
'येणार साजन माझा' यासारखे गीत गाताना त्यातील लडीवाळपणा आवाजात जपत केलेला मुद्राभिनय आणि 'आली आली हो भागाबाई' सारखे भारूड सादर करताना ज्येष्ठांनी दाखविलेल्या उत्साहाला उपस्थितांनी जोरदार दाद दिली.
पुणे : 'येणार साजन माझा' यासारखे गीत गाताना त्यातील लडीवाळपणा आवाजात जपत केलेला मुद्राभिनय आणि 'आली आली हो भागाबाई' सारखे भारूड सादर करताना ज्येष्ठांनी दाखविलेल्या उत्साहाला उपस्थितांनी जोरदार दाद दिली. निमित्त होते इंदिरा भक्ती सुगम संगीत मंडळाने आयोजित केलेल्या सुगम संगीत कार्यक्रमाचे.
'झाला' सोसायटीतील त्रिदल सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात आयडियल कॉलनी, मयूर कॉलनी, बावधनमधील ज्येष्ठांनी सहभाग घेतला. सरोज नेर्लेकर या गेली बारा वर्षे ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी मोफत संगीत, गायन शिकवत आहेत. त्यांच्याकडून गायन शिकलेल्या ज्येष्ठांनी आपल्या गायनाचे सादरीकरण केले.
'तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा' या गाण्यातील शब्दांचा आधार घेत ज्येष्ठ नागरिक कमलाकर नेर्लेकर म्हणाले की, आयुष्यात अनेक गोष्टी ठरविलेल्या असतात. परंतु, कामाच्या व्यापात त्यासाठी वेळ देता येत नाही. निवृत्ती पत्करल्यानंतर हाती असलेल्या वेळेचा फायदा घेत आपला छंद जोपासायचा. त्याचा आनंद स्वतः घ्यायचा आणि इतरांनाही द्यायचा, ही आमची भूमिका आहे. शब्दरूपी मोत्यांच्या माळांची ही गुंफण सुखावणारी आहे.
डॉ. सुनंदा येडके म्हणाल्या की, गायनाची इच्छा आहे. पण, गायनापर्यंत पोचता येत नव्हते, व्यासपीठ मिळत नव्हते अशा महिलांसाठी नेर्लेकर यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. गार्गी बेलसरे या विद्यार्थिनीने सादर केलेल्या तबलावादनाला सर्वांनी दाद दिली. या कार्यक्रमाचे संयोजन कुमार लिंगम, संजीव वाडीकर, सुजाता करमरकर आदींनी केले. अमोल जोशी, मिलिंद मराठे यांनी संवादिनी; तर रमेश भालवडकर यांनी तबल्यावर साथ दिली. सूत्रसंचालन रश्मी जयवंत, प्रकाश टोणगावकर यांनी केले.