esakal | वंदनीय व्यक्तिमत्त्व ...
sakal

बोलून बातमी शोधा

karnik.JPG

- विशेष मुलांच्या पालकांना मानसिक आणि भावनिक आधार देऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या "सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन' शाळेच्या प्राचार्या उज्ज्वला कर्णिक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा. 

वंदनीय व्यक्तिमत्त्व ...

sakal_logo
By
- डॉ. सुरेखा संजय पंडित, शनिवार पेठ, पुणे ---------------------

- विशेष मुलांच्या पालकांना मानसिक आणि भावनिक आधार देऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या "सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन' शाळेच्या प्राचार्या उज्ज्वला कर्णिक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा. 

उज्ज्वलाताई एक अत्यंत दिलखुलास, आनंदी आणि आश्‍वासक असे व्यक्तिमत्त्व. माझा आणि त्यांचा परिचय 1986 पासूनचा. माझा मुलगा चार वर्षांचा असताना त्यांच्या शाळेत प्रवेश घेतला होता. मी प्रथम त्यांना भेटले ते एक पालक म्हणून, पण नंतर आम्ही जवळच्या मैत्रिणी कधी झालो ते कळलेच नाही. 

"सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन'च्या त्या सर्वेसर्वा. शाळेच्या प्रिन्सिपॉल पण आमच्या सर्व पालकांसाठी एक अत्यंत खंबीर नेतृत्व होते. मुलांबरोबर तर त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होतेच, पण त्यांच्या पालकांनाही मानसिक आणि भावनिक आधार देऊन त्यांनी खूप बळ दिले होते. आमच्यासारख्या विशेष मुलांचे पालक असणाऱ्या सर्वांना त्यांनी खूप प्रोत्साहन दिले. "आपण सर्व अडचणींना सामोरे जात आहोत आणि त्या समस्या आपल्याला सोडवाव्या लागणारच आहे, तर मग आनंदानेच का नाही सोडवायच्या,' असा साधा दृष्टिकोन त्यांनी पालकांसमोर ठेवला आणि आम्ही खूप रिलॅक्‍स झालो. 


जे आपल्या हातात नाही त्याबद्दल वाईट वाटून घेण्यापेक्षा समोर आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करून त्यातून मार्ग काढण्याचे व आनंदी राहण्याचे बळ आम्हाला त्यांच्यामुळे मिळत असे. व्यक्तिमत्त्व समृद्ध होण्यासाठी बाह्य सौंदर्याबरोबरच अंतर्गत सौंदर्य म्हणजे स्वभाव, वृत्ती, वागणे, बोलणे यांचे अत्यंत सुंदर रसायन म्हणजे उज्ज्वलाताई. 


विशेष मुलांची शाळा चालविताना स्वतःच्या मुलांबरोबरच सगळीच त्यांची मुले होती. त्या त्यांना बोलताना "माझी मुले' असेच संबोधत असत. 

आम्ही पालक समाजाकडून मुलांच्या स्वीकृतीची अपेक्षा करीत असू; पण आम्हाला सतत उमेद देण्याचे काम उज्ज्वलाताईंनी केले. सध्याच्या जगात माणुसकी हरवत चालली आहे असे दिसते; पण आम्हाला माणसामधील देवत्वाचा प्रत्यय उज्ज्वलाताईंमुळे आला. 
मैत्रीच्या नात्याने सर्व अडचणी समजून घेऊन आमच्या पाठीशी सतत ठामपणे उभ्या राहत असत. अध्यात्म किंवा तत्त्वज्ञान वाचणे, बोलणे सोपे असते; पण त्यांनी आम्हाला अध्यात्म जगायला शिकवले. 

असे अत्यंत आनंदी, तेजस्वी, आश्‍वासक व्यक्तिमत्त्व आज आमच्यात नाही, पण आम्हाला खंबीरपणे आयुष्य कसे जगावे, याची उमेद देऊन त्या मात्र अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेल्या. आमच्या सर्वांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

loading image
go to top