
पौड रस्त्यावरील शिक्षकनगरमध्ये पूर्वीचा नामफलक व्यवस्थित असतानासुद्धा दुसरा नामफलक उभारून महापालिकेकडून पैशांची उधळपट्टी करण्यात आली आहे. तेथे दुसऱ्या फलकाची आवश्यकता काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
पुणे : पौड रस्त्यावरील शिक्षकनगरमध्ये पूर्वीचा नामफलक व्यवस्थित असतानासुद्धा दुसरा नामफलक उभारून महापालिकेकडून पैशांची उधळपट्टी करण्यात आली आहे. तेथे दुसऱ्या फलकाची आवश्यकता काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते संदीप कुंबरे यांनी सांगितले, की कोथरूडमधील शिक्षकनगरमध्ये असलेल्या (कै.) धरमराज राजाराम पांचाळ चौकात गरज नसताना दोन दोन नामफलक लावण्यात आले आहेत. यापूर्वी शांतीबन चौक परिसरातही अशा पद्धतीने फलक लावण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीची बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच तो हटवण्यात आला. याबाबत माहिती अधिकारात महापालिकेकडून खर्चाची माहिती मागवली आहे.
पांचाळ चौक येथे (कै.) धरमराज राजाराम पांचाळ चौक आणि पर्जन्य जलसंचय प्रकल्प हे नामफलक असताना पुन्हा त्याच ठिकाणी दुसरा नामफलक लावण्यात आला आहे. या नामफलकावरील खर्चाला मंजुरी देताना संबंधित अधिकाऱ्यांनी तेथील पाहणी न करता खर्चाला मंजुरी दिली का? पाहणी केली असेल तर परवानगी कशी दिली? या गोष्टींचा विचार करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, झालेला खर्च त्यांच्या पगारातून वसूल करावा, अशी मागणी कुंबरे यांनी केली आहे.
विकासकामे करायची असली तर निधी नाही, असे आम्हाला सांगण्यात येते; पण चुकीच्या कामावर उधळपट्टी करायला पैसे कोठून येतात, याचा खुलासा अधिकारी व लोकप्रतिनिधींनी जनतेला द्यावा.
- आदित्य भरम, नागरिक