इस्लामपुरात कोरोना बाधित सापडल्याने प्रशासनाने केलंय 'हे' मायक्रो प्लॅनिंग...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

इस्लामपूर शहरातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रशासनाच्या वतीने दक्षता म्हणून मायक्रो प्लॅनिंग करण्यावर भर देण्यात आला आहे.

इस्लामपूर - इस्लामपूर शहरातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रशासनाच्या वतीने दक्षता म्हणून मायक्रो प्लॅनिंग करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी आज प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, तहसीलदार रविंद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली. नगराध्यक्ष निशिकांत पाटील, आनंदराव पवार, चिमन डांगे उपस्थित होते. नागेश पाटील म्हणाले, 'शहर धोक्यात आहे. स्वयंशिस्त हाच एकमेव पर्याय
आहे. नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचे मायक्रो प्लॅनिंग केले जाईल. औषध फवारणी सुरू राहील. ज्यांच्या हातावर शिक्का आहे. त्यांना सक्त ताकीद आहे की त्यांनी अजिबात इतरांशी संपर्क टाळावा. ग्राम समितीने त्यांच्यावर लक्ष ठेवावे. गरज असेल तरच बाहेर पडावे. किराणा, दूध, भाजीपाला याबाबत प्रशासन योग्य तरतूद करेल. भाजीपाला चढया दराने कोणी विकल्यास कारवाई करण्यात येईल. सकाळी ७ ते १० या वेळेत शहरात किमान १५ ठिकाणी भाजी आणि दूध विक्रीची दररोज व्यवस्था केली जाईल, नगरपालिका जागा निश्चित करेल. त्यासाठी नगरसेवकांनी त्यांच्या त्यांच्या प्रभागात नियोजन करावे."

पाहा - सांगली जिल्ह्यात चौघांना कोरोना  

कृष्णात पिंगळे म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग लोकांच्या जीवावर बेतणारा आहे. लोकांनी गंभीरपणे घ्यावे. आम्ही योग्य ती दक्षता घेत आहोत. पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईला सहकार्य करावे कोणालाही पाठीशी घालू नये.  पुढचे ५ ते ६ दिवस सर्वानी शिस्त पाळली पाहिजे. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या काळजीसाठी काही गोष्टी पाळा. अनावश्यक दुकान उघडे ठेवले तर आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत. किराणा दुकानदारांनी व औषध विक्रेत्यांनी छोटे शटर उघडे ठेवून गर्दी न करता सेवा द्यावी. पोलिस निरीक्षक नारायण देशमुख म्हणाले, 'शहरात बाहेरून कुणीही येऊ नये, अशी व्यवस्था केली आहे. काही बाबी तपासून अत्यावश्यक बाबींना प्रवेश देण्यात येईल. हॉटेल सुरू राहतील. मात्र हॉटेलमध्ये बसून खायला बंदी आहे. ते फक्त पार्सल देऊ शकतील. शहरातील बझारांना होम डिलिव्हरी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नगरसेवक चिमन डांगे म्हणाले, 'प्रभागनिहाय दूध, भाजीपाला आणि अत्यावश्यक साहित्याची व्यवस्था करावी. विक्रेत्याना व नागरिकांना मास्क सक्तीचे करा. यावेळी झालेल्या चर्चेत सभापती अॅड. विश्वासराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, विक्रम पाटील, संग्राम पाटील, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती जगन्नाथ माळी, जितेंद्र पाटील, विश्वनाथ डांगे, शकील सय्यद, प्रदीप लोहार यांनी चर्चेत भाग घेतला.

काहींची पाठ, तर काही हतबल !

या बैठकीत प्रशासनाने नगरसेवकांना सक्रिय होण्याबाबत आग्रह केला. काही नगरसेवकांना सूचना देऊनही त्यांनी बैठकीला पाठ फिरवली तर एका महिला नगरसेविकेने लोक आमचे ऐकत नाहीत अशी तक्रार करत आपली हतबलता जाहीर
केली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: islampur Administration has done micro planning for the prevent the corona