पुण्यातील स्वामी विवेकानंद मार्गावरील बसथांब्यांचे छत गायब

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 July 2019

भर पावसात प्रवासी पाहताहेत बसची वाट; पीएमपीचा भोंगळ कारभार 

पुणे : स्वामी विवेकानंद मार्गावरील प्रेमनगर ते बिबवेवाडी गावठाणपर्यंतच्या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करून सुशोभीकरण करण्यात आलेले आहे; परंतु यात नागरी सुविधांचा अभाव असल्याचे चित्र आहे. बसथांब्यांना छत नसल्याने प्रवाशांना भर पावसात बसची वाट पाहावी लागत आहे. 

पुणे : स्वामी विवेकानंद मार्गावरील प्रेमनगर ते बिबवेवाडी गावठाणपर्यंतच्या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करून सुशोभीकरण करण्यात आलेले आहे; परंतु यात नागरी सुविधांचा अभाव असल्याचे चित्र आहे. बसथांब्यांना छत नसल्याने प्रवाशांना भर पावसात बसची वाट पाहावी लागत आहे. 

रस्त्यावरील बसथांबे उघडे पडलेले असून, विद्यार्थ्यांसह प्रवाशांना पावसाचा सामना करत बसची वाट पाहावी लागत आहे. बिबवेवाडी गावठाण, अप्पर, इंदिरानगरसारख्या दाट लोकवस्तीच्या भागातून स्वामी विवेकानंद मार्ग जातो. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर अनेक नागरिक करत असतात; परंतु पीएमपीसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना प्रवाशांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पीएमपीएल प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे प्रवाशांना बसथांबे असूनसुद्धा रस्त्यावर पावसात बसची वाट पाहावी लागत आहे. प्रेमनगर सोसायटीपासून ते गावठाणपर्यंत पाच बसथांबे असून, तीन बसथांब्यांचे छत गायब आहे. गावठाणाकडून अप्परकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बसथांबाच गायब आहे.

विवेकानंद मार्गावरील भारतज्योती बसथांब्याची जाग व प्रत्यक्ष तयार केलेला बसथांबा यामध्ये मोठे अंतर असून, इंदिरानगर, चिंतामणीनगर, अप्पर व अप्पर शेवटच्या बसथांब्यावर प्रवाशी शेडच नाही, त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना पावसात बसची वाट पाहात थांबावे लागते. पीएमपीच्या या भोंगळ कारभाराचा प्रवाशांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करवा लागत असल्याचे जयराज जेधे यांनी सांगितले. बसथांब्यांची सुधारणा करण्याची मागणी स्वामी विवेकानंद स्टॉल संघटनेचे अध्यक्ष अशोक बिबवे यांनी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The roof of the bus stop disappeared in pune