वळू नका, रणी चळू नका..!

जितेंद्र शिंदे
बुधवार, 17 जानेवारी 2018

मातृभाषेच्या अस्मितेसाठी आपले सर्वोच्च योगदान दिलेल्या हुतात्म्यांना दरवर्षी अभिवादन करण्यात येते. कधीतरी आपण महाराष्ट्रात समाविष्ट होऊ, या भावनेने आजही मराठी जनता रस्त्यावर उतरत असते. रस्त्यावरची लढाई ही नित्याचीच पण आता न्यायालयीन लढाईही अखेरच्या टप्प्यात आहे.

मातृभाषेच्या अस्मितेसाठी आपले सर्वोच्च योगदान दिलेल्या हुतात्म्यांना दरवर्षी अभिवादन करण्यात येते. कधीतरी आपण महाराष्ट्रात समाविष्ट होऊ, या भावनेने आजही मराठी जनता रस्त्यावर उतरत असते. रस्त्यावरची लढाई ही नित्याचीच पण आता न्यायालयीन लढाईही अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजात वर्चस्व दाखविण्याबरोबरच लोकेच्छा व्यक्‍त करण्याची जी काही साधने, प्रमाण आहेत त्या प्रत्येक ठिकाणी अस्मितेशी बांधील राहून अखेरच्या टप्प्यात मराठी लढणाराच खरा वीर ठरणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर काही प्रलोभनांच्या नादी लागून इतरांशी संधान साधणाऱ्यांनीही अजून वेळ गेली नाही, याचे भान राखावे लागणार आहे.

अन्याय, अत्याचार मुकाट्याने सहन न करता त्याला दोन हात करत, पोलिसी बळाला तितक्‍याच जोमाने आव्हान देत सीमाभागातील अनेकांनी महाराष्ट्रात जाण्याची आस ठेवली. या कार्यात अनेकांना हौतात्म्य आले. पण, हा सर्वोच्च त्याग जितका रोमांचक आहे, तितकाच तो प्रेरणादायीही. त्यामुळे सीमाभागातील चार पिढ्या लढ्यात झोकून देऊन कार्यरत आहेत. अनेकांची हयात गेली, या लढ्यात. त्यामुळेच देशात गांधी मार्गाने सर्वाधिक काळ चाललेला लढा म्हणून सीमालढ्याकडे पाहिले जाते. असे असले तरी पंधरा वर्षांपासून या लढ्याला आपल्याच लोकांची दृष्ट लागल्याचे प्रकर्षाने जाणवते.

निवडणुका या कोणाला आमदार करण्याचे माध्यम नाही. पण, या माध्यमातून लोकेच्छा प्रकट करण्याचे प्रभावी साधन आहे. त्यामुळे सीमाभागातील आमदारकी ही सत्ता मिळविण्याचे साधन नसून तो एक लढ्याचा भाग आहे. पण, आपल्याच काहीजणांना ते वारंवार खूपत आले आहे. त्यातूनच दुहीची बिजे पेरली गेली आणि संघटनेत यादवी पेरण्याचे काम रितसर झाले. आपल्या वर्चस्वाला कोणीही धक्‍का पोहोचवू नये, असे वाटणाऱ्यांविरोधात जनता उभी राहिली. पण काहींचे उपद्रवमूल्य कमी झालेले नाही. हाच धोका आगामी काळातही मराठी भाषिकांना आहे.

फोडा आणि राज्य करा, या इंग्रजांच्या नीतीप्रमाणे कर्नाटकी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी मराठी जनतेला सीमालढ्यापासून दूर नेण्याचे काम सुरू ठेवले आहे. काही प्रमाणात त्यांना यश आले आहे. मराठी भाषिकांची अनेक सत्ताकेंद्रे त्यांच्या हातातून काढून घेण्यात आली आहेत. पैसा, पदांच्या प्रलोभनाने मराठी जनतेला फितुरीची कीड लावण्यात त्यांना यश आले आहे. पण बहुतेक लोकांच्या मनात आजही सीमालढ्याबाबत आस्था आहे.

सीमालढा गांधी मार्गाने चालला असला तरी, याचा इतिहास रक्‍तरंजित आहे. आठ वर्षाच्या मुलीपासून पन्नास वर्षाच्या माणसापर्यंत अनेकांनी हौतात्म्य पत्करले आहे. आपल्या देहाची समिधा टाकून हा लढा तेवत ठेवण्याचे काम हुतात्म्यांनी केले आहे. एकीकडे लोकांत मिसळून अनेकजण रस्त्यावरची लढाई लढत आहेत. त्यांना प्रशासकीय पातळीवर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शिवाय आपल्याच लोकांकडूनही अवहेलना सोसावी लागते. दुसरीकडे न्यायालयाच्या कामकाजातही कोठे कमतरता येऊ नये, यासाठी डोळ्यात तेल घालून राबावे लागते. लढा न्यायालयात जाऊन चौदा वर्षे पूर्ण होत आली आहेत. अशा काळात हा लढा अंतिम वळणावर येऊन ठेपला असून मराठी जनतेला न्याय मिळणार, अशी आस लागून आहे. त्यामुळे ऐन रणाच्या काळात दुही माजविणाऱ्यांपासून, लोकांचा बुद्धिभेद करणाऱ्यांपासून आणि प्रलोभने दाखविणाऱ्यांपासून चार हात लांब राहून लढा यशस्वी करावा लागणार आहे. तरच हुतात्म्यांचा सर्वोच्च त्यागाला न्याय 
मिळणार आहे.

ज्येष्ठांचा वचक, युवकांची धमक
कोणताही लढा युवकांच्या सहभागाविना यशस्वी होत नाही. त्यामुळे मराठी युवकांना फितविण्याचे काम सुरू आहे. त्यातून लढ्याला बाधा पोचू शकते. त्यामुळे या लढ्यात लाठ्या, काठ्या खाल्लेल्या, तुरुंगवास भोगलेल्या ज्येष्ठांनी आपला वचक ठेवून युवकांना पुन्हा लढ्यात ओढून आणावे लागणार आहे. ज्येष्ठांचा वचक आणि युवकांची धमक मिळाल्यास मराठी जनतेला सर्वच बाबतीत यश मिळू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jitendra Shinde article