
पूर्वी शिवाजी महाराज, संभाजी महाराज आमच्या विचारात होते. आता ते आमच्या धमन्यातून वाहू लागले आणि आमच्या जन्माचे सार्थक झाल्याचा आनंद झाला आणि मन सतत विचार करू लागले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मी कोण असेन?
माझा जन्म सातारा जिल्ह्यातील. औंध संस्थान हे माझे माहेर. वडील राजमहालातील दरबार गवई म्हणून होते. वडिलांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतीव प्रेम, स्वाभिमान. ते शिवभक्तच होते. कवी भूषण यांचे ब्रज भाषेतील संपूर्ण काव्य त्यांना पाठ होते. घरात आम्हा मुलांना ते छत्रपती शिवाजी महाराजांच्याच कथा सांगत. त्यांचा पराक्रम, त्यांची युद्धनीती, रयतेवरील प्रेम, स्त्रियांबद्दल वाटणारा आदर, शेतकऱ्यांची काळजी असे एक ना अनेक विषयावर ते सतत बोलत. आम्ही तेव्हा फार लहान होतो. बऱ्याच गोष्टी आम्हाला कळतपण नव्हत्या. पण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या कुटुंबाचे दैवतच होते.
काळ पुढे सरकत गेला. आम्ही मोठे होत गेलो. शाळा, कॉलेज, उच्च शिक्षण, नोकऱ्या आमचं विश्व विस्तारलं, पण आम्हा सर्वांना लहानपणापासून वाचनाचं खूप वेड. त्यामुळे पुनःपुन्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज वाचतच गेलो. छत्रपती संभाजी महाराजांवरील सत्य लिखाण लोकांपुढे येऊ लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे मृत्यूचे गूढ लोकांना माहीत होऊ लागले. त्यामुळे पूर्वी शिवाजी महाराज, संभाजी महाराज आमच्या विचारात होते. आता ते आमच्या धमन्यातून वाहू लागले आणि आमच्या जन्माचे सार्थक झाल्याचा आनंद झाला आणि मन सतत विचार करू लागले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मी कोण असेन? त्यांच्या अश्वशाळेतील एखादा घोडा, त्यांचा एखादा मावळा, त्यांच्या मुदपाकखान्यातील एखादी सेविका, जिजाऊ राजमातेची दासी, रायगडाचा एखादा कडा, दगड, वृक्ष, गवत, वेली, फूल, पशू, पक्षी, किडा, मुंगी कोणीतरी असनेच. म्हणूनच मी याच मातीत पुन्हा जन्मले. ज्या ज्या मार्गांनी राजांनी घोडदौड केली त्या वाटेवरील मी एखादा वृक्ष तरी नसेल ना, ज्याला राजांचा स्पर्श झाला असेल.
एखादा झुळझुळ वाहणारा ओढा तर नसेल ना? नाहीतर त्यांच्या पायांचा स्पर्श झालेला एखादा मातीचा कण तर नसेल ना? आज मन राजांच्या भोवती भिरभिरतंय. त्यांचे अस्तित्व माझ्या भोवती असल्याचा भास होतोय. त्यांचे व्यक्तिमत्त्व शब्दात मावण्याएवढे ते लहान कधीच नव्हते. आता तर सगळ्या जगाला त्यांचे महत्त्व कळले आहे. सारं जग त्यांच्या चरित्राचा अभ्यास करीत आहे. असा हा जिजाऊंचा विश्वविजेता बाळ, असा हा जिजाऊचा पृथ्वीराज. म्हणूनच याला माझा पुन्हा पुन्हा साष्टांग दंडवत आणि म्हणूनच आई जगदंबे तुझ्या पुढे पदर पसरून हे मागणे मागत आहे की, "जगदंबे या पृथ्वीचे अस्तित्व असेपर्यंत आणि जन्ममरणाचे चक्र चालू असेपर्यंत या महाराष्ट्राच्याच गर्भात मला जन्म मिळू दे.'