मार्केटयार्डातील हमालही आता करणार नाहीत काम 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 July 2019

हमाल पंचयातीचा इशारा; सात दिवसांत काम देण्याची मागणी 
पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार विभागातील व्यापारी तोलणाऱ्यांना काम देत नसल्याने गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची उपासमार सुरू आहे. याबाबत बाजार समितीचे दुर्लक्ष झाले असून, पणन मंत्र्यांकडूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पुढील सात दिवसांत तोलणाऱ्यांना काम न मिळाल्यास हमालही काम करणार नसल्याचा इशारा हमाल पंचयातीने दिला आहे. 

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार विभागातील व्यापारी तोलणाऱ्यांना काम देत नसल्याने गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची उपासमार सुरू आहे. याबाबत बाजार समितीचे दुर्लक्ष झाले असून, पणन मंत्र्यांकडूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पुढील सात दिवसांत तोलणाऱ्यांना काम न मिळाल्यास हमालही काम करणार नसल्याचा इशारा हमाल पंचयातीने दिला आहे. 
बाजार समितीकडून कोणताही लेखी आदेश दिला नसताना 1 फेब्रुवारीपासून तत्कालीन पणन संचालक सुभाष माने यांच्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स काटे ज्या दुकानात आहेत तेथे तोलाई कपात करू नये या परिपत्रकाची दि पूना मर्चंट्‌स चेंबरद्वारे थेट अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासून तोलणारांची उपासमारी सुरू आहे. त्यावर बाजार समितीने तोलणाऱ्यांना कामावर रुजू करण्याचे आदेश देऊन काही आडत्यांना परावाना निलंबनाची नोटीस बजावली. मात्र, त्यापुढे बाजार समितीने कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान आता हमाल पंचायतनेही त्यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेऊन जो व्यापारी तोलणाऱ्यांना काम करू देणार नाही, त्याच्या दुकानावर काम न करण्याची भूमिका घेतल्याचे हमाल पंचायतचे अध्यक्ष, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 
भुसार बाजारातील परवानाधारक तोलणाऱ्यांना अद्यापही अडत व्यापारी काम करू देत नाहीत. पणनमंत्री प्रा. राम शिंदे यांनीदेखील याप्रश्नी अभ्यास करून निर्णय घेण्याचे सांगितले होते. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या परिस्थितीत तोलणाऱ्यांनी उपासमार व उपेक्षा किती काळ सहन करावी? आम्ही केलेल्या आर्थिक मदतीची व रोजगाराच्या मागणीबाबतही आपण कायद्यात नाही म्हणून वासलात लावली. हा प्रकार संतापजनक आहे. तोलणाऱ्यांची सहनशीलता संपलेली आहे. काहींनी आत्महत्या करण्याचा इशारा संघटनेकडे दिला आहे. त्यामुळे तोलणाऱ्यांच्या मरणाची वाट न पाहता पुढील सात दिवसांत जो व्यापारी तोलणाऱ्यास काम देईल, त्याचे काम सुरू ठेवण्याचा निर्णय हमाल पंचायतला नाईलाजाने घ्यावा लागला आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी बाजार समिती प्रशासनावर असेल, असा इशाराही आढाव यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hamal panchayat demanded for hire worker