डीएसके विश्‍व भास्करा सोसायटीत सौरऊर्जा प्रकल्प 

- दामोदर जोशी
Wednesday, 8 January 2020

पुणे : धायरीतील "डीएसके विश्‍व'मधील भास्करा सहकारी गृहनिर्माण सोसायटीचा कारभार पाहताना सोसायटीतील सार्वजनिक वापराच्या वाढत्या बिलावर काय मार्ग काढावा, असा विचार आम्ही पदाधिकारी करीत होतो. तेव्हाच एका नियतकालिकेमध्ये "सौरऊर्जा यंत्रणेमुळे पंचवीस वर्षे वीज मोफत' अशी जाहिरात वाचनात आली. त्यामुळे आमच्या विचारांना चालना मिळाली. 

पुणे : धायरीतील "डीएसके विश्‍व'मधील भास्करा सहकारी गृहनिर्माण सोसायटीचा कारभार पाहताना सोसायटीतील सार्वजनिक वापराच्या वाढत्या बिलावर काय मार्ग काढावा, असा विचार आम्ही पदाधिकारी करीत होतो. तेव्हाच एका नियतकालिकेमध्ये "सौरऊर्जा यंत्रणेमुळे पंचवीस वर्षे वीज मोफत' अशी जाहिरात वाचनात आली. त्यामुळे आमच्या विचारांना चालना मिळाली. 

सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी ही कल्पना उचलून धरली. संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून माहितीही घेतली. पण मूळ मुद्दा पैशाचा होता. तेव्हा सोसायटीच्या ठेवींवर कर्ज काढले आणि हा विषय मार्गी लागला. दोन महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण झाला. आमची कल्पना प्रत्यक्षात उतरल्याचा हा आनंद शब्दांमध्ये सांगता येण्यासारखा नव्हता. या प्रकल्पासाठी "एमएसईडीएल'ने सहकार्य केल्याने काम सुकर झाले. पंचवीस "केव्हीपी'च्या या प्रकल्पासाठी एकूण अठरा लाख रुपये खर्च आला. आमच्या सोसायटीत एकूण 318 सदनिका आहेत. हा प्रकल्प होण्यापूर्वी सोसायटीच्या सार्वजनिक वीजवापराचे बिल दरमहा 55 हजार रुपये येत असे. सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात वीजबिल शून्य आले आणि आमचे परिश्रम फळाला आले. या प्रकल्पासाठी सरकारने तीन लाख रुपयांची सबसिडी दिल्याने सोसायटीवरील आर्थिक बोजा थोडा हलका झाला, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. हा प्रकल्प साकारण्यासाठी सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी सहकार्य केल्याने एक विधायक उपक्रम सुरू झाला याचा आनंद आणि अभिमानही वाटतो. आमच्या सोसायटीतील सौरऊर्जा प्रकल्प यशस्वीपणे सुरू झाल्याचे पाहून डीएसके विश्‍वमधील "सप्तसूर' आणि "चंद्रमा' सोसायटीतील सभासदांनी प्रकल्पाला भेट देऊन माहिती घेतली आणि स्वतःच्या सोसायटीतही असा प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अन्य सोसायट्यांनीही अशाच प्रकारचे पाऊल उचलल्यास वीज बचत होण्याबरोबरच सोसायटीच्या खर्चातही मोठी बचत होऊ शकेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solar project at DSK World Bhaskara Society in pune

Tags
टॉपिकस
Topic Tags: