esakal | परमहंसनगरने केला बसचा वाढदिवस साजरा 
sakal

बोलून बातमी शोधा

परमहंसनगरने केला बसचा वाढदिवस साजरा 

परमहंसनगरने केला बसचा वाढदिवस साजरा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोथरूड कचरा डेपोशेजारी जेव्हा आमची कॉलनी उभी राहिली तेव्हा येथे फार कमी घरे होती. येथे बस येईल असे कोणाला वाटले नव्हते. आम्ही बसची मागणी केल्यानंतर पाहणी करायला आलेले अधिकारी म्हणाले अहो या भागाला बसची काय गरज आहे? परंतु लोकांनी येथे सुरू झालेल्या बससेवेला भरभरून प्रतिसाद दिला. पहिल्या दिवशी ज्या उत्साहात स्वागत झाले तोच उत्साह 33 व्या वर्षीसुद्धा आहे, अशी भावना परमहंसनगरमधील नागरिकांनी व्यक्त केली. 
निमित्त होते परमहंसनगरमधील बससेवेच्या 33 व्या वाढदिवसाचे. 
प्र. स. दंडवते, परमहंसनगर सोसायटीचे अध्यक्ष के. आर. पाटील, अविनाश हळबे, सुषमा कालुरकर आदी नागरिक या वेळी उपस्थित होते. सोसायटीतील रहिवाशांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन बसचालक, वाहकांचा सत्कार केला. मिठाईचा पुडा देत हे ऋणानुबंध कायम ठेवा, अशी इच्छा व्यक्त केली. या सन्मानाने चालक, वाहक दोघेही भारावून गेले. 
दंडवते म्हणाले, 35 वर्षांपूर्वी आम्ही येथे राहायला आलो. त्या वेळी येथे लोकवस्ती फार कमी होती. त्यामुळे येथे बससेवा सुरू होईल यावर कोणाचाही विश्वास नव्हता. आम्ही पाठपुरावा केला. त्याला अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आमच्या सेवेसाठी सुरू असलेली ही बससेवा सुरळीत चालत राहावी ही आमचीही जबाबदारी आहे. पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या बससेवेबद्दल प्रत्येक नागरिकाने ही भावना ठेवली तर आपली पीएमपी कधीच तोट्यात जाणार नाही. तिची भरभराटच होईल. 
अविनाश हळबे म्हणाले, येथून पुणे रेल्वे स्थानकमार्गे लोहगावला बस जाते. पौड फाटा, डेक्कन, रेल्वे स्थानक परिसरात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची, कामाला जाणाऱ्या कामगारांची चांगली सोय झाली आहे.