आयुष्य व्यवस्थापन ः एक अनिवार्य गरज 

- भूषण कोळेकर, कोथरूड, पुणे  निवृत्त सहायक महाव्यवस्थापक, एसबीआय 
Wednesday, 31 July 2019

"आयुष्य व्यवस्थापन' हा विचारच आपल्याकडे रुजलेला नाही. दिवस उगवतो आणि मावळतो. आपण व्यवसाय व्यवस्थापन, समय व्यवस्थापन, ताणतणाव व्यवस्थापन यांवर अनेकदा विचार करतो; पण आयुष्य व्यवस्थापन या विषयाचा आपल्याला पत्ताच नसतो. 
 

"आयुष्य व्यवस्थापन' हा विचारच आपल्याकडे रुजलेला नाही. दिवस उगवतो आणि मावळतो. आपण व्यवसाय व्यवस्थापन, समय व्यवस्थापन, ताणतणाव व्यवस्थापन यांवर अनेकदा विचार करतो; पण आयुष्य व्यवस्थापन या विषयाचा आपल्याला पत्ताच नसतो. 

ठिकठिकाणच्या माझ्या व्याख्यानानंतर मला अनेकजण भेटतात आणि म्हणतात, "माझ्या आयुष्याचे गणितचे चुकले आहे..., योग्य वेळी योग्य निर्णय नाही घेता आले ... आई-बाबांनी सपोर्ट नाही केला ... चुकीच्या लाइनला आलो.... बायको / नवरा बरोबर मिळाले नाहीत ... हे आयुष्य तर संपले ... वाया गेले ... आता पुढच्या जन्मी बघू .... इत्यादी इत्यादी... हे सर्व लोक 40 ते 50 या वयोवगटातील असतात. ऐकून खरेच वाईट वाटते... 
यावर खूप विचार केला, असे का ...? खूप लोकांशी बोललो, त्यांना बोलते केले आणि अशा निष्कर्षाप्रत आलो, की यातील बहुतेक लोकांनी आपण काय व्हायचे आणि काय करायचे, हे कधीच ठरवले नाही. 
"आयुष्य व्यवस्थापन' हा विचारच आपल्याकडे रुजलेला नाही. आयुष्य व्यवस्थापन म्हणजे काय? तन, मन आणि धन हे आपल्या आयुष्याचे अनिवार्य घटक. या तिघांचे व्यवस्थापन म्हणजेच आयुष्य व्यवस्थापन. 
"तनाची' म्हणजेच शरीराची मशागत आणि उपासना, निरोगी असण्यासाठी आणि राहण्यासाठी जे काय करायला लागेल ते ठरवणे आणि करणे आणि ही प्रक्रिया सतत चालू ठेवणे अत्यंत आवश्‍यक. हे काहीजण करतात; पण बरेचसे लोक त्यांना काही आजार झाल्यावर जागे होतात. 
"मन' हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. तन आणि धन या संबंधांतले निर्णय पण हे "मन'च घेत असते. म्हटले तर ते सर्वांत सुदृढ असते आणि म्हटले तर ते सर्वांत कमकुवत असते. मनाचे दोन घटक असतात "भाव' आणि "स्वभाव'. या दोनही घटकांचे व्यवस्थापन म्हणजेच मनाचे व्यवस्थापन. हे सर्वांत अवघड आहे; पण शक्‍य आहे. फार कमी लोक हे करतात. त्यातून अनेक समस्या उद्भवतात. 
"धन' याचा अर्थ पैसे आणि संपत्ती... या गोष्टींबद्दल बहुतेक लोक जागृत असतात, पण त्याची सखोल माहिती मात्र खूप कमी लोकांना असते. ती करून घेणे किंवा वेळोवेळी संबंधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक ठरते. 
अशा प्रकारे तन, मन आणि धन यांचे योग्य असे व्यवस्थापन आपण करू शकतो यांचीही जाणीव झाली, तर अनेक आयुष्ये सार्थकी लागतील आणि त्याचा काही वेगळाच आनंद प्रत्येकाला मिळेल आणि आयुष्य समृद्ध होईल. आणखी काय हवे? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The need for a time in life management