बालेवाडीतील नाल्याचे  अस्तित्व संपुष्टात 

- शीतल बर्गे 
Friday, 2 August 2019

पुणे ः मुंबई-बंगळूर महामार्गाकडून बालेवाडीकडे जाताना पीएमपीच्या बस आगाराजवळून पूर्वी खळखळत वाहणारा नाला पुढे मिटकॉनच्या सीमाभिंतीजवळ निघतो, परंतु पुढे पाणी जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने त्याचे अस्तित्वच तेथेच संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी पाण्याचे डबकेच तयार झाले असून, त्यात इतर ठिकाणचा कचरा येऊन साचला आहे. हा कचरा कुजून सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना नाल्याच्या मार्गात बाधा आणऱ्यांचा शोध घ्यावा, तसेच आवश्‍यक त्या उपाययोजनांची प्रशासनाने अंमलबजावणी करावी, अशी पर्यावरण प्रेमींसह, सजग नागरिकांनी मागणी केली आहे. 

पीएमपी बस आगाराजवळून वाहणारा हा नाला म्हाळुंगे, श्री शिवछत्रपती स्टेडियममार्गे तसेच महामार्गाखालून पाइपद्वारे पुढे वाहत जाऊन मिटकॉनच्या सीमाभिंतीजवळ येतो, येथे त्याच्या अस्तित्वाचा प्रश्‍नच उभा राहत आहे. येथे अनेक लहान-मोठी झाडेही वाढली आहेत. सध्या पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्यात अजूनच वाढ झाली आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर हे पाणी मुख्य रस्त्यावरून वाहील. सध्या बालेवाडीतील ईरा बेकरीजवळ रस्ता जसा जलमय झाला आहे, तशीच परिस्थिती येथे निर्माण होऊ शकते. 

येथे जवळच मिटकॉनचे मॅनेजमेंट महाविद्यालय तसेच शाळाही आहे. त्यामुळे येथे विद्यार्थी व पालकांची नेहमीच गर्दी असते. तसेच हा रस्ता बालेवाडी व महामार्गाला जोडणारा असल्याने येथे भरपूर रहदारी असते. सकाळी व सायंकाळी फिरायला बाहेर पडणारे नागरिकही या दुर्गंधीमुळे हैराण झाले आहेत. खरे तर स्मार्ट सिटीअंतर्गत रस्ता रुंदीकरणाचे नुकतेच काम केले गेले, तेव्हा ही गोष्ट लक्षात यायला हवी होती. तरी प्रशासनाने या ठिकाणी लक्ष घालून हे साचलेले पाणी पुढे कसे काढून देता येईल, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. 

दंड कोणाकडून वसूल करायचा? 
येथे साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे. सोसायटी किंवा खासगी प्लॉटमध्ये जर असे पाणी साठलेले आढळल्यास महापालिका संबंधितांकडून दंड आकारते, पण या ठिकाणी दंड कोणाकडून, किती व कसा वसूल करायचा व तो कोण वसूल करणार, हा प्रश्‍न नागरिकांना सतावत आहे. 

""पूर्वी येथे उतार असल्याने नैसर्गिकरीत्या हे पाणी वाहून जात होते, पण आता तशी जागा उपलब्ध नसल्याने हे पाणी साठून राहते. जवळच एक बांधकाम सुरू आहे, या बांधकाम व्यावसायिकाशी बोलणे झाले असून, हे पाणी पाइपद्वारे पुढे काढून देण्यासाठी त्यांच्या जमिनीची हद्द वापरण्यास त्यांनी परवानगी दिली आहे, पण यासाठीचा खर्च स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. याला दुसरा पर्याय म्हणजे रस्त्याच्या बाजूला जे पावसाळी गटार बांधण्यात येईल, त्यामध्ये हे पाणी सोडण्यात यावे.'' - अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, पुणे महापालिका 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The existence of a drain in Balewadi ends