वीजेचा लपंडाव

शिवराम गोपाळ वैद्य
Tuesday, 6 November 2018

तुम्हीही लिहिते व्हा.. डाऊनलोड करा 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन आणि पाठवा तुमच्या भागातील बातम्या पाठवा 'सकाळ'कडे..!

गेली काही वर्षे अवघ्या महाराष्ट्रातच वीजेचा जो खेळखंडोबा सुरू आहे, त्याला खरे तर वीजेचा लपंडाव म्हणणे म्हणजे, लपंडाव या खेळाचाच अपमान आहे. लपंडावामध्ये खेळाडू कुठेही लपला तरी त्याला शोधून काढता येते. मात्र वीज एकदा गुप्त झाली की ती कधी प्रकट होईल हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही, अशी स्थिती आहे.

एकही दिवस वीज गेली नाही असा एकही दिवस गेला नाही. रोजच्या रोज नियमितपणे घडणारी एकच एक गोष्ट म्हणजे वीज जाणे. परीक्षेचा काळ असो, सणासुदीचा काळ असो की शेतीची कामे असोत, लघुउद्योग असोत, लहान दुकाने असोत की दवाखाने असोत की, आणखी काही असो, वीज जाणे हे एक नित्यकर्म होऊन बसलेले आहे.

उन्हाळ्य़ामध्ये वीजेअभावी ग्राहकांना घामाने सचैल स्नान घालणे आणि पावसाळ्यात घराबाहेर पडू न देता घरातच असहाय्य स्थितीमध्ये जखडून ठेवणे हे दोन्ही पुण्यकर्म वीजबोर्ड अतिशय भक्तीभावाने करत आलेले आहे. घामाबरोबरच शरीरातील उष्णता निघून जाते आणि पावसाळ्यात घराबाहेर पडलात तर भिजून सर्दी आणि ताप येण्याची शक्यता असते याची वीजबोर्डाला जाणीव असल्यामुळे, ते ही ग्राहकांच्या आरोग्याला होता होईल तेवढा हातभार लावत असतात. दोन-चार थेंब पाऊस आला तरीही वीज गेलीच पाहिजे आणि न गेल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना "कारणे दाखवा" नोटीस बजावण्यात येईल, असा बोर्डाचा कायदा असावा, इतक्या नियमितपणे वीज जाण्याचे प्रकार घडत आहेत.

मग पावसाळ्यात काय होत असेल याचा विचार करा. यातही विशेष म्हणजे, वीजेच्या कार्यालयातील फोनही वीजेवरच चालणारे आहेत की काय कळत नाही. कारण वीज गेली की ते फोन लागतच नाहीत. लागतच नाहीत याचा अर्थ रिंग न वाजताच फोन आपोआपच कट होतो. मात्र वीज आली की (अधून मधून) हे फोन सुरू झालेले दिसतात. टेलिफोन खात्याने आपल्या बंधू-खात्यासाठी असले वीजेवर चालणारे "स्पेशल" डेस्क-फोन दिले असावेत. यंदाही नित्यनेमाने दिवाळीच्या पहिल्याच दिवसापासून ते आजपर्यंत वीजेचे अनेकदा जाणे नित्यनेमाने सुरूच आहे. त्यात खंड न पाडण्याची दक्षता वीजबोर्ड दरवर्षीप्रमाणे घेत राहील अशी चिन्हे दिसत आहेत. दिवाळी पूर्ण होऊन पूढेही वीज बोर्ड अशाच प्रकारे आपल्या ग्राहकांच्या आरोग्याची चिंता करत राहील, हे कळावे.

थोडक्यात काय, तर राग, लोभ, संताप, आत्मक्लेष या सर्वांवर विजय मिळवायचा असेल तर त्यासाठी इन्व्हर्टर नसलेल्या घरात येऊन रहावे लागेल!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Load shedding issue in Maharashtra