत. दहा वर्षांपूर्वी एकदा स्वच्छतागृहाची पाईप्सची कोंडी झाल्याने या उणिवेची जाणीव झाली. तेव्हापासून आमच्या क्‍लासमध्ये ही सुविधा आहे. चांगली गोष्ट अशी की सार्वजनिक स्तरावर आता अशा सुविधांची गरज पटू लागली आहे. क्‍लासच्या आवारात अनोळखी व्यक्तींच्या वावराकडे लक्ष दिले पाहिजे. चेंजिंग रुम्स किंवा स्वच्छतागृहांच्या जागांबाबत कार्यालयीन प्रमुखाने जातीने दक्ष राहिले पाहिजे. आपल्या कार्यालय परिसरात महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करणे याला प्राधान्यक्रम हवा. 
- प्रा. नारायण उंटवाले,
खासगी क्‍लासचालक

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Esakal Citizen Journalism issue of security of women in public places