मस्तानी तलाव : ऐतिहासिक ठेवा भग्नावस्थेत

mastani.jpg
mastani.jpg

पुणे : दिवे घाटातून प्रवास करताना घाटमाथ्यावरून घाटपायथ्याशी नजर टाकताच निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या अत्यंत रमणीय अशा मस्तानी तलावाकडे नजर आपोआप वळते. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या मस्तानी तलावाकडे स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी, वनविभाग, पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे सध्या हा ऐतिहासिक ठेवा भग्नावस्थेत विखुरला आहे. या तलावाचे निसर्गसौंदर्य न्याहाळताना सेल्फीचा मोह झाल्याशिवाय राहत नाही.

डोंगराच्या कुशीत सभोवतालच्या हिरवळीने नटलेला हा तलाव, प्रत्यक्ष जवळून पाहताना त्याची भव्यता आश्‍चर्यचकित करते. सर्व बाजूंनी निसर्गाच्या हिरवळीचा वरदहस्त लाभलेला मस्तानी तलाव म्हणजे स्वर्गातील अप्सरांचे जलविहाराचे अत्यंत रमणीय ठिकाण आहे, असा भास होतो. प्रचंड मोठी घडीव दगडी तटबंदी व लगत मोठमोठे वृक्षांची वनराई, मंदिर व डोंगरकुशीतील निसर्ग हे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. काही वर्षांपूर्वी पावसाळ्यातील पाणी तलावात मोठ्या प्रमाणात साठून राहत असल्याने तलावातील पाण्याच्या जलस्रोतांमुळे लगतच्या जमिनी बागायत झाल्या होत्या. त्या परिसरात सर्वत्र सीताफळाच्या बागामुळे सौंदर्यात भर घातली जात होती.
 

शासनाच्या दुर्लक्षामुळे व पावसाळ्यात डोंगर उतारावरून वाहून येणाऱ्या पाण्याबरोबर गाळ वाहून तलावात साठल्याने पाण्याची साठवण क्षमता कमी होऊ लागली. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास वडकी व लगतच्या शेवाळेमळा, लडकतवस्ती, तळेवाडी, साबळेमळा आदी वाड्यावस्त्या यांचा किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमचा सुटू शकेल. उखडलेला रस्ता व गैरसोयीमुळे पर्यटकांचा ओघ कमी झाला आहे. यासाठी तलावाकडे जाण्यासाठी पक्का डांबरी रस्ता तटभिंतीपर्यंत करावा. पर्यटनस्थळ करण्याची मागणी वडकी ग्रामस्थांनी अनेकदा केली, पण याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. तलावाच्या दुरुस्तीची जबाबदारी पुरातत्त्व विभागाची की वन विभागाची याची माहिती दिली जात नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पर्यटन स्थळ झाल्यास वडकीसाठी वरदान घाटातील डोंगर उतारावरून वाहून जाणारे पाणी तलावाकडे वळवावे, त्यातील गाळ काढून साठवण क्षमता वाढवल्यास गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमचा मिटेल.

लोकप्रतिनिधी, वनविभाग, पुरातत्त्व विभाग यांनी एकत्र येऊन मालकी हक्काचा मुद्दा उपस्थित न करता तलावाची दुरुस्ती करून पर्यटन स्थळ म्हणून विकास केल्यास वडकी परिसरातील तरुणांना बोटिंग व इतर लहानमोठे व्यवसाय करता आल्यास रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com