'या' जिल्ह्यातील बंदरातून आयात निर्यात आहे सुरू...

चंद्रशेखर जोशी
गुरुवार, 26 मार्च 2020

आंतरराष्ट्रीय मानके पूर्ण हवीत ; तीन बंदरातून वाहतूक, रस्ता, विमान, रेल्वेसेवा ठप्प...

दापोली - कोरोना विषाणूच्या संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. देशातील विमानसेवा, रेल्वे सेवा तसेच अत्यावश्यक वाहतूक सोडून सर्व वाहतूक 14 एप्रिलपर्यंत बंद करण्यात आली असताना देशभरातील बंदरामधून बोटींमधून होणारी मालाची आयात, निर्यात सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व बंदरातूनही ही सेवा सुरू आहे.या संदर्भात दापोली दौर्‍यावर आलेले जिल्हाधिकारी मिश्रा यांना विचारणा केली असता आंतरराष्ट्रीय मानके पूर्ण करणार्‍या बोटींना जिल्ह्यातील बंदरात येण्याची परवानगी देण्यात येईल असे सांगितले. 

सध्या बाणकोट येथील बंदरात बॉक्साईट निर्यातीसाठी एक बोट आली असून तिच्यात बॉक्साईट भरले जात आहे. अंजनवेल (ता. गुहागर) येथील आरजीपीपीएलच्या जेटीवर दोन दिवसांपूर्वी एलएनजी घेऊन परदेशातून बोट आली होती. या बोटीतील गॅस उतरण्यापूर्वी सर्व शासकीय सोपस्कार करण्यात आले. आरोग्य अधिकार्‍यांनी या बोटीवर जाऊन सर्व कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणीही केली व त्यानंतर या बोटीवरील गॅस उतरविण्यात आला. जयगडजवळील आंग्रे पोर्ट येथेही एका बोटीत कच्ची साखर भरण्याचे काम सुरू असून साखर भरून झाल्यावर ही बोट विदेशात मार्गस्थ होणार असून पुन्हा एक बोट साखर भरण्यासाठी आंग्रे पोर्ट येथे येणार आहे.

वाचा - त्या प्रवाशांचा शोध सुरू.... 

जयगड येथील जेएसडब्लू पोर्टमध्ये 28 मार्चला परदेशातून कोळसा भरलेली बोट दाखल होणार आहे. या बंदरात हा कोळसा उतरविण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या शिपिंग विभागाचे महासंचालक (डिजी शिपिंग) यांच्या परिपत्रकानुसार ही आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरू असून राज्याच्या बंदर विभागातील एका अधिकार्‍याने याला दुजोरा दिला आहे. 

उदय सामंत यांनी दिला होता इशारा

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 31 मार्च पर्यंत जिल्ह्यातील बंदरांमध्ये विदेशी बोटी येऊ देणार नाही असा इशारा दिला होता. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी सांगितलेल्या माहितीमुळे ही वाहतूक सुरू राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Import and export are available from the ratnagiri port