
किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली बांधकामांना सुरवात
गुलटेकडी मार्केट यार्डातील गूळ-भुसार विभागात किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली अनधिकृतपणे वाढीव बांधकामे सुरू झाली आहेत. बाजार समिती प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील अर्थपूर्ण संबंधांमुळे अशा अनधिकृत बांधकामांना पाठबळ मिळत असल्याची चर्चा सध्या बाजार घटकांमध्ये सुरू आहे.
पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील गूळ-भुसार विभागात किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली अनधिकृतपणे वाढीव बांधकामे सुरू झाली आहेत. बाजार समिती प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील अर्थपूर्ण संबंधांमुळे अशा अनधिकृत बांधकामांना पाठबळ मिळत असल्याची चर्चा सध्या बाजार घटकांमध्ये सुरू आहे.
मार्केट यार्डात गूळ-भुसार विभागात सध्या अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. किरकोळ दुरुस्त्यांच्या नावाखाली काही व्यापारी अतिरिक्त बांधकामे करत आहेत. गूळ-भुसार विभागात गाळा नं.256 येथे सध्या जोरदार अनधिकृतपणे काम सुरू आहे. किरकोळ दुरुस्तीची परवानगी बाजार समिती देत असते. प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्या संगनमताने वाढीव बांधकाम केले जात असल्याचे प्रकार यापूर्वीही समोर आले होते. काही महिन्यांपूर्वी एका गाळेधारकाने दुरुस्तीच्या नावाखाली गाळा पाडून नव्याने गाळे बांधकाम काढले होते. तेव्हा बाजार समितीने कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यातच हे नवीन बांधकाम सुरू झाल्यामुळे अनधिकृत बांधकामाला बाजार समिती प्रशासन पाठीशी घालत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थापत्य विभागाचे प्रमुख अरविंद फडतरे यांनी सांगितले, कोणाकोणाला परवानगी दिली हे पाहावे लागेल. त्यानंतर परवानगी दिली की नाही हे कळेल. अशी उडवा उडवीची उत्तरे त्यांनी दिली.
अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष?
गुलटेकडी मार्केट यार्डात अतिक्रमण विभाग कार्यरत आहे. संबंधित विभागाच्या विभागप्रमुखांनी अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मात्र, असे होताना दिसत नसून, अतिक्रमण विभाग अशा गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
अनधिकृत कट्ट्यांवर कारवाई कधी?
मागील महिन्यात काही हॉटेलचालक व पतसंस्थांनी आपल्या कार्यालयासमोर बाजार समितीची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे कट्टे बांधले होते. त्यावर त्या कट्ट्यांची पाहणी करून अडथळा ठरणारे कट्टे हटविण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली होती. त्यावरही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.